Home क्रीडा कबड्डी खेळ महाराष्ट्राने दिला, बाद झाला महाराष्ट्रचं

कबड्डी खेळ महाराष्ट्राने दिला, बाद झाला महाराष्ट्रचं

1

अहमदाबादमध्ये (गुजरात) शुक्रवारपासून (७ ऑक्टोबर) खेळल्या जाणा-या कबड्डी वर्ल्डकपची उत्सुकता सर्वाना असली तरी महाराष्ट्राच्या एकाही कबड्डीपटूला स्थान मिळाल्याने राज्यभरातील कबड्डी चाहते निराश झाले आहेत.

मुंबई- अहमदाबादमध्ये (गुजरात) शुक्रवारपासून (७ ऑक्टोबर) खेळल्या जाणा-या कबड्डी वर्ल्डकपची उत्सुकता सर्वाना असली तरी महाराष्ट्राच्या एकाही कबड्डीपटूला स्थान मिळाल्याने राज्यभरातील कबड्डी चाहते निराश झाले आहेत. ज्या महाराष्ट्राने भारतासह जगभराला कबड्डी खेळ दिला, त्याच महाराष्ट्रावर हा अन्याय आहे. काशिलिंग आडके, नीलेश शिंदे, रिशांक देवाडिगा, विशाल माने, सचिन शिंगाडे आणि गिरीश ईरनाक नेमके कुठे कमी पडले, असा प्रश्न सर्वाना सतावतोय.

कबड्डी वर्ल्डकप २०१६साठी तब्बल २६ जणांमधून १४ कबड्डीपटूंचा संघ निवडण्यात आला. अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील निवडलेला भारताचा संघ सवरेत्कृष्ट असला तरी त्यात महाराष्ट्राचा एकही कबड्डीपटू नसल्याने आश्चर्य वाटले. एक-दोन नव्हे तर महाराष्ट्राच्या सहा जणांचा संभाव्य संघात समावेश होता. त्यात काशिलिंग आडके, नीलेश शिंदे, रिशांक देवाडिगा, विशाल माने, सचिन शिंगाडे आणि गिरीश ईरनाक होते. मात्र त्यांचा विचार झाला नाही.

गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय संघ निवडण्यात आला, असे भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीप्रसाद चौरासिया यांचे म्हणणे आहे. मग महाराष्ट्राची गुणवत्ता दिसली नाही का? चढाईपटू काशिलिंग, बचावपटू (पकड) विशाल माने, रिशांक देवाडिगा आणि नीलेश शिंदेने प्रो-कबड्डी लीगमध्ये छाप पाडली आहे.

यू मुंबाचे प्रतिनिधित्व करताना रिशांकने ५९ सामन्यांत ३२० गुण मिळवलेत. प्रो-कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामात १० सवरेत्कृष्ट चढाईपटूंमध्ये काशिलिंग आडके आणि रिशांक देवाडिगाचा समावेश आहे. दबंग दिल्लीचा काशिलिंग ५८ गुणांसह सातव्या, यू मुंबाचा रिशांक ५७ गुणांसह आठव्या स्थानी आहे. ‘सुपर रेड’ करण्यात काशिलिंग पाचव्या आणि रिशांक नवव्या स्थानी आहे. यंदा झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघात काशिलिंग आणि विशालचा समावेश होता. ही कामगिरी वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्यास पुरेशी नाही का?

कबड्डी महासंघाचे पदाधिकारी ‘मेरीट’ची भाषा करत असले तर हिमाचल प्रदेशच्या अजय ठाकूरची निवड कुठल्या गुणवत्तेच्या आधारे केली. प्रो-कबड्डी लीगच्या मागील हंगामात त्याची कामगिरी सुमार झाली. हरयाणाचा जसवीर सिंग तसेच तामिळनाडूचा धरमराज चेलाराथन वयस्कर आहेत. तरीही त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला.

मात्र रिशांक आणि विशाल या तरुणांकडे दुर्लक्ष करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर हरयाणाचे वर्चस्व समजता येऊ शकेल. वर्ल्डकप संघात निम्मे म्हणजे सात हरयाणावासी आहेत. मात्र कबड्डीची ‘क्रेझ’ नसलेल्या हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाबच्या कबड्डीपटूंना १४ सदस्यीय संघात स्थान मिळू शकते. मात्र महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न कबड्डी चाहते करत आहे.

वर्ल्डकपसारख्या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता न आल्याने महाराष्ट्राचे कबड्डीपटू निराश झालेत. डोंबिवलीचा नीलेश शिंदे म्हणाला की, ‘‘मी आता पस्तिशीतला आहे. शिवाय प्रो-कबड्डीत चांगला फॉर्मही दाखवला. मात्र वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने निराश झालो. मायदेशात झालेल्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याची आनंदच वेगळा असतो.’’.

यंदाच्या कबड्डी वर्ल्डकप संघात १२ संघ खेळतील. त्यात यजमान भारतासह इराण, दक्षिण कोरिया, बांगलादेश, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पोलंड, थायलंड, जपान, अर्जेटिना, केनया संघांचा समावेश आहे.

महाराष्ट्राचे योगदान विस्मरणात

पंकज शिरसाटच्या नेतृत्वाखाली भारताने पनवेलमध्ये (रायगड) झालेला २००७ वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी चुरशीच्या अंतिम लढतीत भारताने इराणवर मात केली होती. पंकजसह दिनेश कुमार आणि गौरव शेट्टीही त्या वर्ल्डकपमध्ये चमकले होते.

1 COMMENT

  1. खूपच खराब झाले ज्याना काही माहित नाही ते हिरो आणि जे चांगले खिलाडी आहेत ते जिरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version