Home मध्यंतर उमंग हे खरे व्हॅलेंटाईन..!

हे खरे व्हॅलेंटाईन..!

0

प्रेमावर बोलणे हे एकप्रकारे रोमहर्षक असते. त्याचा आनंद वेगळा असतो. पण प्रेमाला लपवा छपवीचा शाप शतकानुशतके आहे. कारण सात रंगांपैकी गुलाबी रंग जरी प्रेमाचा म्हटले असले तरी त्या रंगांची उधळण गुलालाप्रमाणे करायची नसते, तर त्यात एक हलकेच वातावरणाचे प्रकटीकरण असते. ते नीट झाले नाही तर त्याला फुटणारे कंगोरे त्याचे भविष्यातील रंग ठरवतात. अशा प्रेमाला सांगावे लागते, प्रेमा तुझा रंग असा..

कोणत्याही प्रकारच्या नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती डोळे असूनही आंधळय़ाप्रमाणे वागू लागते. मग ती नशा सत्तेची असो, संपत्तीची असो, धर्माची असो वा कामाची असो! म्हणूनच ‘सत्तांध’, ‘धर्माध’, ‘कामांध’, असे शब्द भाषेत रूढ झाले. ‘प्रेम आंधळे असते’ असे वचन सर्रास प्रचारात आले. पण, प्रेमीजनांना ते कधीही मान्य होणार नाही. त्यांचे म्हणणे असे की, उत्कट प्रेमात गुरफटलेली व्यक्ती सरळधोपट मार्गाने जाण्याच्या रुक्ष व्यवहाराकडे पाठ फिरविते. म्हणूनच व्यवहार पंडितांना ती आंधळी वाटत असावी. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, प्रेमात पडलेली माणसं सामान्यजनांच्या दृष्टीने अंध बनत असली, तरी त्यांना असामान्य दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते. त्यामुळेच प्रेमाची उंच-सखल नि काटेरी वाटही ते हसतमुखाने आक्रमू शकतात! जगाची नजर चुकवून मिलनाची नशा कशी लुटावी, अनेक अडथळे लीलया ओलांडून इष्काची मंजिल कशी गाठावी, याबाबतच्या सा-या चोरवाटा प्रणयीजीवांना सहज दिसतात.

लग जा गलेसे, ताब अब।
अय नाजनीं नहीं।
है है खुदा के वासतें।
मत कर नही है।।
अशा बेफाम इश्कबाज कविता लिहीणा-या जुअरतला आंधळ्यांचे सोंग घेण्याची युक्ती सुचविणारे प्रेम आंधळे असते, असं कोण म्हणेल? आणि आता तर प्रेमाला अंधत्वाची बाधा होऊच शकत नाही, हे सिद्ध करणारा आंधळ्यांचा प्रेमविवाह नुकताच संपन्न झाला.

त्या या दिव्यदृष्टीमुळेच! सागराच्या प्रेमाने धुंद झालेली नि प्रणयाच्या महापुराने ओसंडून वाहणारी नदी आंधळी असावी असे आपणास वाटते, पण नाही. मार्गात उभ्या ठाकलेल्या धिप्पाड पहाडांना कधी युक्तीने फोडून तर कधी शिताफीने वळसा घालून, अनेक वळणे घेऊन ती अखेर सागरालाच मिळते. हा प्रेमाच्या दिव्य दृष्टीचाच प्रभाव! अहो, फार काय सांगावे, आंधळ्यांचे सोंग घेऊन इश्कची सुरत लुटायला लावणारी बिलंदर दृष्टी ही प्रीतीच्या कैफातच प्राप्त होते. याबाबत ‘भावबंधन’ मधील महेश्वराचे, कामण्णाचे उदाहरण आपल्या परिचयाचेच आहे. या कामण्णांचा गुरू शोभावा असा एक शायर उर्दूत होऊन गेला. त्याचे नाव शेख कलंदर बख्श जुअरत. (१७३० ते १८१०). हा मूळचा दिल्लीचा. पण, त्याच्या उत्तान शृंगारिक आणि चावट गझलांची कीर्ती लवकरच लखनौ रसिक नि विलासी अमीर-उमरावीत पसरली. तरुण वयातच हा रंगीला शायर लखनौत आला आणि तो संगीतनिपुण असल्याने त्यांच्या रंगेल गझल गायनाचा सर्वत्र बोलबाला झाला. अशा या काळात नवाबांच्या जनानखान्यातून अनिर्बंध संचार करायला मिळावा आणि विलासी लावण्यवतींचे सौंदर्य नि:संकोच पाहावयास आणि हाताळावयासही मिळावं, या लोभापायी जुरअत ‘आपले डोळे गेले’ अशी खोटीच हुल उठवून दिली. मग काय, गरीब नि गुणी आंधळा म्हणून तो जनानखान्यात ठाण मांडून बसू लागला. पुढे त्याचे हे बिंग फुटले, हा भाग निराळा. पण, परमेश्वराची करणी पाहा कशी, तो काही दिवसाने खरोखरच आंधळा झाला!

रामकृष्ण आणि सुशीला हे अंध युवक युवती यांचा हा विवाह केवळ प्रेमविवाहच नव्हे, तर आंतरजातीय विवाह होय! रामकृष्णाने अंधशाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि लॉटरीची तिकिटे विकण्यास प्रारंभ केला. तोच त्याच्या प्रारब्धाची लॉटरी खुलली. तो या अंध युवतीचा प्रेमात पडला. ब्रेल लिपीतून तिला प्रणयपत्रे लिहू लागला. ‘माझी होशील का?’ असा त्याने सवाल विचारला आणि मग सुशिलेने त्याला होकारार्थी जवाब दिला. जातीपातीची बंधने ओलांडणा-या या अंध युगुलांचे प्रेम आंधळे आहे, असं कोण म्हणेल? जातीयतेच्या विरोधात घोषणा करणा-या हजारो डोळसांना जे साधले नाही ते या अंधांनी साधले. हे आंधळे प्रेमीजन जाती-धर्मापलीकडे असलेली मानवता पाहू शकले! मग डोळे नसूनही ते अधिक डोळस होते असंच म्हणणं योग्य नाही काय? ‘प्रेम आंधळं असतं’ या भ्रमाचा भोपळा या अंध युगुलाने सहज फोडला! आंधळ्यांचे प्रेम अधिक उच्च दर्जाचे असणे क्रमप्राप्त आहे. कारण ‘लव्ह ऐट फर्स्ट साईट’ असं ते असूच शकत नाही. ते बहिरंगावर अवलंबून नसते.

आपली प्रिया चंद्रमुखी आहे की रुद्रमुखी आहे? ती मीनाक्षी आहे की हरिणाक्षी? तिचा केशविलाप काळाभोर आहे की पिंगट? तिला नथ खुलून दिसते की चमकी? तिचा बांधा नऊवारीत अधिक खुलतो की पाचवारीत? लुंगी कुडत्यात, सलवार कमीजमध्ये की बेलबोटम जीन्समध्ये? हे अंध प्रियकराला कसे कळणार? आणि अंध प्रेयसीला प्रियकराचे रंगरूप आकलन होणं शक्यच नसतं. तो काळा सावळा असला काय, अन् गोरागोमटा असला काय, तिला त्या बाह्यरंगाचे ज्ञान अशक्यच! म्हणूनच अंध युगुलांचे प्रेम बाह्यरंगावर नव्हे, तर अंतरंगावर अधिक आधारलेले असणार! केवळ स्पर्शानं जी काही शरीरसौंदर्याची कल्पना करता येणं शक्य आहे. तेवढंच अंधजनांच्या हाती असतं. कारण चर्मचक्षूंना ते पारखे झालेले असतात. आंधळेपणाचे, चर्मचक्षूंच्या अभावाने अनेक तोटे असले तरी हा एक फायदाच म्हणावा लागेल की, ‘उप्परकी टामटूम’ नव्हे तर ‘अंदरका राम’ च अंधजनांना अधिक लक्षात घ्यावा लागतो. देहापेक्षा हृदयाचे सौंदर्यच अनुभवाच्या चक्षूंनी आकलन करावं लागतं!

– हरीश केंची

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version