Home महामुंबई ठाणे ‘स्वाभिमान’ची नोकरी एक्स्प्रेस ठाणे जिल्ह्यात

‘स्वाभिमान’ची नोकरी एक्स्प्रेस ठाणे जिल्ह्यात

0

‘तुमचे रक्त नको, महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम हवा’ अशा घोषवाक्याखाली तीन वर्षापूर्वी मुंबईतील अनेक तरुणांना रोजगार मिळवून देणारी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ‘नोकरी एक्स्प्रेस’ मंगळवारी प्रथमच ठाणे जिल्ह्यात दाखल झाली.

उल्हासनगर- ‘तुमचे रक्त नको, महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम हवा’ अशा घोषवाक्याखाली तीन वर्षापूर्वी मुंबईतील अनेक तरुणांना रोजगार मिळवून देणारी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ‘नोकरी एक्स्प्रेस’ मंगळवारी प्रथमच ठाणे जिल्ह्यात दाखल झाली. उल्हासनगरमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल २०० तरुणांना १० ते २५ हजार रुपयांपर्यंतच्या नोक-या मिळवून देण्यात ‘स्वाभिमान’ संघटनेला यश आले असून ही एक्स्प्रेस पुढील महिनाभर अवघा ठाणे जिल्हा पिंजून काढणार आहे.

तीन वर्षापूर्वी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुंबईत अतिभव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी एका दिवसात २५ हजार युवक-युवतींना रोजगार प्राप्त करून देण्यात आला होता. त्यावेळी नोकरी एक्स्प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्गम भागात जाऊन त्यांना रोजगार देण्यासाठी नवीन संकल्पना आकारास आली होती. या संकल्पनेअंतर्गत नोकरी एक्स्प्रेस मंगळवारी ठाणे जिल्हा संघटक रोहित साळवे यांच्या उल्हासनगर, कुर्ला कॅम्प येथील कार्यालयात येऊन धडकली. या एक्स्प्रेसनिमित्त सुरू झालेल्या रोजगार मेळाव्याला तब्बल ५००हून अधिक बेरोजगारांनी भेट दिली.

या मेळाव्यात सातवी ते पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या युवक, युवती, महिलांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. या मेळाव्यात अल्पशिक्षण घेतलेल्या महिलांसाठी डी. के. अपेरल कंपनीत पॅकिंगचे काम, दहावीपर्यंत अल्प शिक्षण घेतलेल्यांसाठी हाऊस किपिंग व सुरक्षारक्षकांचे काम, बारावी तसेच पदवीधरांना अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एस्सार कंपनी, शॉपर्सस्टॉप, डोमिनोस आदी कंपन्यांत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सायंकाळपर्यंत नोकरी एक्स्प्रेसला भेट दिलेल्यांपैकी २००हून अधिक जणांची निवड विविध कंपन्यात नोकरीसाठी करण्यात आली.

तसेच ज्या तरुण-तरुणींची निवड झाली नाही त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले आहे. त्यांनाही रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ठाणे जिल्हा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाभिमान संघटनेचे उल्हासनगर संपर्क संघटक प्रशांत चंदनशिवे, शहर संघटक विशाल सोनावणे, विलास दुबे, संतोष मिंडे, मंगेश शिवराळे, शेखर ठोसर, मालती गवई, शकुंतला गवई, लक्ष्मी गवई आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version