Home ऐसपैस काठियावाडी जलसा!

काठियावाडी जलसा!

0

गुजराती पद्धतीचं जेवण गोड-गुळमुळीत असतं, पण ‘काठियावाडी जलसा’त मिळणारं जेवण तिखट-मसालेदार असतं. त्यात मसाल्याचा पूरेपूर वापर केला असल्याने तिखटाच्या बाबतीत ते आपल्या मराठी जेवणाशी स्पर्धा करू शकेल, असं असतं.

वेगवेगळ्या प्रदेशांची खाद्यसंस्कृती जाणून घ्यायची तर तिथले तिथले खाद्यपदार्थ चाखून बघणं, हा उत्तम मार्ग. हे खाद्यपदार्थ कुठल्याही एका ठिकाणी खायला मिळणं अवघड, पण मुंबईचं वैशिष्टय असं की, इथे सगळ्या प्रांतातल्या खाद्यसंस्कृती एकत्र नांदताना दिसतात. त्यामुळे इथे अगदी देश-विदेशातल्या खाद्यपदार्थाच्या चवीही चाखायला मिळतात. त्यातही मुंबईत गुजराती समाजाची संख्या मोठी असल्याने खास गुजराती थाळी पद्धतीच्या हॉटेलची संख्या खूप आहे.

अर्थात, आपल्याकडे मराठवाडी, वैदर्भीय, मालवणी अशा वेगवेगळ्या प्रांतांची खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे, तसेच गुजराती जेवणाचेही प्रांतांनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. गुजरातमधील काठियावाड प्रांताच्या काठियावाडी जेवणाचीही अशीच आगळी ओळख आहे. एरवी गुजराती जेवण गोड व गुळमुळीत असतं, पण काठियावाडी जेवणाचं वैशिष्टय़ म्हणजे ते तिखट, मसालेदार असतं. तिखटाच्या बाबतीत ते आपल्या मराठी जेवणाशी स्पर्धा करू शकेल, असं असतं. कारण त्यात मसाल्याचा पूरेपूर वापर केलेला असतो. हे झणझणीत काठियावाडी जेवण देणा-या काही खास खानावळी मुंबईच्या उपनगरात आहेत. ‘काठीयावाडी जलसा’ ही त्यातलीच एक.

आठेक वर्षापूर्वी मुंबईच्या अंधेरी भागात ही छोटेखानी खानावळ सुरू झाली. दोनेक वर्षापूर्वी बोरिवलीतही तिची शाखा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या खानावळीचे मालक कुणी गुजराती नव्हे, तर रवी शेट्टी हे दाक्षिणात्य आहेत. त्यांच्या बोरिवलीच्या खानावळीची व्यवस्था त्यांच्या पत्नी कल्पना विचारे-शेट्टी सांभाळतात. मूळच्या कोकणातल्या असलेल्या विचारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खानावळीत मोजकेच पदार्थ, पण अस्सल काठियावाडी पदार्थ मिळतात. हे सगळे पदार्थ काठियावाडी मसाले वापरून, अस्सल घीमध्ये तयार केलेले असतात. त्यामुळे त्यांची काठियावाडी लज्जत ख-या अर्थाने चाखायला मिळते. मग तुम्ही इथली थाळी खा किंवा रोटलो आणि डाळ अथवा एखादी भाजी खा.

‘काठियावाडी जलसा’त मिळणा-या पदार्थाची नावं पाहिलीत तरी इथलं वेगळेपण लक्षात येऊ शकतं. उदाहरणार्थ, भाज्यांमध्ये इथे लोटवाली मेथी, सेव टमाटर, मेथी टमाटर, रिंगणानो ओरो अशी नावं दिसतात. यातली लोटवाली मेथी म्हणजे बेसनात मेथी, लसूण वगैरे घालून केलेली भाजी. रिंगणानो आरो म्हणजे वांग्याचं भरीत, तर सेव टमाटर म्हणजे टोमॅटोच्या रशात भावनगरीसारखी शेव टाकून केलेली चटकदार भाजी. ही काहीशी पातळ भाजी चपाती किंवा रोटोलो म्हणजे भाकरी, कशाबरोबरही खाल्ली तरी मस्त लागते. पंजाबी प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर इथल्या भाज्या एकदम बेस्ट.

भाकरी (रोटलो)चे तर इथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि मिश्र धान्य असे अनेक प्रकार मिळतात. लसणिया रोटलो असाही एक प्रकार आहे. बाजरीच्या पिठात लसूण मिसळमून केलेली ही भाजी लसूणप्रेमींना आवडेल अशी आहे. भाकरीचा आणखी एक नवा प्रकार म्हणजे फ्राय रोटला. भाकरीचे तुकडे ग्रेव्हीत टाकून त्याला फोडणी देऊन बनवला जाणारा हा प्रकार आवर्जून चाखावा असा आहे. याच पद्धतीने बनवलेली फ्राय खिचडीही जिव्हा चाळवणारी असते.

‘काठियावाडी जलसा’त मिळणारे गोड पदार्थ असेच वैशिष्टयपूर्ण असतात. उदा. इथली पुरणपोळी. आपल्याकडे पुरणपोळीत चणाडाळीचं पुरण वापरलं जातं, तर काठियावाडीत पुरणासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तसंच बाहेरचं आवरण (पारी) ही मैद्याचं नव्हे तर गव्हाच्या कणकेचं असतं. पुरणाने गच्च भरलेली ही गरमागरम पोळी भरपूर तूप टाकून टेबलवर येते, तेव्हा तोंडात पाणी आलं नाही तरच नवल. गव्हाच्या जाडसर पिठात तूप-गूळ टाकून केलेला चुरमा लाडूही जेवणाचा शेवट गोड करणारा असतो.

‘काठियावाडी जलसा’ ही खानावळ असल्याने तिथे हॉटेलसारखा भपका पाहायला मिळत नाही, परंतु चवीच्या बाबतीत इथे अजिबात तडजोड केली जात नाही. हॉटेलातील एकाच चवीच्या ग्रेव्ही आणि मसाल्याचं जेवण जेवून कंटाळा आला असेल तर हा स्वस्त-मस्त ‘काठियावाडी जलसा’ अनुभवायला हरकत नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version