Home मजेत मस्त तंदुरुस्त स्थूलपणा आणि आयुर्वेद

स्थूलपणा आणि आयुर्वेद

3

बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडे तारुण्यातच लठ्ठ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शरीरातील प्रत्येक अवयव ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे. अन्यथा वेगवेगळे विकार आपली सोबत करू शकतात. स्थूलपणावर आयुर्वेदात उपाय आहेत. त्याचा वापर केल्यास आपलं शरीर बेढब होणार नाही.

सडपातळ, लवचिक शरीर हे तारुण्याचं एक लक्षण असतं. ही देणगी नसणारी व्यक्ती तरुण असली तरीही तरुण वाटत नाही. आजकाल तर फिजिकल फिटनेसचा जमाना आहे. त्यामुळे शरीर सडपातळ ठेवण्याकडे, त्यासाठी व्यायाम, डाएटिंग वगरे करण्याकडे अनेकांचा कल असतो. आयुर्वेदही या दृष्टीने व्यक्तीला अत्यंत उपयुक्त मदत करू शकतो.

वेळीच काळजी घेतल्यास लठ्ठपणा आटोक्यात आणता येतो. मात्र त्यासाठी आहार, विहार आणि उपचार यांची योग्य दिशा ठरवायला हवी. काही नियमांचं काटेकोर पालन करायला हवं. पथ्यपाणी, व्यायाम, औषधी उपाययोजना यांचा विचार रुग्ण अगोदर का करीत नाहीत? स्थूलपणाचं मूळ कारण कफ या दोषाच्या प्रवत्तीत आहे. कफ म्हणजे मंद, सावकाश, मुंगीच्या गतीने हालचाल. त्यामुळे मेद, चरबी वाढतेय हे लक्षात येईपर्यंत बराच वेळ झालेला असतो. त्यानंतर मनुष्य थोडा आळस आणि चुकीचे उपचार करतो. मग मात्र रोग पक्कं घर करून बसतो. काही पालकांना त्यांची मुलं लठ्ठ होत आहेत हेच पटत नाही. आपली मुलं सुदृढ आहेत असंच त्यांना वाटतं. सुदृढ आणि सुजलेलं शरीर यातील फरक त्यांच्या लक्षात येत नाही.

आनुवंशिकता आणि बीजदोष ही लठ्ठपणाच्या दृष्टीने गुंतागुंतीची कारणं असतात. मुलांकडे नीट लक्ष देणं, त्यांच्यावर अवाजवी बंधनं घालणं यामुळेही त्यांच्या शरीरात चरबी साठू लागते. आजचं जीवन यांत्रिक बनलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी विनाश्रम मिळण्याची व्यवस्था झाली आहे. व्यायामाचा, हालचालीचा अभाव, बैठं काम आणि सुखासीन जीवन हा अनेकांचा जीवनक्रम बनला आहे. मेद वाढवणारी दुपारची झोपही त्यात येतेच. थंड, जड, गोड, आंबट खारट पदार्थाचा अतिरेकी वापरही लठ्ठपणा वाढवायला कारण ठरतो. मेदवर्धक आणि मांसवर्धक पदार्थाचा अतिरेकी आहारही त्यात भर घालतो. कारण त्यामुळे फक्त मेद, मांसधातूचं पोषण अधिक होतं.

फास्ट फूडच्या नावाखाली अलीकडे अनेक जण पोटात वाट्टेल ते ढकलत असतात. त्यात मांसाहार, मद्यपान, आइस्क्रीम, मेवामिठाईचा आस्वाद यांची भर पडते. तेलकट, तूपकट आहारही लठ्ठपणाच्या दृष्टीने हानिकारक असतो. खाण्यात गहू, हरभरा, कडधान्य, कांदा, बटाटा, साखर यांचं प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असणं हेही मेदवाढीचं एक महत्त्वाचं कारण ठरतं.

अनेक स्त्रियांना विटाळ कमी जातो, पाळी अनियमित असते. त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. पाळी चुकवण्यासाठी गोळ्या, औषधं घेणं किती हानिकारक ठरत असेल याची कल्पना केलेली बरी. उपाययोजना करण्यासाठी या कारणांचा शोध घेणं आणि लक्षणं समजावून घेणं अर्थातच आवश्यक आहे.

लठ्ठपणाच्या विकाराची काही प्रमुख लक्षणं उंचीच्या मानाने वजन जास्त असणं, पोट, छाती, कुल्ले, मांडया मान या ठिकाणी बेढबपणा येणं, थोडयाशा श्रमाने धाप लागणं, पायावर, चेह-यावर सूज येणं, लघवी कमी होणं, लघवीला पुन्हा पुन्हा जावं लागणं, स्त्रियांना विटाळ कमी जाणं, अंगाला खाज सुटणं, त्वचा फाजील स्निग्ध दिसणं, कार्यशक्ती कमी होणं, विश्रांती घ्यावीशी वाटणं, जास्त झोप येणं, अंगाला घाण वास मारणं अशी लठ्ठपणा येण्याची लक्षणं असू शकतात. लठ्ठपणावर उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम वजन पाहणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर कोणते स्नायू शिथिल आहेत, कुठे चरबी वाढली आहे हेही पाहायला हवं, त्यामुळे नेमका व्यायाम सुचवणं सोपं जातं.

मलमूत्र, घाम यांचा वेग आणि परिणाम पाहणंही आवश्यक आहे. लागलेली भूक, घेतलेला आहार आणि प्यायलेलं पाणी यामानाने मल, मूत्र आणि घाम यांचा निचरा होत नसेल तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात होणारच. स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या अनियमितपणाचा हाच परिणाम संभवतो. लठ्ठपणा, स्थूलता किती जास्त आहे हे ठरवण्यासाठी आनुवंशिकतेचा विचार उपयोगी पडतो. मलमूत्र साफ होण्यासाठी शोधनाचे उपचार उपयोगी पडतात. स्त्रियांची पाळी नियमित होण्यासाठी उपचार करावे लागतात. शरीरातून पुरेसा घाम निघत नसेल तर त्यासाठीही उपाय योजता येतात. रुक्ष अभ्यंग, व्यायाम यांचे नाना प्रकार उपयोगात आणता येतात. मात्र उपवास, लंघन, अशा उपायांनी थकवा, रसक्षय आणि पंडुता येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

आयुर्वेदात लठ्ठपणावर काही अनुभविक उपचार आहेत. मलप्रवृत्ती साफ होत नसल्यास कपिलादी वटी सहा गोळ्या आणि एक चमचा एरंडहरीतकी चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावं. त्रिफळा गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी प्रत्येकी सहा गोळ्या अशा बारा गोळ्या दोन वेळा रिकाम्या पोटी सकाळी आणि सायंकाळी बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. पाणी पिऊनही लघवी नियमित होत नसल्यास वरीलप्रमाणे औषधं घ्यावीत. रसायन चूर्ण सकाळी आणि सायंकाळी एक चमचा घ्यावं. मासिक पाळीत गर्भाशयाची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्यास कुमारी आसव चार चमचे समभाग पाण्याबरोबर दोन्ही जेवणांनंतर घ्यावं.

स्थूल शरीराबरोबर गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, आमवात ही लक्षणं असल्यास त्रिफळा गुग्गुळ, लाक्षादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून सकाळी आणि सायंकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. दोन्ही जेवणांनंतर सौभाग्य सुंठ अर्धा चमचा घ्यावी. पंडुता, मुखशोध, पादशोध या तक्रारी असल्यास चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ आणि लाक्षादि गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. शुद्ध गुग्गुळ गोळ्या सकाळी, सायंकाळी आणि रात्री तीन वेळा अशा सहा गोळ्या पाण्यात विरघळवून घ्याव्यात. यामुळे शरीरात उष्णता वाढते. ज्यांना मानवेल त्यांनीच घ्यावं. चांगला कात तीन ग्रॅम, गुग्गुळ दहा ग्रॅम असं सकाळ, सायंकाळ दोन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावं.

पुरेसा घाम येत नसल्याने स्थूलपण वाढलेला असल्यास त्रिफळा, वाविडग चित्रक, नागरमोथा, दशमुळं, बाहवा, एरंडमूळ, देवदार आणि दारुहळद प्रत्येकी दोन ग्रॅम अशी एक पुडी चार कप पाण्यात उकळून त्याचा काढा एक कप उकळवून गाळावा. तो सकाळी घ्यावा. पुन्हा उरलेला चोथा सायंकाळी पाण्यात उकळून आटवावा. अर्धा कप उरल्यावर गाळून घ्यावा. नुसता उकडलेला दुध्या भोपळा किंचित मिरपूड टाकून घ्यावा. ज्वारीची भाकरी आणि पालेभाज्यांचं सूप यावर राहण्याचा प्रयत्न करावा.

आयुर्वेद उपचार घेताना त्याच्याबरोबर पथ्य पाळणंही आवश्यक असतं. लठ्ठपणावर उपचार सुरू केल्यावर गोड, आंबट, थंड आणि जड पदार्थ आहारातून बंद करावेत. पाणीसुद्धा कमी प्यावं, तेही उकळून गार केलेलं असावं. वनस्पतीतूप, दही, साखर, बटाटा, कांदा, चवळी, मटकी, वाटाणा, हरभरा, गहू, तूप, दूध, पोहे, चुरमुरे, तळलेले पदार्थ, मांसाहार लोणची, पापड, थंड पेयं, आइस्क्रीम, चॉकलेट आदी गोष्टीही कटाक्षाने टाळाव्यात. एवढे पदार्थ टाळल्यावर खायचं काय, हा प्रश्न पडला असेल. भाजलेल्या, ज्वारीची भाकरी, मुगाची पातळ आमटी, दुध्याभोपळा, कोहळा, दोडका, पडवळ, कारलं, शेवगा, राजगिरा या भाज्यांचा आहारात वापर करावा. पाणी जेवणाअगोदर प्यावं. जेवणानंतर पिऊ नये. दुपारची झोप सुस्ती वाढवते. बैठं काम टाळावं. पण पर्यायच नसेल तर त्याला पुरेशा व्यायामाची जोड द्यावी. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. शतपावलीची सवय चांगली. पण ती पंधराशे ते अडीच हजार पावलांची असावी.

लठ्ठपणावर उपचार सुरू केल्यावर साध्या साध्या बाबतीत दक्षता बाळगल्यास त्याचा खूप उपयोग होतो. उदाहरणार्थ, भूक आणि तहान मारायला शिकावं. ठरवून काम, व्याप, श्रम यामध्ये सतत बुडलेलं असावं. शरीरातून भरपूर घाम निघाला पाहिजे. दुपारची झोप तर टाळावीच, पण अनुषंगाने येणारं विलासी आणि ऐषारामी जीवनही न जगण्याचा निर्धार करावा. लठ्ठपणा हा तारुण्याची हानी करणारा असतो. म्हणून ते टिकवायचं असेल तर लठ्ठपणा शरीराचा ताबा घेणार नाही हे कटाक्षाने पाहायला हवं.

3 COMMENTS

  1. मी लठ्ठपणामुळे खूप नुकसान सहन करत आहे प्रयत्न करते पण यश येत नाही आजार वाढत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version