Home मध्यंतर सुखदा सासू-सुनेचं नातं जेवणातल्या तिखटा-मिठासारखं!

सासू-सुनेचं नातं जेवणातल्या तिखटा-मिठासारखं!

3

‘सासू-सून’ या नात्याविषयीच्या ‘गॉसिपिंग’चा मोह आजकालच्या डेलीसोपवाल्यांनाही आवरता आलेला नाही. म्हणूनच, केवळ टीआरपी कमावण्याच्या उद्देशाने प्रत्येक वाहिनीवर या नात्याचा ऊहापोह केला जातो. मात्र ह्या सीरियल्स पाहण्यासाठी या दोघीही घरातलं काम आटोपून एकत्र बसतात, आजकालच्या प्रत्येक घरातलं हे चित्र बघितलं की बरं वाटतं. पण, या ‘डेलीसोप’च्या कटकटी पाहताना आपण त्यात किती समरस होऊन जातो, हा मुद्दाही महत्त्वाचा!

नेहमीचीच संध्याकाळ.. हेमा, जया, रेखा यांनी किटी पार्टीचा घाट घातला होता. ऑफिसमधून घरी आल्यानंतर मिळालेल्या फावल्या वेळेत टीव्हीवरच्या मालिका पाहत चकाटय़ा पिटणं हा तसाही बायकांचा आवडता छंद. गप्पांच्या या फडांचे विषय अनेक, पण त्यातही ‘माझी सासू अश्शी अन् माझी सासू तश्शी’ म्हणत ‘सासूप्रेम’ भलतंच उतू जात असतं. या तिघीही त्याला अपवाद नव्हत्या.

हेमानं सासूचा विषय छेडला. ‘माझी सासू भारी खाष्ट आहे, बरं का!’ असं म्हणत तिने नाक मुरडलं. हे ऐकून जयानेही री ओढलीच, ‘हो नं!! माझ्या सासूबाई तर खूपच वक्तशीर. त्यांना इकडची वस्तू तिकडे झालेली अजिबात चालतच नाही.’ इतका वेळ सगळं गुपचूप ऐकणारी रेखा मात्र याला अपवाद होती. तिने आपल्या सासूबाईंचं तोंडभरून कौतुकच केलं.

असं म्हणतात की, एका खोलीत शंभर पुरुष गुण्यागोविंदाने राहू शकतात. पण दोन बायका राहू शकत नाहीत. त्यांच्यात वाद होत असतात. खरं पाहता, एकाच कुटुंबात राहणा-या या दोन बायकांना ‘ईर्षा’ नावाचा दुर्धर रोग जडलेला असतो. भांडय़ाला भांडं लागलं की, आवाज होणारंच.. या उक्तीप्रमाणे सासवा-सुनांच्या नात्यालाही या रोगाने एकदा का पछाडलं की, खटके उडायला सुरुवात होते आणि मग निर्माण होतो तो, दुरावा.. तोही कायमचा. हेमा आणि तिची सासू वत्सलाबाई यांच्यातही नेहमी असचं व्हायचं. नावाप्रमाणेच ‘वत्सल’ असणा-या वत्सलाबाई मुळातचं ‘परफेक्शनिस्ट’ होत्या, तर हेमा थोडीशी ‘सो कॉल्ड’ मॉडर्न कल्चरमध्ये राहणारी, फारशी किचनमध्ये न फिरकणारी. या दोन टोकाच्या बायका एकत्र आल्याने त्यांच्या नात्यांमधला गोडवा कमी झाला होता.

पूर्वीपासूनच ‘सासू-सून’ या नात्याला परंपरागत रूढी आणि प्रथांची जोड मिळालेली आहे. म्हणूनच पूर्वी सासुने सुनेचा जाच केला, असं सतत कानावर पडे. त्या काळात एकत्र कुटुंबपद्धतीत मुला-मुलींचं लग्न वयाच्या आठव्या वर्षातच केलं जात असे. या अल्लड वयात, काही कळायच्या आतच संसाराची जबाबदारी मुलींवर पडे. दररोजच्या कामात झालेल्या चुकांवरून या मुलींना टक्के-टोणपे ऐकावे लागत. आणि मग, आपल्याला अध्वातध्वा बोल लावणा-या सासूबाई ‘कजागबाई’ वाटू लागत. मुळात, ह्या दोन्ही व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील एकाच व्यक्तीशी निगडित असतात.

सासूचा मुलगा हा सुनेचा नवरा असतो. आतापर्यंत गृहिणी म्हणून संसार सांभाळणारी सून भविष्यात सासू होते, त्या वेळी तिच्या मनाची घुसमट होते. या ‘सासू’ अध्यायाचा स्वीकार करताना तिलाही मनाच्या कुठल्या तरी कोप-यात समाजातील अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. सासूंप्रमाणे सुनेलाही नव्या संसाराची गणितं मांडावी लागतात. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी सासरच्या लोकांशी विशेषत: सासुशी कसं वागायचं, कसं बोलायचं याचं ‘माहेरकडू’ दिलं जातं.

गेल्या वर्षी सासू-सुनेची ‘घर-घर की कहानी’ जाणून घेण्यासाठी औरंगाबाद येथे सासू संमेलन भरवण्यात आलं होतं. बदलत्या काळानुसार या नात्यातही बदल झालेत का, हा त्यातील मुख्य विषय होता. जागतिक स्पर्धा, वाढती महागाई यामुळे महिलांनाही ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडावं लागलं. तिलाही कमावतं व्हावं लागलं. या सगळ्यांचा परिणाम तिच्या कौटुंबिक जीवनावर झालाच. एकेकाळी एकत्र कुटुंबात राहणा-यांनी विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला. या बदललेल्या समाजव्यवस्थेत या नात्यालाही बदलावं लागलं.

त्यातलाच एक बदल म्हणजे ब-याच सुना आपल्या सासूबाईंना ‘अहो, सासूबाई’ ऐवजी ‘आई गं!’ असंच हाक मारू लागल्यात. मांडायचा मुद्दा असा की, पूर्वीच्या या एकाच चौकटीत बांधल्या गेलेल्या नात्यामध्ये आज मोकळीकता निर्माण झाली आहे. एकमेकांबद्दल असलेली ईर्षेयची जागा आता समजुतदारपणाने घेतलीये. किटी पार्टीतील रेखा आणि तिची सासू यांच्यातलं नातं हे सासू-सुनेपेक्षा आई-मुलीचं होतं. रेखाचे सासरे गेल्यानंतर तिच्या सासुने वयाच्या साठीनंतर कथ्थक शिकण्याचा ध्यास घेतला. एवढचं नाही तर, त्यांनी रेखालाही प्रोत्साहन दिलं. त्यामुळे या दोघींमधलं नातं दृढ व्हायला मदतच मिळाली आहे.

मुळात हे नातं रक्ताचं नसलं तरी एका अतुट विश्वासावर आधारलेलं असतं. सुगरणीच्या घरटय़ाच्या विणीप्रमाणे या नात्याचाही एक एक नाजूक धागा बांधला जातो आणि त्यातूनचं उभारतं एक भक्कम घर. त्या आईने आपल्याला जन्म दिला नाही तरीही तिने तिच्या आयुष्यातील ‘मर्मबंधातली ठेव’ आपल्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळे ह्या ठेवीचे जतन करण्याची

जबाबदारी सुनेची आहे. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेल्या या नव्या सुनेचा स्वीकार मनापासून करण्याची जबाबदारी तमाम सासूवर्गाची आहे. शेवटी, कुटुंब एकसंध ठेवणं ही जबाबदारी ना एकटय़ा सुनेची.. ना सासूची, ती दोघींची जबाबदारी आहे. हे नातंचं एकमेकांसाठी पूरक आहे. जेवणात जशा तिखट, आंबट, तुरट, गोड ह्या चवी जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे सासू-सुनेच्या या नात्यामुळे कुटुंबातली लज्जत वाढते.. काय हो सासूबाई, बरोबर आहे ना..!

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version