Home महाराष्ट्र कोकण सिंधुदुर्ग लवकरच महानगरांशी स्पर्धा करेल

सिंधुदुर्ग लवकरच महानगरांशी स्पर्धा करेल

1

राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही केलेली प्रगती अभिमानास्पद असून लगतच्या काळात येथील ‘सी वर्ल्ड’, विमानतळ, पाटबंधारे, रस्ते, पर्यटन आदी विकासामधून हा जिल्हा मुंबई-पुणे शहरांशीही स्पर्धा करेल असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुनगरी- राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही केलेली प्रगती अभिमानास्पद असून लगतच्या काळात येथील ‘सी वर्ल्ड’, विमानतळ, पाटबंधारे, रस्ते, पर्यटन आदी विकासामधून हा जिल्हा मुंबई-पुणे शहरांशीही स्पर्धा करेल असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुनगरी येथे मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते पोलिस परेड ग्राउंडवर झाला. प्रभारी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जि.प.च्या अध्यक्षा निकिता परब, मुख्य कार्यकारी अधिकारी ई.रवींद्रन, पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष मधुसूदन बांदिवडेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते. 

राज्यात सिंधुदुर्गानेही वेळोवेळी आपला ठसा उमटवला आहे. येथील जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला व नेतृत्व करण्याची संधी दिली त्याच कृतज्ञतेतून आपण या जिल्ह्याला झुकते माप दिले. सातत्याने विकासासाठी निधी आणला. जिल्ह्यात होऊ घातलेला सी वर्ल्ड, विमानतळ, आय टी पार्क, पाटबंधारे, रस्ते विकास, पर्यटन आणि बंदर विकास यामधून लवकरच हा जिल्हा विकासात अग्रस्थानी असेल मोठया जिल्ह्यांशी हा जिल्हा स्पर्धा करेल. कुपोषण, दारिद्रय, निरक्षरता या जिल्ह्यात दिसणार नाही. जनतेचे दरडोई उत्पन्नही वाढलेले असेल.

यामधूनच हा छोटा जिल्हा आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले. डॉ. माधव गाडगीळ किंवा डॉ.कस्तुरीरंगन यांचे अहवाल येथील विकासास खीळ घालणारे असल्याने त्याला कडाडून विरोध केला जाईल यासाठी एकजूट दाखवली जाईल, असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग प्रशासनाने ई-ऑफिसमध्ये केलेली प्रगती कौतुकास पात्र ठरणारी आहे. मात्र जनतेच्या कामासाठी या यशामध्ये सातत्य ठेवा, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्हा पोलिस दलाचे दंगल नियंत्रण पथक, जलद कृती दल पथक, पोलीस, होमगार्ड, वनकर्मचारी, बॅडपथक यांचे संचालन झाले.
याच सोहळयात जिह्यातील पोलिस, गुणवंत खेळाडू, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version