Home महामुंबई बेस्ट बसमध्ये प्रथमोपचार पेटय़ांचा अभाव

बेस्ट बसमध्ये प्रथमोपचार पेटय़ांचा अभाव

0

प्रवाशांना योग्य सुविधा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असतात. मात्र बेस्टच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रवाशांच्या प्रचंड तक्रारी असून, या वाढत्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने एसी बसेसचा समावेश आहे.

मुंबई- प्रवाशांना योग्य सुविधा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असतात. मात्र बेस्टच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रवाशांच्या प्रचंड तक्रारी असून, या वाढत्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने एसी बसेसचा समावेश आहे. या बसेसमध्ये प्रथमोपचार पेटी असणे अपेक्षित असले तरी त्यात कोणतीही औषधे नसल्याचे एसी बसमध्ये नुकतेच आढळून आले. त्यामुळे वर्षभरात दोन वेळा भाडेवाढ करणारी बेस्ट परिवहन सेवा प्रवाशांना कधी सुविधा देणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी बेस्ट बसने प्रवास करणा-या एका महिला प्रवासीसह अन्य प्रवाशाला छोटीशी दुखापत झाली. बसमधील प्रवाशाने बसवाहकाकडे तातडीने प्रथमोपचार पेटीतील औषधांची मागणी केली. तेव्हा, गाडीत प्रथमोपचार पेटी आहे; पण पेटीत काहीही औषधे नसल्याची कबुली संबंधित वाहकाने दिल्याचे प्रवाशाचे म्हणणे आहे. हा प्रकार बेफिकीर प्रवृत्ती दर्शवणारा असून, त्यातून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभार आढळून येत असल्याची टीका प्रवाशांनी केली आहे.

प्रवाशांकडून तिकीट भाडे आकारताना प्रवाशांच्या सुरक्षेविषयी किमान प्राथमिक स्तरावरील उपाय केले पाहिजेत, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. भविष्यात एखादा मोठा अपघात झाल्यास प्रथमोपचार पेटीत औषधे नसतील तर त्यांचा उपयोग काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत बेस्ट प्रशासनाने काळजी घेत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.

बेस्टच्या बसेसमधील प्रथमोपचार पेटय़ांमध्ये औषधे नसल्याची गंभीर बाब बेस्ट समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी अनेक वेळा उपस्थित केली. त्यावेळी, बेस्टला सार्वजनिक वाहतूक सेवा उपक्रमाच्या नियमानुसार त्याबाबत सूट दिली आहे. त्यामुळे या पेटय़ा बसवण्याबाबत कोणतेही बंधन नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मिडी, सर्वसाधारण, वातानुकूलित अशा एकूण ४,२३० बसेस बेस्टच्या ताफ्यात आहेत.

तर ३८ लाखांहून अधिक प्रवासी रोज बेस्ट बसने प्रवास करतात. प्रवाशांच्या माध्यमातून बेस्टच्या तिजोरीत रोज ३ कोटी १९ लाख ७६ हजार रुपये जमा होतात. मात्र कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळूनही सुविधा देण्याबाबत बेस्ट प्रशासन उदासीन का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version