Home टॉप स्टोरी काँग्रेस नेते लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडले

काँग्रेस नेते लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडले

0

महाराष्ट्रात झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पिछेहाटीला राज्यात ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ते नेतेच जबाबदार आहेत, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

मुंबई- महाराष्ट्रात झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पिछेहाटीला राज्यात ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ते नेतेच जबाबदार आहेत, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नेमकी हीच भावना सोमवारी बोलून दाखविली होती. विशेषत: महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबत थोरात यांनी अगदी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. थोरात यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे राणे यांच्या भूमिकेला दिलेला पाठिंबाच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यातील मिनी विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जाणा-या नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. सोमवारी त्याचे निकाल जाहीर झाले. त्यात काँग्रेसला पोषक वातावरण असतानाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. याबाबत नारायण राणे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली होती. वातावरण पोषक होते आणि कार्यकर्तेही तयार होते. मात्र नेते स्वस्थ बसून होते, असे मत राणे यांनी व्यक्त केले होते. नेमक्या तशाच भावना नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले की, खरे तर काँग्रेस पक्ष हा लोकमानसात खोलवर रुजलेला पक्ष आहे. लोक अजूनही काँग्रेसला मानतात. परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्यातील काँग्रेसचे नेते म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी ज्या त-हेने काम करायला हवे होते, तसे केल्याचे दिसत नाही. इतकेच नव्हे तर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षच जास्त दिसून येतो. आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये काम करीत असताना प्रचंड कोंडमारा होतो. आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा कोंडमारा करण्यात ज्यांच्याकडे पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी आहे, असे पदावरील काँग्रेसचे नेते धन्यता मानत आहेत, असा टोला राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता त्यांनी लगावला.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे राज्यातील जनतेमध्ये खूप असंतोष आहे. सर्वसामान्य माणसांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वर्षभर कष्ट करून पिकविलेल्या पिकांना शेतक-यांना भाव मिळत नाही. मातीमोल भावाने शेतीमाल विकला जात आहे. मात्र लोकांच्या मनात असलेल्या या असंतोषाला ज्या त-हेने काँग्रेसच्या नेतृत्वाने केंद्रीत करण्याची गरज होती, त्या त-हेने केले नाही. भविष्यात तरी आपापसातील कुरघोडय़ा करण्याचे राजकारण सोडून काँग्रेस पक्षातील लोकांनी एकत्रित काम करावे, अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version