Home Uncategorized बांबू लागवडीतून साधा आर्थिक उन्नती!

बांबू लागवडीतून साधा आर्थिक उन्नती!

1

पिकतं तिथं विकत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पिकतं तिथे विक्री किंवा त्या वस्तूवर आधारित उद्योग करण्याची शेतक-यांची मानसिकताच नसते. पिकतं तिथं सुद्धा विकू शकतं. फक्त मानसिकता बदलली पाहिजे. कोल्हापूर, सांगली अशा भागात ऊस पिकतो. पण त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया उद्योग उभे आहेत. मात्र जिल्ह्यात ती परिस्थिती नाही. कोल्हापूर, सांगली किंवा अन्य भागात बांबू लागवड मोठया प्रमाणात नाही. पण बांबूचे मार्केट उद्योग हे या ठिकाणी उभे आहेत. त्यांनी बांबूतील आर्थिक नाडी ओळखली म्हणून ते या उद्योगात आहेत. हे या दौ-यातून दिसून आले.

व्यावसायिक मानसिकता असेल तर दगडही हजारो रुपयाला विक्री केला जाऊ शकतो. कोल्हापूर येथील शाहू मार्केट यार्डमध्ये बुरूड समाजाचे अध्यक्ष जयवंत सोनवणे यांची बांबू विक्रीसाठी भली मोठी जागा आहे. या ठिकाणी सोमवार व मंगळवार या दोन वारांना बांबूचा बाजार भरतो. अनेक जातीचे बांबू विक्रीसाठी असतात. हा बाजार रोखीत चालतो. कोकणातील बांबूला ते विशेष महत्त्व देतात.

यावेळी जयवंत सोनवणे यांनी सांगितले की, बुरूड समाजाची कला जिवंत राहिली पाहिजे तर प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातली पाहिजे. तसेच बांबूपासूनच्या वस्तूंना करमुक्त केले पाहिजे. काही ठिकाणी वन विभाग बांबू तोडण्यास बंदी घालते. बांबू निर्यातीवर कर लावले जातात, ते बंद झाले पाहिजेत, तर बुरूड समाज जिवंत राहू शकतो, असे सांगितले.

याबरोबर सांगली येथील रेणुका बांबू डेपो या ठिकाणी भेट दिल्यावर तेथे सूर्यवंशी बंधूंनी बांबूचा वापर हा ऊस, द्राक्ष अशा पिकांसाठी केला जातो. तसेच बांधकाम करणा-या बिल्डर्सना बांबूच्या वस्तू तयार करून दिल्या जातात. इमारतीचे काम करताना उभे राहण्यासाठी लाकडी फळय़ांएवढी बांबूची शिडी उपयोगी येते. त्याला मागणी मोठया प्रमाणात आहे. गेली २५ वर्षे या व्यवसायात सूर्यवंशी हे बंधू आहेत. या ठिकाणी सुद्धा कोकणातीलच बांबू मोठया प्रमाणात घेतला जातो.

दलालांऐवढी थेट या मार्केटमध्ये बांबू घेतला जातो. याचा फायदा शेतक-याला होऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील उद्योजक शीतल केटाकाळे यांनी बांबूमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांनी बिमा या जातीच्या बांबूची रोपे वाटप केली आहेत. सुमारे ४ लाख रोप वाटप केली. ते बांबू कल्शस्टरच्या माध्यमातून बांबू व्यावसायिकांना एकत्र करीत आहेत. त्यांनी बांबूपासून वस्तू निर्माण करायला सुरुवात केली आहे.

तसेच कोल्हापूर येथील आशफाक मकानदार हे सुद्धा बांबूपासून अनेक वस्तू बनवित आहेत. संगणकाचा की-बोर्ड, माऊस, पेनड्राईव्ह त्यांनी बांबूचे बनविले आहेत. ते ६०० प्रकारच्या वस्तू बनवून ऑनलाईन त्याची विक्री करतात. त्यांनी बनविलेल्या वस्तू सुबक व आकर्षक आहेत. याच दौ-यात हातकणंगले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वनीकरण कार्यालयाला भेट दिल्यावर तेथील लागवड अधिकारी कुंभार यांनी नर्सरीतील विविध जातींच्या बांबूची माहिती दिली.

या ठिकाणी १२३ जातींच्या बांबूची रोवावाटिका तयार केली होती. पैकी १०० रोपे त्यात जगली. ब-याच बांबू रोपांना वातावरणाचाही फटका बसला असे त्यांनी सांगून या ठिकाणी बांबू रोपांची मोठया प्रमाणात पुढील काळात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली. या दौ-यामध्ये बांबूचे व्यापारी, बांबूचे उद्योजक व नर्सरी पाहता आली. त्यातून बांबूपासून किती काम सुरू आहेत हे दिसून आलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘माणगा’ बांबूला मोठया प्रमाणावर मागणी आहे. मात्र तेवढया प्रमाणात बांबू उपलब्ध होत नसल्यामुळे इतर जिल्ह्यातून किंवा राज्यांतून बांबूची आयात करावी लागते, असे कोल्हापूर व सांगलीतील बांबू खरेदी करणा-या व्यापा-यांनी सांगितले. या ठिकाणी बांबू विक्रीचा मोठा बाजार भरतो.  दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल हे व्यापारी करतात.

तरी बांबू कमीच पडतो, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. कोल्हापूर या ठिकाणी बांबूपासून विविध वस्तू निर्माण करून त्याची विक्री करणारे उद्योगही उभे राहिले आहेत. कोकणातील व अन्य राज्यांतून बांबू मिळवून हे उद्योग उभे आहेत. बांबू उद्योगातूनही आर्थिक उन्नती कोल्हापूरचे व्यापारी करीत आहेत हे विशेष!

1 COMMENT

  1. आमच्या शेतातले ७०० ते १००० बांबु विकायचे आहेत
    कोणी असेल तर ९७६६९३१००५ या नंबर वरती संपर्क साधावा
    गाव- राडेवाडी तालुका- पलूस ,जिल्हा – सांगली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version