Home महाराष्ट्र कोकण सिंधुदुर्गातील कोकम पोहोचले अमेरिकेत

सिंधुदुर्गातील कोकम पोहोचले अमेरिकेत

0

जिल्ह्यातील कोकमाला अमेरिकेचा दरवाजा खुला झाला असून या वर्षी तीन टन कोकम निर्यात करण्यात आली आहे.

कुडाळ- जिल्ह्यातील कोकमाला अमेरिकेचा दरवाजा खुला झाला असून या वर्षी तीन टन कोकम निर्यात करण्यात आली आहे. आंब्यासारख्या पिकाला युरोपीय राष्ट्रात बंदीला सामोरे जावे लागत असताना कोकमासारख्या दुर्लक्षित पिकाने अमेरिकेचे दार उघडण्याची किमया साधली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकम (घुल) अमेरिकेत पाठविण्यासाठी गेली १४ वर्षे कुडाळ येथून कोकण निसर्ग मंच सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोकणातील या पिकांपासून शेतक-यांना योग्य भाग मिळविण्यासाठी वेस्टर्न घाट कोकण फाउंडेशन व कोकण निसर्गमंच या संस्थेने या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्याचा जणू विडाच उचलल्याची माहिती कार्यवाह मोहन होडावडेकर यांनी दिली.

अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतक-यांकडून कोकम गोळा करून त्याच्यावर केलेल्या अमेरिकन प्रमाणीकरणाच्या सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. जिल्ह्यातील पाट, परूळे, भोगवे, तुळस आदी गावांतील निवडक शेतक-यांकडून पूर्ण पक्व कोकम नेटक्या पद्धतीने सुकवून घेण्यात आले. त्याकरिता कोकम शेतक-याला बाजारभावापेक्षा जास्त व निश्चित हमीभाव देण्यात आला.

कोकण निसर्ग मंच ही संस्था गेली चौदा वष्रे जिल्ह्यातील वनौषधी, बांबू, कोकम व फणस या पिकापासून प्रक्रिया मूल्यवृद्धी व शेतक-याला योग्य हमीभाव देण्यासाठी संस्था पुढाकार घेत आहे. कोकणात आढळणा-या कोकम या पिकामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. मात्र शासनस्तरावर असलेली अनास्था व योग्य अशा मार्गदर्शनाअभावी हे पीक शेतक-याला त्याच्या श्रमाएवढा मोबदला देऊ शकत नाही. कोकण निसर्ग मंच ही संस्था या पिकाच्या मूल्यवृद्धी प्रक्रियेतून शेतक-याला मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांची परिणती म्हणून शिकागो, अमेरिका येथील हेल्थ क्लबमध्ये वापरासाठी प्रतिउपचायक (अ‍ॅन्टी ऑक्सीडंट) म्हणून या वर्षी सिंधुस्फूर्ती नॅचरल फुड्स या संस्थेमार्फत यंदा तीन टन कोकम निर्यात करण्यात आली आहे. आंब्यासारख्या पिकाला युरोपीय राष्ट्रात बंदीला सामोरे जावे लागत असताना कोकमासारख्या पिकाला अमेरिकेचे दार उघडण्याची ही किमया कोकण घाट फाउंडेशन व कोकण निसर्ग मंच यांनी करून दाखविली आहे. यावेळी या दोन्ही संस्थातर्फे डॉ. अजित शिरोडकर, संतोष पेडणेकर, गुरुदत्त शेणई, मिंगेल ब्रिगेंन्झा, नकुल पार्सेकर व कोकण निसर्ग मंचचे कार्यवाह मोहन होडावडेकर उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version