Home ऐसपैस हिरवाई हरवलेले कॉटन ग्रीन

हिरवाई हरवलेले कॉटन ग्रीन

1

शांत आणि मोकळा परिसर.. मधूनच गेलेले काही वेडेवाकडे रस्ते.. गर्द झाडी, मधूनच डोकावणारं मंदिर, रुग्णालय, बंद पडलेली गोदामं, रांगेत उभे केलेले ट्रक, तुरळक पण धुळीचा धुरळा उडवणारं एखाद्-दुसरं वाहन..

शांत आणि मोकळा परिसर.. मधूनच गेलेले काही वेडेवाकडे रस्ते.. गर्द झाडी, मधूनच डोकावणारं मंदिर, रुग्णालय, बंद पडलेली गोदामं, रांगेत उभे केलेले ट्रक, तुरळक पण धुळीचा धुरळा उडवणारं एखाद्-दुसरं वाहन..समोर दिसणारं रेल्वे स्टेशन आणि मधूनच धाडधाड करणारा रेल्वेचा आवाज.. तसा हा भकास परिसर. हे सगळं वर्णन आहे, हार्बर लाइनवरच्या कॉटन ग्रीन स्टेशनचा पूर्वेकडील परिसर. गंमत म्हणजे या स्टेशनच्या नावातच त्या परिसराची ओळख लपलेली आहे असं म्हटलं तरीही चालेल. कॉटन ग्रीन हे नाव पडण्यामागे कॉटनचा म्हणजे कापसाचा काही संबंध होता का, असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविकच आहे. आणि याची प्रचिती आपल्याला स्थानकाच्या पूर्वेला पोहोचल्यावर लगोलगच येते.

रेल्वेने शिवडीहून सीएसटीला जाताना हा परिसर अगदी सहज खुणवतो. कमी वर्दळीचा आणि शांत परिसर असल्याने नियमित प्रवास करणा-यांच्या तो नेहमीच कुतूहलाचा भाग ठरला आहे असं म्हटलं तरी चालेल. स्टेशनहून पश्चिमेला खाली उतरलं तर पुढे एक जुनं, काळपट असं फाटक दिसतं, मात्र पूर्वेला उतरलं की समोरच आपल्याला हिरवट पांढ-या रंगातील कॉटन एक्स्चेंजची भव्य इमारत दिसते. जसजसं आपण पुढे पुढे जात जातो तसतशी या इमारतीची भव्यता आपल्याला समजत जाते.

ही इमारत म्हणजेच कापूस खरेदी-विक्रीचं मोठं केंद्र होतं. आजही तिथे कापसाच्या खरेदी-विक्रीचा कारभार चालतो. याच इमारतीच्या आसपास कापसाची कित्येक गोदामं होती. कापूसविक्रीच्या व्यवहारामुळेच या परिसराला ‘कॉटन ग्रीन’ नाव पडलं असावं, अशी जुजबी माहिती तिथे काम करणा-या कर्मचा-यांनी दिली. सध्या मुंबईतील ही एकमेव इमारत आहे. या इमारतीला खूप मोठा इतिहास आहे. १२ फेब्रुवारी १९३९ला या इमारतीची पायाभरणी झाली आणि १९३८ मध्ये हे कापूस व्यापाराचं केंद्र म्हणून खुलं झालं.

तेव्हा या ‘ईस्ट इंडिया कॉटन कंपनी’चे सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास हे प्रेसिडेंट होते. या इमारतीत प्रवेश केल्यावर त्यांचा भव्य पुतळा दिसतो. कापूस व्यवहारातील त्यांच्या २८ वर्षाच्या कारकीर्दीप्रीत्यर्थ हा पुतळा उभा करण्यात आला असून त्याचं अनावरण २९ मे १९५२ रोजी मोरारजी देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे काही जुनी कृष्ण-धवल चित्रंदेखील लावलेली दिसतात. या इमारतीच्या गॅलरीत उभं राहून कापसाच्या व्यवहारावर देखरेख करणारे सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांची छायाचित्रं लावण्यात आली आहेत. याशिवाय काळबादेवी येथील कार्यालयाचं छायाचित्र आहे.

साधारण साठ ते सत्तर वर्षाचा इतिहास असलेल्या या इमारतीची सुरुवातीला ही दोन केंद्रं होती. काळबादेवीचं आणि हे शिवडीलगतचं कॉटन ग्रीनचं दुसरं. कालांतराने काळबादेवीचं कार्यालय बंद पडलं मात्र आजही तिथे ती इमारत उभी आहे. आज ईस्ट इंडिया कॉटन असोसिएशनची दुसरी शाखा नवी मुंबई येथे असून ते त्यांचं मुख्य कार्यालय आहे. संपूर्ण परिसर गोदामाचा असल्याने तिथे फारशी वर्दळ आढळत नाही. आसपासच्या गोदामात माथाडी कामगार काम करत असत त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली होती. ‘कॉटनचा राजा’ अशी ख्याती असलेला गणपती कॉटन एक्स्चेंजच्याच सभागृहात आजतागायत बसवला जातो. या कामगारांच्या पेटपूजेची सोय करण्यासाठी सुरुवातीला एक भेळवाला बसत होता. आजही त्यांच्या कित्येक पिढया हा व्यवसाय करत आहेत. ही एक्स्चेंजची इमारत होण्यापूर्वीपासून आम्ही हा व्यवसाय करत असल्याची माहिती तिथल्या कल्याण भेळवाल्याने दिली.

हा संपूर्ण परिसर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येतो. कॉटन एक्स्चेंज इमातीसमोरच बॉम्बे पोर्ट ट्रस्टचं रुग्णालय आहे आणि त्याहीपुढे पोर्ट ट्रस्टच्याच काही जुन्या वसाहती आहेत. ट्रेनमधून येताना या दिसतात. मात्र त्यादेखील ओसाड पडल्या आहेत. असं जरी असलं तरी याच परिसरात इंडियन एअर फोर्सचं क्षेत्रीय कार्यालय आणि एक राममंदिर आहे. तिथेच मधे ‘जपान कॉटन एक्स्चेंज कं. लि.’ नावाची भग्नावस्थेतील एक इमारत आढळते. या इमारतीवर पूर्वी एक हेलिकॉप्टर पडलं होतं, असं सांगितलं जातं.

इतकंच नव्हे तर त्या हेलिकॉप्टरचे अवशेषही पाहिल्याचं मंदिरात येणा-या काही मंडळींनी सांगितलं. संध्याकाळच्या वेळी या मंदिरात भजन-कीर्तनादी कार्यक्रम होतात. इतकीच काय ती वर्दळ आढळते. बाकी संपूर्ण सामसूम परिसर. मात्र या गर्द झाडीच्या सावलीत कित्येक टॅक्सीचालक आणि काही वाटसरू विश्रांतीसाठी येतात. घटका-दोन घटकांची विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या कामाला जातात. म्हणूनच रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसाढवळ्यादेखील तसं फारसं कोणी आढळत नाही. त्यामुळे पोलिसांची एक गाडी या ठिकाणी दिवसाढवळ्या गस्त घालताना दिसते. मोकळी जागा, शांत परिसर, रहदारी नसल्याने रविवारी मात्र या अड्डय़ावर क्रिकेटवीर ताबा मिळवतात. आणि बघता बघता या खेळाला रंग चढतो. इथे येणा-या प्रत्येकाला शांत, मोकळ्या वातावरणात झाडांच्या सावलीत एखादा तरी फेरफटका मारण्याचा मोह आवरत नाही हे नक्की!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version