Home Uncategorized सेन्सेक्समध्ये २३० अंकांची घसरण, घोडदौड थांबली

सेन्सेक्समध्ये २३० अंकांची घसरण, घोडदौड थांबली

0

अर्थसंकल्पावर डाव लावणा-या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी अचानक सावध पवित्रा घेत नफेखोरी केली आणि सलग सात दिवसांची तेजीची मालिका खंडित केली.

मुंबई- अर्थसंकल्पावर डाव लावणा-या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी अचानक सावध पवित्रा घेत नफेखोरी केली आणि सलग सात दिवसांची तेजीची मालिका खंडित केली.

पेट्रोलियम खात्यातील दस्तावेज चोरीप्रकरणी रिलायन्सच्या कर्मचा-याचे नाव आल्याने कंपनीचा शेअर आपटला. याचे एकूणच पडसाद बाजारात उमटले. सेन्सेक्सने २३०.८६ अंकांची आपटी खाल्ली, तर निफ्टी ६१.७० अंकांनी घसरला. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २९,२३१.४१ आणि ८,८३३.६०वर बंद झाले. दरम्यान, रुपया डॉलरसमोर १२ पैशांनी वधारून ६२.२२ वर बंद झाला.

मागच्या सात सत्रांमध्ये सेन्सेक्सने १२३४.८८ अंकांची चढाई केली होती. अर्थसंकल्पाकडून वाढत जाणा-या गुंतवणूकदारांच्या अपेक्षांचा प्रभाव बाजारावर पडत होता. यामुळे वधारलेल्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने बाजाराला फटका बसला. युरोझोन सदस्यांची ग्रीसबरोबर होणारी चर्चा युरोपमधील बाजारांना सावध सुरुवात करून देणारी ठरली. आशिया बाजरात मात्र बहुतेक निर्देशांक वधारले.

रिलायन्स (५७.१७ अंक), आयसीआयसीआय बँक (४९.३७ अंक), इन्फोसिस (४७.२१ अंक), एचडीएफसी (३५.६९ अंक) आणि एलअँडटी (२०.७६ अंक) यांचे सेन्सेक्समधील घसरणीत सर्वाधिक योगदान राहिले. दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी गुरुवारी १५४२.७० कोटी रुपयांची शेअर खरेदी केली. मात्र देशांतर्ग संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १९५.७४ कोटी रुपयांची विक्री केली.

सेन्सेक्समधील ३० पैकी २३ शेअरमध्ये घसरण झाली, अवघे सात शेअरच घसरणीपासून वाचले. फ्रान्स, जर्मनी यांच्या शेअर बाजारांमध्ये ०.२० ते ०.२४ टक्क्यांची घसरणीसह व्यवहार करत होते. ब्रिटनचा शेअर बाजारात किरकोळ वाढ दिसत होती. दरम्यान, आशिया बाजारात जपानच्या निक्केई २२५ने दिवसभरात १५ वर्षाच्या उच्चांकी स्तराला स्पर्श केला. तर चिनी बाजार नववर्षानिमित्त बंद होते.

भारतीय बाजारात कमजोरी राहिली. रिलायन्स, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांसारख्या ब्लूचिप कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. मात्र भेल, आयटीसी आणि टाटा मोटर्स यांच्या शेअरमधील वाढीने आणखी घसरणीपासून वाचवले. – जिग्नेश चौधरी, संशोधनप्रमुख, वेरासिटी ब्रोकिंग सव्‍‌र्हिसेस

‘स्पाईसजेट’च्या पंखात बळ

स्पाईसजेटमधील व्यवस्थापन नियंत्रण बदलाला हिरवा कंदिल देत भारतीय आयोगाने या कंपनीतील नव्या गुंतवणुकीचा मार्ग आणखी प्रशस्त केला. या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर १९.८० टक्क्यांनी वधारून २३.९० रुपयांवर बंद झाला. या वाढीमुळे कंपनीचे बाजार मूल्य २३७.६९ कोटी रुपयांनी वधारून १,४३२.६९ कोटींवर गेले. दिवसभरात कंपनीच्या ३०८ लाख शेअरची खरेदी-विक्री झाली. मारन यांच्याकडून ५८ टक्के हिस्सा खरेदी व्यवहार पूर्ण केल्यानंतर पुनरुज्जीवन योजनेनुसार अजय सिंग कंपनीत १५०० कोटी रुपयांचा भांडवल भरणा करणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीची आपटी

पेट्रोलियम खात्यातील महत्त्वाची माहिती पुरवल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजचा कर्मचारी चौकशीच्या फे-यात आल्याने कंपनीचा शेअर बीएसईवर ३.२३ टक्क्यांनी घटून ८७२.२० रुपयांवर बंद झाला. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रिलायन्सच्या कर्मचा-यांला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. एनएसईवर हा शेअर ३.४ टक्क्यांनी घटून ८७१.३० रुपयांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकामध्ये हा शेअर सर्वाधिक घसरणीचा धनी ठरला.

निफ्टीतून डीएलएफ, जिंदाल स्टीलला डच्चू

बांधकाम क्षेत्रातील बडी कंपनी डीएलएफ आणि नवीन जिंदाल यांची जिंदाल स्टील अँड पॉवर या कंपन्यांना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतून २७ मार्चपासून डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी दूरसंपर्क कंपनी आयडिया सेल्युलर आणि खासगी बँक येस बँकेला स्थान देण्यात आले. निफ्टी निर्देशांक ठरवणा-या इंडिया इंडेक्स सव्‍‌र्हिसेस अँड प्रॉडक्ट्स लिमिटेडने शुक्रवारी याची माहिती दिली. डीएलएफ आणि जिंदाल स्टीलला सीएनएक्स १०० निर्देशांकातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याबदल्यात इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स आणि युनायटेड स्पिरिटने जागा घेतली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version