Home टॉप स्टोरी २२ वर्षे शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेला मातोश्रीचा मतदारसंघ एवढा गलिच्छ का?

२२ वर्षे शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेला मातोश्रीचा मतदारसंघ एवढा गलिच्छ का?

1

ज्या मतदारसंघात मातोश्री बंगला आहे, जिथे शिवसेना पक्षप्रमुख राहतात तो मतदारसंघ गलिच्छ, दुर्गंधीने भरलेला, गटारे तुंबलेली, नागरी सुविधांचा अभाव; २२ वर्षाच्या शिवसेनेच्या महापालिकेतील सत्तेचा या मतदारसंघातील गारगरिबांना काय फायदा झाला? शिवसेनेच्या महापालिकेतील सत्तेचा फायदा गोरगरिबांना होत नसेल तर तो कोणाला होतो? असा बिनतोड प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला विचारला आहे. माजी आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतील शिवसेनेला मिळालेल्या विजयाचा जल्लोष करताना शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते राजकीय नितीमत्ता सोडून वागले. विजयाचे गांभीर्य त्यांना कळले नाही. अशा शब्दांतही नारायण राणे यांनी विजयोत्सव साजरा करणा-याला फटकारले आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल १५ एप्रिल २०१५ रोजी लागला. या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीमती तृप्ती सावंत १९,००८ मतांनी विजयी झाल्या. माझा या निवडणुकीत पराभव झाला. कोणतीही सबब न सांगता मी हा पराभव मान्य केला. पक्षाला, कोणत्याही नेत्यांना किंवा व्यक्तीला दोषी धरले नाही व कोणावर टीकाही केली नाही.

निवडून आलेल्या व मतदारसंघाशी जवळून नाते असलेल्या आमदाराचे निधन झाल्यानंतर ज्या प्रकारे पोटनिवडणूक होते, त्याची जाणीव ठेवून मी प्रचार केला व निवडणूक लढलो. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोठेही अतिरेक केला नाही किंवा धांगडिधगा घातला नाही. निवडणुकीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर मी सुद्धा संयमाने प्रतिक्रिया दिली.

कै. प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर जल्लोष करताना मात्र शिवसेनेचे नेते व कार्यकत्रे माणुसकी व राजकीय नितीमत्ता सोडून वागले. हे सारे गलिच्छ प्रकार पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर आजच्या लेखाचे प्रयोजन मी केले.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याबरोबर माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मी ही निवडणूक लढवावी असा आग्रह केला. मी ही निवडणूक लढविण्यास तयार नव्हतो. चार महिन्यांपूर्वी कोकणात पराभव झाल्यामुळे आपण आता कोणतीही निवडणूक लढवू नये, असे मला वाटत होते. मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा मला तसा अंदाजही नव्हता. तरीही पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या आदेशानुसार मी ही निवडणूक लढविण्यास तयार झालो. वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये २०१४च्या निवडणुकीत झालेले मतदान मी पुढे नमूद करतो:-
कै. श्री. प्रकाश सावंत शिवसेना ४१,३८६
श्री. कृष्णा पारकर भाजपा २५,७९१
श्री. रेहबार खान एमआयएम २३,९७६
श्री. राजीव बागडी काँग्रेस(आय) १२,२२९
श्री. संतोष धुवाळी राष्ट्रवादी ९३७०
श्रीमती शिल्पा सरपोतदार मनसे ५४०१
युतीची आणि मनसेच्या मतांची बेरीज केली तर ७२,५८० होते. काँग्रेस आय पक्षाला १२,२२९ मते मिळाली होती. म्हणजेच या मतदारसंघात काँग्रेस ६०,३५१ मतांनी पिछाडीवर होती. एवढी मोठी पिछाडी असतानाही मी पक्षाच्या नेत्यांचा आदेश मान्य करून या निवडणुकीच्या मैदानात जिंकल्याच्या ईर्षेने उतरलो.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझा पराभव होईल, असे मला कधीही वाटले नाही. मतदारसंघात फिरत असताना सर्व जाती-धर्माच्या आणि देशाच्या विविध भागांतून येथे राहण्यासाठी आलेल्या लोकांनी मला प्रत्यक्ष भेटून माझ्यासाठी मतदान करणार असल्याचे सांगून मला विजयाच्या सदिच्छा दिल्या. या भागाचा विकास झालेला नसल्यामुळे आम्हाला तुमच्यासारखा आमदार पाहिजे, असेही लोकांनी बोलून दाखविले.

बारा दिवसांत पदयात्रा काढून, लोकांना प्रत्यक्ष भेटून, रोड-शो करून, चौक सभा घेऊन आणि जाहीर सभा घेऊन मी प्रचार केला. जनतेने फार चांगला प्रतिसाद दिला आणि मीडियानेही चांगली प्रसिद्धी दिली. मतदारसंघातील वातावरण काँग्रेसमय झाले होते. विकास आणि नागरी सुविधा हे मुद्दे मी प्रचारात ठळकपणे मांडले.

वांद्रे पूर्व मतदारसंघात फिरताना हा भाग मुंबईत आहे, पण मुंबई मात्र येथे कोठेही दिसून येत नव्हती. ७० टक्के झोपडय़ा आणि ३० टक्के इमारती मिळून हा मतदारसंघ होतो. येथील झोपडपट्टय़ांमध्ये माणसे राहतात यावर विश्वास बसत नाही. मातोश्रीपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भारतनगर, बेहरामपाडा, नवपाडा, गोळीबारनगर, या झोपडपट्टय़ांमध्ये पाणी नाही, शौचालये नाहीत, असली तर त्यांना दरवाजे नाहीत, चालण्यासाठी रस्ते नाहीत, सर्व गटारे उघडी, सांडपाणी, दरुगधी व डासांचा उपद्रव अशी भयावह अवस्था आहे.

ही अवस्था पाहिल्यानंतर या भागात मुंबई महापालिकेचे अस्तित्व आहे काय, असा प्रश्न पडतो. गेली बावीस वर्षे महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना, ज्या मतदारसंघात मातोश्री बंगला आहे, जिथे शिवसेनेचे प्रमुख राहतात, तेथे हा गलिच्छपणा, दरुगधी आणि नागरी सुविधांचा अभाव का? शिवसेनेच्या बावीस वर्षाच्या सत्तेचा येथील गोर-गरिबांना काहीच फायदा का झाला नाही? शिवसेनेच्या महापालिकेतील सत्तेचा फायदा गोर-गरिबांना होत नाही तर कोणाला होतो, असाही प्रश्न पडतो.

महापालिकेच्या ३३ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातून होणा-या खर्चाचा फायदा गोर-गरिबांना, मध्यमवर्गियांना आणि करदात्यांना होत नाही तर कोणाला होतो? याच लेखासोबत वांद्रे पूर्वमधील भयावह स्थितीचे दर्शन करून देणारी काही छायाचित्रे मी देत आहे (पान ५) त्यावरून नागरिकांना किमान नागरी सुविधा देण्याचे महापालिकेचे कर्तव्य शिवसेनेने पार पाडलेले नाही हे स्पष्ट दिसून येईल.

गोळीबारनगर येथील शिवालीकचा एसआरए प्रकल्प गेली बारा वर्षे सुरू आहे. झोपडय़ा मोडल्या असून लोक बाहेर कोठे तरी राहतात. सहा वर्षे त्यांना भाडेही दिले जात नाही. लोकांनी जगावे कसे आणि राहावे कोठे? बेहरामपाडा आणि नवपाडा रेल्वेच्या जमिनीवर आहेत. डवरीनगर संरक्षण विभागाच्या जमिनीवर आहे. गेली चाळीस-पन्नास वष्रे हे लोक येथे राहात आहेत. केंद्र सरकारच्या परवानगीने येथे एसआरए योजना राबविता आली असती.

जनता घाणीत आणि दुर्गंधीत राहिली तरी भावनिकतेने आपल्यालाच मतदान करणार, याची खात्री असल्यामुळे शिवसेनेने येथील लोकांकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. वांद्रे पूर्व भागात राहणा-या ७० टक्के झोपडीवासीयांना अच्छे दिन, चांगले दिवस दाखवावे असे शिवसेनेच्या नेत्यांना का वाटले नाही? या भागातील एकविसाव्या शतकात राहणा-या नागरिकांनी चांगले जीवन जगण्यासाठी, दर्जेदार नागरी सुविधा मिळण्यासाठी, स्वत:ला टुमदार घर मिळण्यासाठी योग्य प्रतिनिधीची निवड केली काय, या प्रश्नाचे उत्तर नाही, असेच राहील.

येथील लोकांनी आहे त्याच स्थितीत जगावे, भावनिकतेने मतदान करावे व निवडून आलेल्या लोकांनी जनतेला विसरून आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी, असेच चाललेले आहे आणि तेच पुढे चालत राहावे, असे येथील लोकांना वाटते. येथील मराठी वस्तीमध्ये कोकणातून येऊन स्थायिक झालेली अनेक कुटुंबे आहेत. निवडणूक जाहीर होताच अशा कुटुंबांची संख्याही मी पाहिली. कोकणात मी केलेला विकास पाहून ही कुटुंबे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभी राहून मला साथ देतील, अशी माझी अपेक्षा होती. दुर्दैवाने तसे घडले नाही.

निवडणुकीचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला. शिवसेनेच्या नेत्यांची अपेक्षा नसताना विजयाचे माप त्यांच्या पदरात पडले. निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे पदाधिकारी, नेते व मंत्री बिळात लपून बसले होते. निकालानंतर ते बिळातून बाहेर आले आणि जल्लोष करायला लागले. विजयानंतर जल्लोष होतोच. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. काही मंत्र्यांनी मात्र जाहीरपणे बेजबाबदार वक्तव्ये केली. त्यामध्ये श्री. रामदास कदम आघाडीवर होते. त्यांचे नाव घेण्याचीसुद्धा त्यांची लायकी नाही, असे माझे मत आहे. मात्र त्यांनी केलेल्या काही आरोपांचे खंडन करणे आवश्यक असल्यामुळे मला त्यांचा उल्लेख करावा लागत आहे.

हे महाशय एका ठिकाणी म्हणतात की, नारायण राणे यांना शिवसेनेत परतायचे आहे, असे अर्जून खोतकर त्यांना म्हणाले. शिवसेनेमध्ये परत जाण्याचा विचारही माझ्या मनात कधी आलेला नसताना आणि अर्जून खोतकर यांच्याशी मी कधीही बोललो नसताना आणि कोणताही पुरावा नसताना हे मंत्री एवढे बेजबाबदारपणे कसे बोलू शकतात? आपण मंत्री आहोत, मंत्री पदाची शपथ घेतली आहे, नितीमत्ता सांभाळून आपण बोलले पाहिजे, याचे कोणतेही भान यांना नाही. अर्थात, नितीमत्ता आणि रामदास कदम हे समीकरणच जमत नाही. एमआयएमच्या नेत्यांना मी पाच कोटी रुपये देऊ केले असेही हे महाशय म्हणाले. कोणता नेता, कधी व कोठे ही रक्कम देऊ केली, हे ते काहीच सांगत नाहीत. विजय झाल्यानंतर उन्मादी पद्धतीने तोंडसुख घेऊन बदनामी करण्याचे हे कृत्य एकोणपन्नासाव्या वर्षात असलेल्या शिवसेनेला शोभा देणारे आहे काय?

काही जणांनी तर चपला आणि कोंबडय़ा दाखवत मिरवणूक काढली. या सर्वावर मी एकच भाष्य करीन. शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेतात. त्यांच्या संस्कृतीचे त्यांनीच केलेले हे जाहीर प्रदर्शन! मी कोण होतो, काय झालो हे सगळय़ांनाच माहिती आहे. शिवसेनेमध्ये असताना शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ही पदे मा. शिवसेनाप्रमुखांनी दिली. पात्रता, गुणवत्ता आणि निष्ठा पाहूनच मा. साहेबांनी मला ही पदे दिली. आता मुंबई महापालिकेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून काही महिला व पुरुष जो धांगडिधगा घालत होते, त्यांची निष्ठा या निवडणुकीत हात ओले करून कलंकित झालेली नाही काय? हा धांगडिधगा घालणा-या सगळय़ांना मी सांगतो की, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुस-यांवर दगड मारू नयेत. मारल्यास..

१६ एप्रिलचा सामना मी पाहिला. वाघाच्या पंजाखाली उंदीर चिरडला, असा मथळा आहे. या निवडणुकीत मी शिवसेनेला जेरीस तर आणले होतेच, त्याचबरोबर त्यांच्या सगळय़ा नेत्यांच्या तोंडाला फेसही आणला. असे असताना निकालानंतर हा मथळा आला. वाघ पंजाचा उपयोग उंदराला चिरडण्यासाठी करीत नाही तर नरडीचा वेध घेण्यासाठी करतो. शिवसेनेने स्वत:ला वाघ म्हणवून घेण्याची परिस्थितीसुद्धा राहिलेली नाही. ही सगळी भाजपाच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत.

नवीन सरकार आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वेगळा विदर्भ करणार, असे वक्तव्य केले, भाजपाने जैतापूर होणारच हे यांच्या तोंडावर सांगितले, काश्मीरमध्ये अतिरेक्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आले, त्यावेळी हे वाघ कोठे शेपूट घालून बसले होते? महाराष्ट्र तोडू पाहणा-याच्या नरडीचा वेध वाघाच्या पंजाने घेतला नसता काय? ना यांच्या नेत्यामध्ये दम, ना मंत्र्यांमध्ये. सगळेच व्यावसायिक आणि सगळेच टक्केवारीच्या मागे. हे सारेच शेपूट घालून सत्तेत वावरत आहेत.

यांच्याकडून स्वाभिमान, अभिमान, मर्दपणा आणि निष्ठेची अपेक्षा करणेच चुकीचे. हे सगळे गुण मा. साहेबांबरोबर गेले. विजयाच्या उन्मादातील आघ्य घोषणा, चपला आणि कोंबडय़ा घेऊन काढलेल्या मिरवणुकांवरून शिवसेना एकोणपन्नासाव्या वर्षात पोहोचली असली तरी तिची बौद्धिक वाढ मात्र खुंटलेलीच प्रत्ययास येते.

शिवसेनेने या निवडणुकीतील विजयानंतर महाराष्ट्रभर मिरवणुका काढून जल्लोष केला. एका नारायण राणेच्या पराभवामुळे शिवसेनेला एवढा प्रचंड आनंद झाला. २००५ मध्ये मालवणलासुद्धा पोटनिवडणूक झाली होती. अख्खी शिवसेना त्यावेळी मालवणात माझ्या विरोधात एकवटली होती. साहेबांनीसुद्धा सभा घेतली. एवढे झाल्यानंतरही मी शिवसेनेचे डिपॉझिट त्या निवडणुकीत जप्त करायला लावले होते. वांद्रय़ामध्ये काँग्रेसच्या आधीच्या उमेदवाराला बारा हजार मते मिळाली असता त्यापेक्षा मला २३००० जास्त मते मिळाली हेही शिवसेनेने विसरता कामा नये.

वाघ हा वाघच असतो. तो गवत खात नाही आणि उंदराला चिरडण्यासाठी पंजाचा वापर करीत नाही. पंजाचा वापर केव्हा आणि कसा करावा हे वाघाला कळते. वाघाचे कातडे पांघरून कोणाला वाघ होता येत नाही. मी रस्त्यावर प्रचारात फिरत होतो, त्यावेळी हे बिळात लपले होते. आता बिळातून बाहेर येऊन आघ्य घोषणा देऊन आणि कृत्ये करून जो धिंगाणा यांनी घातला आहे, त्याला त्यांनी आवर घालावा. नाही तर वाघाला वाघासारखे वागावे लागेल. मग तुमच्यावर शेपूट घालण्याची वेळ येऊ नये. एक आठवण करून देतो. मी शिवसेना सोडली तेव्हा २२० शाखाप्रमुखांनी पोलीस संरक्षण घेतले. त्याची नोंद पोलिसांकडे आहे. झाकली मूठ सव्वालाखाची. काही गोष्टींबाबत मी उघडपणे टीका करू लागलो तर मात्र पळताभुई थोडी होईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version