Home टॉप स्टोरी विदर्भाच्या जीवावर भाजपाचा जल्लोष

विदर्भाच्या जीवावर भाजपाचा जल्लोष

1

एकट्या विदर्भाच्या जिवावर संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला चांगले यश मिळाले असे ढोल पिटले जात असून हा दावा पूर्णपणे खोटा ठरवणारी खरी आकडेवारी आता समोर येत आहे.

मुंबई- राज्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फक्त विदर्भात समर्थन मिळाले आहे. मात्र एकट्या विदर्भाच्या जिवावर संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला चांगले यश मिळाले असे ढोल पिटले जात आहेत. हा दावा पूर्णपणे खोटा ठरवणारी खरी आकडेवारी आता समोर येत आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असणा-या पंकजा मुंडे यांच्या मराठवाडय़ातील २५ नगरपरिषदांपैकी केवळ दोनच ठिकाणी यश मिळाले आहे. तर कोकणातील १६ पैकी केवळ तीनच जागी भाजपाला विजय मिळालेला आहे. तरीही संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाला यश मिळाले असल्याचा देखावा भाजपाकडून निर्माण केला जातो आहे, तो पूर्णपणे धूळफेक करणारा असल्याची वस्तुस्थिती संपूर्ण राज्यातील आकडेवारी समोर आणते.

राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणा-या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. १४६ नगराध्यक्षपदांच्या निवडणुका झाल्या. त्यातील ५२ नगराध्यक्षांची पदे जिंकली असे भाजपाने जाहीर केले आहे. मात्र त्यातील काही जागा या इतर पक्षांशी, स्थानिक गटांशी आघाडी म्हणून लढलेल्या आहेत. ते विजयही भाजपाने आकडे फुगविण्यासाठी आपल्या खात्यात जमा केले आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील वाई, इस्लामपूर नगरपरिषदेत खरे तर स्थानिक विकास आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाला आहे. मात्र भाजपाने त्याला आपल्या खात्यात जमा केले आहे. तसेच मराठवाडय़ात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथेही शहर विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. तेथे भाजपाने फक्त पाठिंबा दिला होता. तरीही तो नगराध्यक्ष आपल्या खात्यात धरला आहे. इतक्या चलाखीनंतरही जो विजयाचा गवगवा केला जात आहे, खरोखरच तितके यश आहे का, हे पहिल्यास त्यातला खोटेपणा उघड येतो.

राज्यात झालेल्या १४६ नगरपालिकेच्या निवडणुकीत जे भाजपासह आघाडय़ांचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, ते ५२ आहेत. पन्नास टक्केसुद्धा नाही, तर केवळ ३० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातही ज्या ५२ जागा दाखविल्या जात आहेत, त्यातील २४ जागा एकटय़ा विदर्भातील आहेत. त्या वजा केल्या आणि जिथे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष आहेत, त्या जागा वजा केल्या तर भाजपाच्या नगरपालिकांची संख्या एकदम खाली येऊ शकते. विशेषत: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणा-या पंकजा मुंडे या नेतृत्व देत असलेल्या मराठवाडय़ातील २५ जागांपैकी केवळ गेवराई आणि धारुर या दोनच ठिकाणी भाजपाला यश मिळालेले आहे. कोकणातही केवळ तीनच नगरपालिकांत भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील ३८ पैकी केवळ ११ जागांवर म्हणजे ३० टक्के जागांवरच भाजपाने यश मिळविले आहे.

अनेक ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आलेले असले तरी तेथील बहुमत मात्र भाजपाला मिळालेले नाही. त्यामुळे नगर परिषदेचा कारभार करताना भाजपाच्या नगराध्यक्षाला एक तर विरोधकांच्या हातातले बाहुले म्हणून काम करावे लागेल. अन्यथा मग त्या नगराच्या विकासावर परिणाम होणार आहे. असे असताना भाजपाने मंगळवारी खोटय़ा विजयाचा खोटा जल्लोष साजरा केला. प्रदेश कार्यालयात विजयोत्सव, तर महापालिकेत पेढे वाटले. भाजपा वस्तुस्थिती दडवत असताना, विरोधी पक्षांकडून मात्र भाजपाचे लबाडी उघड करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कुणीही आक्रमकपणे पुढे येताना दिसत नाही. म्हणूनच हा खोटा विजयच लोकांना खरा वाटण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

  1. साहेब पराभव स्वीकारायला खूप मोठे मन लागते देशात नोटबंदीच एव्हढं वादळ विरोधकांनी गाजवलं पण लोकांवर
    त्याचा काहीही परिणाम झाला नाही तुमच्या मते विदर्भ सोडून ३०% जागा जरी भाजप ने जिंकल्या असतील तरी
    त्यांनी विजय साजरा करायला हरकत नाही कारण सर्व पक्ष मिळून नोटबंदीचा जो गवगवा डोक्यावर तुम्ही नाचले
    त्याला जनतेने आपल्या मतांनी उत्तर दिले निदान जनतेचा आदर करायला शिका नाहीतर या पेक्षाही खराब दिवस
    तुमच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version