Home टॉप स्टोरी फडणवीस सरकारविरोधात आंबेडकरी जनतेचा लाखोंचा मोर्चा

फडणवीस सरकारविरोधात आंबेडकरी जनतेचा लाखोंचा मोर्चा

1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रज्ञेचा वारसा जतन करणारे आंबेडकर भवन पाडल्यानंतर आंबेडकरी जनतेमध्ये उमटलेला संतापाचा तीव्र हुंकार मंगळवारी लाखो भीमसैनिकांच्या पदमोर्चातून आणखी आवेशाने प्रकट झाला.

मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रज्ञेचा वारसा जतन करणारे आंबेडकर भवन पाडल्यानंतर आंबेडकरी जनतेमध्ये उमटलेला संतापाचा तीव्र हुंकार मंगळवारी लाखो भीमसैनिकांच्या पदमोर्चातून आणखी आवेशाने प्रकट झाला.

फडणवीस सरकारशी संगनमत करून माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मध्यरात्रीच्या अंधारात ही वास्तू जमीनदोस्त केल्याचा आरोप करत निघालेल्या या मोर्चेक-यांच्या सरकारविरोधातील प्रक्षोभाचे निखारे मुसळधार कोसळणारा पाऊसही विझवू शकला नाही. भरपावसात भायखळा ते विधानसभा अशी चाल करून जाणा-या या भीमसैनिकांनी राज्यातील निष्क्रिय फडणवीस सरकारचा निषेध केला.

ऐतिहासिक रिड्ल्स मोर्चाइतकाच लक्षवेधी ठरलेल्या या भव्य मोर्चाने मुंबईची वाहतूकच काही काळ कोलमडून टाकली होती. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या विवेकपूर्ण भाषणाने या मोर्चाची सांगता झाली. आंबेडकर भवन पाडण्यामागे प्रमुख सूत्रधार असलेले शासनाचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

राज्यसभेतही आंबेडकरी जनतेच्या संतप्त हुंकाराचे पडसाद उमटले. सोमवारी मायावती आणि मंगळवारी सीताराम येचुरी यांनी हा विषय उपस्थित केल्यावर, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी, आंबेडकर भवन जेथे होते तेथेच पूर्वीसारखे उभारले जाईल, यासंदर्भात राज्य सरकारशी बोलण्याचे आश्वासन दिले. ही वास्तू पाडणा-यांना जामीन देऊ नका, यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

‘पाऊस आला केवढा रत्नाकर गायकवाड ७७७ चोर हैं भाई चोर हैं, रत्नाकर गायकवाड चोर हैं, फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत मुसळधार पावसात लाखो आंबेडकरी भीमसैनिकांनी सीएसटी गाठल्यावर हा मोर्चा आझाद मैदान येथे अडवण्यात आला.

या मोर्चाला काँग्रेस, माकप आणि अन्य पक्षांनी पाठिंबा दिला होता. मोर्चात रोहित वेमुला, सीताराम येचुरी, भालचंद्र कांगो, अशोक ढवळे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आदी सहभागी झाले होते. ‘ही ऐतिहासिक वास्तू कोणतीही नोटीस न देता रातोरात जमीनदोस्त करण्यात आली. ही गोष्ट निषेधार्ह असून याला जबाबदार लोकांना त्वरित अटक व्हायलाच हवी.

आंबेडकर भवन होते त्याच जागी पुन्हा उभे राहायलाच हवे’, अशी मागणी निरुपम यांनी केली. आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे, काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनीही मोर्चेक-यांना मार्गदर्शन केले.

आंबेडकर भवन पाडल्याचे उग्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजत आहे. आंबेडकरी जनतेमध्ये राज्यातील फडणवीस सरकार विरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

मोर्चासाठी सकाळी सातपासूनच राणीबाग परिसरात तुफान गर्दी करणा-या जनतेमध्ये हा संताप जाणवत होता. महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून तसेच जवळील कर्नाटक, आंध्र आणि गुजरात राज्यांतून देखील भीमसैनिक मोर्चासाठी आले होते. कोकणातील रायगड, महाड, चिपळून आणि रत्नागिरी येथील शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते आले होते.

बुलढाणा येथून ८७ वर्षाच्या शंकुतला कांबळे यांनी बाबांची वास्तू पाडणा-या रत्नाकर गायकवाड यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असे सांगितले. जेव्हा मोर्चा जे. जे. आर्ट कॉलेज समोरील उड्डाण पुलाजवळ होता तेव्हा मोर्चाचे अंतिम टोक भायखळा ब्रीजच्या मध्यावर होते.

कन्हैयाला जोरदार प्रतिसाद

सीएसटी चौकात झालेल्या प्रचंड सभेत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने मोदी, संघ आणि भाजपावर हल्लाबोल केला. मनुवादी मानसिकतेतून फडणवीस सरकारने आंबेडकर भवन पाडण्याचे कारस्थान केले आहे.

याबद्दल भाजपाने देशाची माफी मागावी, अशी मागणी त्याने केली. देशाचा इतिहास बदलण्याचा हा प्रयत्न आहे. जुन्या झाल्या म्हणून ताजमहल, शिवाजी टर्मीनस या वारसा इमारतीही पाडणार का? असा सवाल त्याने केला. आंबेडकरांचे शिपाई सध्या रा. स्व. संघाच्या कुशीत बसले आहेत, असा टोलाही त्याने डॉ. नरेंद्र जाधव, रामदास आठवले यांचे नाव न घेता मारला.

1 COMMENT

  1. मी प्रहार च अभिनंदन करतो की त्यांनी ही न्युज वेब वर दाखवली, पण थोडस दुःख होतय की फक्त एकच फोटो टाकला. कारण की पूर्ण महाराष्ट्रामधून भीम अनुयायी आले होतो. तुम्ही पाहिले असेल की, वयोवर्ध महिला पण आलेल्या होत्या.. त्यांना पाहून खरंच असं वाटते की आजून ही त्यांच्यातली अन्याय विरुद्ध लढण्याची क्षमता संपलेली नाहीये…. आणि त्यांनी हे दाखवून दिले आहे आज…
    आणि आपण त्यांचा एकही फोटो टाकला नाही हे मला दुःख वाटते आहे.. तुमहाला एखाद्या हिरोईन जर पिकनिक ला तर त्यांचे सेल्फी टाकायला वेळा असतो राव… मला तुम्हाला दुखवाचे नाही.. त्या बद्धल मी दिलगिरी व्यक्त करतो… जयभीम………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version