Home किलबिल सू शीचा वांधा डायपर बांधा

सू शीचा वांधा डायपर बांधा

1

तान्ह्या बाळांच्या कधीही सू व शी करण्याच्या सवयीमुळे अनेकदा पंचाईत होते. विशेषत: प्रवासात वगैरे बाळांनी असं काही केलं तर आई-बाबांची धांदल उडते. डायपरमुळे मुलांनी सू-शी कधीही केली तरी काळजी नसते. नंतर जमेल तेव्हा डायपर काढून बाळांना स्वच्छ करता येतं. डायपरला ‘नॅपी’ असाही शब्द आहे. गंमत म्हणजे, हल्ली डायपर वापरण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी त्याचा शोध अलीकडचा नाही तर मनुष्य डायपरचा वापर फार पूर्वीपासून करत असावा, असं म्हटलं जातं. फक्त त्यांचं स्वरूप आताच्या डायपरसारखं नव्हतं.

तान्हुली बाळं तुम्हाला आवडतात का? आम्हाला माहितीय, ती खूप आवडत असणार. कारण ती सगळ्यांनाच आवडतात. तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूलाही कदाचित एखादं गोंडस-गोजिरवाणं बाळ असेल. त्याचे लाड करताना, त्यांच्याशी बोबड्या भाषेत बोलताना तुम्हाला खूप आनंद मिळत असणार. कधीकधी या तानुल्याला तुम्ही कौतुकाने आपल्या हातातही घेत असणार. मग घरातले मोठे तुम्हाला, ‘अरे, त्याला नीट पकड हं. धांदरटपणा करू नको.’ अशा सूचना करत असतील. तरीही तुम्ही त्याला काळजीपूर्वक पकडून, आपण त्याला नीट घेऊ शकतो, असं दाखवून देत असणार. पण कधीकधी बाळं मोठा घोटाळा करतात बुवा. कौतुकाने एखाद्याने त्यांना घेतलं की, सू करून आपली फजिती करून टाकतात. त्यानंतर ‘कशी फजिती झाली’ म्हणून सगळेच हसतात आणि आपली अवस्था केविलवाणी होते. बाळ आपलं जणू काही झालंच नाही, अशा आविर्भावात टकामका बघत असतं. बिचाऱ्याला कुठे काय करायचं आणि कुठे काय करायचं नाही, ते कसं कळणार? म्हणूनच बाळाने अशी कुणाची फजिती करू नये, म्हणून त्यांच्या आया त्यांना डायपर बांधतात. डायपर बांधला की, त्याने सू किंवा शी केली तरी त्यांचे व इतरांचे कपडे खराब होत नाहीत आणि बाळांनाही ओल्यात राहावं लागत नाही.

तान्ह्या बाळांच्या कधीही सू व शी करण्याच्या सवयीमुळे अनेकदा पंचाईत होते. विशेषत: प्रवासात वगैरे बाळांनी असं काही केलं तर आई-बाबांची धांदल उडते. डायपरमुळे मुलांनी सू-शी कधीही केली तरी काळजी नसते. नंतर जमेल तेव्हा डायपर काढून बाळांना स्वच्छ करता येतं.

डायपरला ‘नॅपी’ असाही शब्द आहे. गंमत म्हणजे, हल्ली डायपर वापरण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी त्याचा शोध अलीकडचा नाही तर मनुष्य डायपरचा वापर फार पूर्वीपासून करत असावा, असं म्हटलं जातं. फक्त त्यांचं स्वरूप आताच्या डायपरसारखं नव्हतं. पूर्वी ते कापडापासून बनवलं जायचं. ते सेफ्टी पिनने बाळाच्या ढुंगणाभोवती बांधलं जायचं. रबरापासून बनवलेल्या पँट्सही वापरल्या जायच्या, परंतु बाळाच्या त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होतो, असं डॉक्टर मंडळींचं मत असल्याने त्यांना जास्त लोकप्रियता लाभली नाही. कापडाचे डायपर वापरल्यानंतर धुवून पुन्हा वापरले जात. विसाव्या शतकात या कापडी डायपरमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू झाले. त्यातून 1946 मध्ये मरियन डोनोव्हन या अमेरिकन महिलेनं पहिला ‘डिस्पोजेबल’ डायपर बनवला. मरियनचं सगळं कुटुंब नवनव्या गोष्टी तयार करण्यात पारंगत होतं. तिचे वडील आणि भाऊ यांनी इंडस्ट्रीयल लेद मशिनचा शोध लावला होता. मरीयन स्वत:ही अतिशय हुशार होती. तिने इंग्लिश साहित्य हा विषय घेऊन बी.ए. केलं होतं. वयाच्या सातव्या वर्षी आपल्या आईचं निधन झाल्यानंतर ती दिवसभर तिच्या वडिलांच्या फॅक्टरीत असे. त्यानंतर तिने आधी ‘हार्पर बझार’ या मासिकासाठी आणि नंतर असिस्टंट ब्युटी एडिटर म्हणून ‘व्होग’ नियतकालिकासाठी काम केलं. लग्नानंतर तिने नोकरी सोडली. 

नोकरी सोडणं हे तिच्या कारकिर्दीच्या पथ्यावरच पडलं. कारण तिला नवनव्या गोष्टी शोधण्यासाठी फावला वेळ मिळू लागला. त्यावेळी बाजारात मिळणारे डायपर लिक होऊ नयेत यासाठी त्यांच्यावर रबर पँट घातल्या जायच्या. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर ओरखडे पडायचे. हे लक्षात घेऊन तिने नवे, अधिक चांगले डायपर शोधायला घेतले. तिने सुरुवातीला डायपरना वॉटरप्रूफ पडदे (शॉवर कर्टन) वापरून पहिला प्रयोग केला. त्यानंतर तिने अनेक प्रकारचं कापड वापरून पाहिलं. शेवटी पॅराशूट नायलॉन हा सर्वोत्कृष्ट उपाय असल्याचं तिच्या लक्षात आलं. 1949 मध्ये तिने लीक-प्रूफ नॅप्पी बाजारात विकायला आणले. 

दरम्यान डायपरमध्ये आणखी सुधारणा करून बाहेरून लीक-प्रूफ आवरण असलेले डिस्पोजेबल पेपर डायपर शोधून काढले. हे डायपर लोकांना एवढे आवडले की, त्यांना जबरदस्त मागणी मिळू लागली. मरियनला ती पुरवणं अवघड होऊ लागलं. शेवटी तिने आपल्या पेटंटचे हक्क एक लाख डॉलर्सला केको कार्पोरेशन या कंपनीला विकले. ही कंपनी डायपरचं मोठय़ा प्रमाणात उत्पादन करू लागली.

मरीयनच्या डिस्पोजेबल डयपरचा एक दोष असा होता की, ते बायोडिग्रेडेबल (विघटनशील) नव्हतं. 1961 मध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीने ‘बायोडिग्रेडेबल’ डायपर आणल्यावर मरीयनच्या डायपरची लोकप्रियता घटली. मरीयनने पुढे बिग बँग-अप (एकावेळी अनेक कपडे लटकवण्याचा लहान आकाराचा हँगर) आणि झिपीटी डू (ड्रेसला आवळायची दोरी) यांचाही शोध लावला.

साठच्या दशकात बाजारात मोठय़ा प्रमाणावर उत्पादन सुरू झालं आणि प्रॉक्टर अँड गॅम्बलचे ‘पॅम्पर्स’ आणि किंबर्ली क्लार्कचे ‘हगीज’ ही दोन डायपरची खूप विक्री होऊ लागली. परिणामी डायपरची किंमत कमी होऊन त्यांचं रंगरूपही बदलून गेलं. ही डायपर मुलांना अगदी फिट कशी बसतील आणि ती लिक कशी होणार नाहीत, यादृष्टीने डायपरमध्ये सुधारणा होऊ लागली. 1966 मध्ये सोडियम पॉलिक्रिलेटसारख्या सुपरअ‍ॅब्सॉबट मटेरियलचा वापर सुरू झाला आणि डायपरची ओलेपणा शोषून घेण्याची क्षमता वाढली.

सध्या बाजारात मिळणारे डायपर सुपरअ‍ॅब्सॉबट पॉलिमरपासून तयार केले जातात. पूर्वीच्या तुलनेत आताचे डायपर कमी जाडीचे असतात, पण त्याची शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. आता तर डायपर पँटही आल्यात. त्या अंडरवेअरसारख्या वापरता येतात. अर्थात कापडाचे डायपर आजही बाजारात मिळतात. 

डायपर केवळ लहान मुलांसाठी असतात, असा आपला समज आहे, परंतु वाचून आश्चर्य वाटेल, अपवादात्मक परिस्थितीत मोठेही त्यांचा वापर करू शकतात. असे मोठ्यांचे डायपरही बाजारात मिळतात. अंतराळात जाणा-या अंतराळवीरांनाही डायपर वापरावे लागतात. डायपरमुळे मुलांच्या त्वचेवर ओरखडे पडतात, या कारणास्तव त्यांना विरोधही केला जातो. तरीही डायपरमुळे जी सोय होते ती खूप मोठी असल्याने डायपर वापरण्याला प्राधान्य दिलं जातं. 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version