Home संपादकीय अग्रलेख सेनेचा महाराष्ट्रात पिक्चर बाकी

सेनेचा महाराष्ट्रात पिक्चर बाकी

1

राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आलेल्या अपयशानंतर विरोधकांबरोबर शिवसेनेनेही टीका केलेली आहे.

शिवसेनेचे खासदार असलेले आणि सध्या काँग्रेसच्या नाहीतर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणा-या संजय राऊत यांनी ही टीका केलेली आहे. त्यामुळे ही टीका शिवसेनेची की, फक्त राऊत यांची हा प्रश्नच आहे. याचे कारण शिवसेनेत असलेली गटबाजी आणि मतभेद यामुळे संजय राऊत यांच्या मताशी सहमत किती आमदार, खासदार आहेत याचा शोध अजून सेनेने घेतलेला दिसत नाही. तरीही भाजपच्या अपयशावर टीका करून स्वबळाचा बाण सोडल्याची भाषा ते करत आहेत. ‘गुजरात ट्रेलर, राजस्थान इंटरव्हल आणि पिक्चर अजून बाकी है’ म्हणणा-या संजय राऊत यांनी गुजरातमध्ये शिवसेनेच्या ४० उमेदवारांचा ट्रेलर दाखवून महाराष्ट्रात पिक्चर बाकी करणार काय, याचा विचार करावा. जेव्हा बोलणी आणि करणी एक असते, तेव्हा स्वबळाची भाषा शोभते. आज सेनेच्या नेत्यांची अवस्था ही ‘गर्जेल तो पडेल काय’ अशी झालेली आहे. संजय राऊत जे बोलतात त्याला पक्षात कितपत किंमत आहे हा प्रश्नच आहे. सत्तेत राहूनही सतत सरकारवर टीका करण्याचा ते करत असलेला विनोद आता त्यांचे हसे करत आहे. सरकारमधून बाहेर पडणार, बाहेर पडणार अशी सतत धमकी देऊन शिवसेना आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. ही सेनेची धडपड अत्यंत हास्यास्पद आणि केविलवाणी अशी आहे. कोणताही मुद्दा नसला की, सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी द्यायची हा एकच अजेंडा शिवसेनेपुढे आहे. कधी राजीनामे खिशात आहेत असे बोलायचे, तर कधी सरकारच्या धोरणावर टीका करायची. सहा महिने राजीनामे खिशात ठेवून घालवले. एक वर्ष लवकरच सत्तेतून बाहेर पडणार हे जाहीर करून घालवले. शिवसेना पक्षप्रमुख वेगळेच काहीतरी बोलतात. या अधिवेशनानंतर बाहेर पडणार, नव्या वर्षात आम्ही वेगळे होऊ, असा कांगावा करूनही झाला. त्यामुळे शिवसेनेची राज्यभर दयनीय अवस्था झालेली आहे. स्थानिक पातळीवरही पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेमके काय करावे हे न समजल्याने कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. पण, केबिनमध्ये बसून भाजपविरोधी बाण सोडणा-या संजय राऊत यांना त्याची फिकीर नाही की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्याची काळजी नाही. अशा भरकटलेल्या अवस्थेत हवेतले बाण सोडून शिवसेनेची अवस्था ‘हवाबाण हर डे’ अशी झालेली आहे. मागच्या आठवडय़ात नव्या नेत्यांच्या निवडी झाल्या. प्रवक्त्यांच्या नेमणुका झाल्या. पण प्रवक्ते, नेते, पक्षप्रमुख आणि संजय राऊत यांची मते वेगवेगळी आहेत. जे सत्तेत आहेत, ज्यांच्याकडे मंत्रिपदे आहेत, त्यांना सत्तेची ऊब हवी आहे. त्यामुळे ते जी मते जाहीर करतात ती संजय राऊत यांच्या मतापेक्षा भिन्न असतात. त्यामुळे शिवसेनेच्या भरकटलेपणाचे दर्शन सातत्याने होताना दिसते आहे. संजय राऊत म्हणतात, स्वबळाचा बाण आता सुटला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तडजोड नाही. पण, हा बाण धनुष्यापासून सुटला आहे का, असा प्रश्न आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्य बाण आहे. धनुष्यापासून वेगळ्या विचारांचा शिवसेना आमदार, खासदारांचा बाण सुटला आहे, हेच वास्तव आहे. बाण सुटला आहे तर सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. सत्तेतून बाहेर पडायचे नाही. सत्तेची फळे चाखायची. सरकारवर टीकाही करायची. या दुतोंडीपणाला काय म्हणायचे? अर्थसंकल्पावर शिवसेनेने भरपूर टीका केली. केवळ टीका करायची, विरोध करायचा म्हणून अर्थहीन शब्दांचे बाण सोडण्याचे काम शिवसेनेकडून होताना दिसत आहेत. ‘गुजरात हा ट्रेलर होता, राजस्थान इंटरव्हल आहे, अजून पिक्चर बाकी है’ असे संजय राऊत म्हणतात. पण, याच गुजरातमध्ये शिवसेनेने ४० जागा लढवल्या होत्या. तिथे एकाही उमेदवाराचे डिपॉझिट शिवसेनेला वाचवता आले नाही. हा शिवसेनेचा ट्रेलर होता का? कर्नाटकातही निवडणुका लढवण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. तिथे उमेदवार तरी मिळणार आहेत का? गोव्यासारख्या मराठी भाषिकांच्या राज्यातही शिवसेनेने घुसण्याचा प्रयत्न केला. तिथेही सेनेला इतकी कमी मते पडली की, पुन्हा गोव्याचे नावही ते काढणार नाहीत. हा ट्रेलर शिवसेनेने पाहिला असेल तर महाराष्ट्रातला आगामी पिक्चर कसा असेल? सध्या जे शिवसेनेचे १८ खासदार आहेत, त्यापैकी बहुसंख्य खासदार हे मोदी लाटेत २०१४ ला निवडून आले आहेत. तेव्हा असे चित्र होते की, मोदींना मतदान करण्यासाठी म्हणून त्यांचे समर्थक असलेल्या शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे कधी नव्हे इतके खासदार शिवसेनेला निवडून आणता आले. तेव्हा जर लोकसभेला शिवसेना-भाजप युती नसती तर हे खासदारही कदाचित भाजपचेच असते. शिवसेनेची ताकद लावून हे खासदार निवडून आले असते तर त्यानंतर सहाच महिन्यांनी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सेनेचे १०० पेक्षा जास्त आमदार निवडून यायला हवे होते. जागा वाटपात जितक्या जागा देण्यास सेनेने भाजपला विरोध केला आणि युती मोडली त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्या. हा ट्रेलर शिवसेनेने पाहिला तर भाजपशिवाय लोकसभेत आपले खासदार निवडून येणार नाहीत, हाच पिक्चर दिसेल. एखादा राजा घोडय़ावरून दिमाखात येत असेल तर त्याला सगळे मुजरा करतात. पण, त्या घोडय़ाला वाटते हा मुजरा मलाच आहे. त्यामुळे आपल्या पाठीवर बसलेल्या राजाला पाडायचा प्रयत्न करण्यासाठी घोडा उधळायचा प्रयत्न करतो. मग चाबकाचे फटके बसल्यावर वठणीवर येतो. नेमकी अशीच अवस्था शिवसेनेची झालेली आहे. नुसता घोडा मिरवून बघा, लोक हाकलल्याशिवाय राहणार नाहीत. आज सत्तेत असलेल्या सेनेच्या मंत्र्यांना आपले अस्तित्व कोणामुळे आहे हे माहीत आहे. त्यामुळे ते सरकारचे गोडवे गात आहेत. तर सत्तेत नसलेले आणि कसलाही अनुभव नसलेले नुसत्याच डरकाळ्या फोडत आहेत. आता डरकाळ्या फोडून फोडून पुरता आवाज बसला आहे. त्यामुळे तो कोणाला ऐकायलाही जात नाही आणि त्या आवाजाने कोणी घाबरतही नाही.

1 COMMENT

  1. अगदी बरोबर आहे , सेना स्वतंत्र लढली तर 5 ते 6 जागाच येतील सर्व विचार करून निर्णय घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version