Home महामुंबई सुनील प्रभूंचे बेगडी प्रेम

सुनील प्रभूंचे बेगडी प्रेम

0

काँग्रेसचे उमेदवार राजहंस सिंह यांच्याकडून मागील निवडणुकीत दारूण पराभव झालेले माजी महापौर सुनील प्रभू हे पुन्हा दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत.

मुंबई – काँग्रेसचे उमेदवार राजहंस सिंह यांच्याकडून मागील निवडणुकीत दारूण पराभव झालेले माजी महापौर सुनील प्रभू हे पुन्हा दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. परंतु प्रभू यांनी महापौरपदाच्या कालावधीत विकासकामांबाबत दिंडोशीकरांशी दुजाभाव केला. त्यांनी जास्तीत जास्त निधी जोगेश्वरी आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघाकडेच वळवला होता. त्यामुळे प्रत्यक्षात विकासकामांच्या बाबतीत दिंडोशीकडे दुर्लक्ष करणारे प्रभू आज विकासाच्या नावाखाली दिंडोशीकरांनाच मतांसाठी साकडे घालत आहेत. ७५ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी केवळ जोगेश्वरी आणि गोरेगावकडे वळवणा-या प्रभूंना दिडोंशीकरांनी माफ करायचे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीतील कामांसह विकासकामांकरता स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करताना प्रत्येक नगरसेवकांना नगरसेवक निधी आणि विकास निधी अशाप्रकारे स्थायी समितीत तरतूद करण्यात आली होती. तसेच महापौरांच्या विशेष निधीचाही अंतर्भाव करून अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. परंतु ही कामे ई-निविदा पद्धतीने करण्यास सर्वच स्तरातून विरोध झाल्यामुळे ५० टक्के कामे ही कंत्राटदार नेमून अर्थात ‘सीडब्ल्यूसी’च्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २४ विभाग कार्यालयांमधील सर्व नगरसेवकांसाठी १२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असताना प्रत्यक्षात त्या कंत्राटदारांवर ३६ कोटी ७० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात आला. या कंत्राटदारांना तब्बल १६२ कोटी रुपयांची कामे देण्यात आली. मात्र वाढलेल्या ३६ कोटी ७० लाख रुपयांपैकी ७५ लाख रुपयांच्या वाढीव खर्चाबरोबरच १ कोटी ३५ लाखांचा निधी केवळ पी-दक्षिण महापालिका विभाग कार्यालयांमध्ये खर्च करण्यात आला. यामध्ये प्रभाग क्रमांक ४७ चे नगरसेवक जितेंद्र वळवी आणि प्रभाग क्रमांक ४७ मध्ये म्हणजे स्वत:च्या प्रभागात सुनील प्रभू यांनी खर्च केले. महापौरांना विशेष निधी असल्यामुळे त्यांनी दिडोंशी मतदारसंघातील विकासकामांसाठी एकही पैसा दिला नाही.

गोरेगाव मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी निवडणूक न लढवल्यास त्याठिकाणी उडी मारण्याच्या तयारीत असल्याने प्रभूंनी गोरेगावमध्येच अधिक विकास निधी वळवला. परंतु प्रत्यक्षात दिंडोशीत हा निधी वळवणे शक्य असतानाही त्याचा वापर केला गेला नाही. गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी प्रभूंना आशा होती. मात्र पुन्हा एकदा दिंडोशीतूनच उमेदवारी मिळाल्याने त्यांची पंचायत झाली आहे. जर त्यांना दिंडोशीचा विकास करायचा असता, तर त्यांनी हा निधी तेथे वळवला असता. त्यामुळे महापौरपदी असताना विकासकामांकरता निधीही वळता न करणा-या प्रभूंना दिंडोशीकरांकडे मते मागण्याचा अधिकार आहे का, असे विचारले जात आहे. खुद्द विद्यमान आमदार राजहंस सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही प्रभूंच्या या भूमिकेबाबत चिंता व्यक्त केली. प्रभूंना दिंडोशीकरांबद्दल प्रेम नाही, हे त्यांनी दाखवून दिले असून ते कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version