Home मध्यंतर भन्नाट तणावाला दिला ब्रेक

तणावाला दिला ब्रेक

1

रोजच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा व्याप आणि ताण हा प्रत्येकालाच असतो. आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी प्रत्येक माणूस धावपळ करताना दिसतो. या कामाच्या रगाडय़ातून आणि तणावातुन मुक्त होण्यासाठी कधी तरी स्वत:ला वेळ द्यावा या हेतूने निसर्गाच्या सानिध्यात जातो. आमचंही काही असंच झालं. कॉलेज आणि ऑफिसमध्ये होणा-या तणावाला थोडा ब्रेक देण्यासाठी आम्ही वांगणी येथे जाण्याचा बेत आखला. निसर्गाच्या सानिध्यात स्वत:ला हरवून टाकण्यासाठी..

पावसाळ्यात भटकंतीला जाण्याची मजा काही वेगळीच! आम्हा सगळ्यांना फिरायला जायची इच्छा होती, पण नेहमीप्रमाणे वेळेच बंधन होतंच म्हणून आम्ही जवळच्याच ठिकाणी जाण्याचा बेत आखला. अंबरनाथ तालुक्यात वसलेलं वांगणी हे गाव पावसाळ्यात एक अप्रतिम रूप धारण करतं. यामुळे आम्ही वांगणीला जायचं निश्चित केलं. आम्ही पंधरा जण होतो. खरं तर आम्ही एकाच शाळतेले विद्यार्थी, पण आम्ही एका बॅचचे नाही. शाळेच्या काही कार्यक्रमांमुळे आमची ओळख झाली. आम्ही सगळे माजी विद्यार्थी. शाळेच्या काही उपक्रमांत आजही सहभागी होतो. शाळेच्या उपक्रमांमुळेच आमचा ग्रुप तयार झाला आणि आमची छान मैत्री झाली. आमच्या ग्रुपमधले काही जण सिनिअर्स आहेत. काही जण अजूनही कॉलेजमध्ये आहेत तर काही आपलं शिक्षण संपवून नोकरीधंद्याला लागलेत. असा काहीसा वेगळ्या कॉम्बिनेशनचा म्हणजेच वयांचा बराच फरक असलेला ग्रुप.

सगळ्यांच्या वेळेचा विचार करून आम्ही शनिवारी संध्याकाळी सातला दादर स्टेशनला भेटलो. वांगणीचा पल्ला गाठण्यासाठी आम्ही कोणत्याही खाजगी वाहतुकीतून न जाता सरळ ट्रेनने गेलो. वांगणीला पोहोचल्यानंतर आम्ही एका दाम्पत्याच्या घरी राहणार होतो. माझा मित्र सुरज या आधी वांगणीला जाऊन आला होता. त्यामुळे त्याने त्या दाम्पत्याला आमच्या येण्याची कल्पना दिली होती. हे दाम्पत्य राहण्याच्या, जेवण्याच्या सोयीपासून ते धबधब्याजवळ जाण्याच्या सोयीपर्यंतची सगळी सोय फक्त ११०० रुपयांमध्ये करतात. हो, बरं त्यात नाश्ता, रात्रीचं राहणं, जेवणं तर आलंच त्याशिवाय त्यांच्या घराजवळच तयार केलेल्या मैदानात अगदी गावच्या पद्धतीचा डिजेही त्यांनी आमच्यासाठी तयार करून घेतला होता, अशी साधी पण मस्त सोय केली होती. तिथे गेल्यानंतर आम्ही फ्रेश झालो. त्यांनी मांसाहारी खाणा-यांसाठी चिकन आणि भाकरी केली होती तर शुद्ध शाकाहारींसाठी डाळ, भात आणि वांग्याची भाजी आणि खीर असं साधासं पण चवीचं जेवणं तयार केलं. ऑफिस आणि कॉलेजमधून थेट वांगणीचा रस्ता पकडल्यामुळे भुकेने जीव मेटाकुटीला आला होता. त्यांनी जेवण आणल्यानंतर आम्ही त्या जेवणावर चांगलाच ताव मारला. पोटपूजा झाल्यानंतर आम्ही गाणी म्हणायला लागलो.

अंताक्षरी आणि वेगवेगळे खेळही खेळले. खेळगाण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर चार वाजेपर्यंत आम्ही गप्पाच मारत होतो. मग चार ते सात झोपलो.
दुस-या दिवशी धबधबा बघण्याचं ठरवलं होतं म्हणून आम्ही पटापट फ्रेश झालो. त्या घर मालकांनी आमच्यासाठी नाश्ता केला होता. ऑम्लेट-पाव आणि पोहे खाऊन आम्ही निघालो. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी बसची सोय असल्यामुळे आम्ही बसमध्ये बसलो. वांगणीतला पण कर्जतच्या हद्दीत असलेला भगीरथ धबधबा पाहून डोळे अगदी सुखावतात. वांगणी हे गावच मुळत: सुंदर त्यात ते आकाशदर्शनासाठी तर खूप प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात इथल्या डोंगरातून अक्षरश: पालवीसारखे धबधबे फुटतात. भागीरथ हा धबधबा तसा इतर धबधब्यांपेक्षा सुरक्षित आहे.

खरं तर या धबधब्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तर सरळ आणि दुसरा वाटा तुडवणारा. वाटा तुडवत जाताना ट्रेकिंगचाही आनंद मिळतो. पण आम्ही बसने गेलो होतो म्हणून आम्ही काहीच क्षणात धबधब्यावर पोहोचलो. मुसळधार पाऊस आणि त्या पावसात ओसंडून वाहणारा धबधबा. खरंच त्या धबधब्याखाली उभं राहिल्यानंतर कळलं की निसर्गाच्या सहवासात गेल्यावर आपल्या डोक्यावर असलेला तणाव कसा कमी होतो. असं वाटतं सगळं काही सोडून इथेच बसावं. आम्ही काही वेळ त्या धबधब्याखाली बसलो. थोडी मजा केली. पावसाचा आणि धबधब्याचा आनंद लुटत व्हॉटस् अॅप आणि फेसबुकवर डीपीचे फोटो ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढले. त्या धबधब्याचा क्षणिक आनंद घेत आम्ही परतीची वाट पकडली. त्या धबधब्याखाली मिळालेलं सुख हे खरंच अप्रतिम होतं.

शब्दांकन : श्रद्धा-कदम पाटकर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version