Home क्रीडा भारताला विजयासाठी हव्यात ७ विकेट

भारताला विजयासाठी हव्यात ७ विकेट

1

 श्रीलंके विरुध्द सुरु असलेल्या तिस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. 

कोलंबो- मध्यमगती इशांत शर्माच्या अचूक मा-यामुळे भारताला तिस-या कसोटीसह तब्बल २२ वर्षानी मालिका विजय दृष्टीक्षेपात आहे. पाहुण्यांच्या ३८६ धावांच्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर सोमवारी श्रीलंकेने ३ बाद ६७ धावा केल्यात. भारताला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी आणखी ७ विकेटची आवश्यकता आहे.

पहिल्या डावाप्रमाणेच दुस-या डावातही इशांतने यजमानांना हादरवले. पहिल्याच षटकात त्याने सलामीवीर उपुल थरंगाला यष्टिरक्षक नमन ओझाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर उमेश यादवने ‘वनडाऊन’ दिमुथ करुणारत्नेला त्याच प्रकारे माघारी धाडले. थरंगा आणि करुणारत्ने खातेही उघडू शकले नाहीत. १ बाद १ आणि २ बाद २ अशा बिकट स्थितीतील यजमानांना दिनेश चंडिमललाही (१८) लवकर गमवावे लागले. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये कोहलीने त्याचा झेल टिपला.

वास्तविक पाहता या झेलाचे निम्मे श्रेय लोकेश राहुलला जाते. त्याने सूर मारला. मात्र चेंडू हातात न आल्याने वरती उडवला. त्याचे अर्धे काम कोहलीने पूर्ण केले. ३ बाद २१ अशा स्थितीतून यजमानांना सलामीवीर कौशल सिल्वा (खेळत आहे २४) आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने (खेळत आहे २२) सावरले. या जोडीने तिस-या विकेटसाठी ४६ धावांची नाबाद भागीदारी रचली. त्यामुळे यजमान थोडे (३ बाद ६७) सावरलेत. पाचव्या दिवशी श्रीलंकेला जिंकण्यासाठी आणखी ३१९ धावांची आवश्यकता आहे. यजमानांना किमान ९८ षटके खेळायला मिळतील. मंगळवारी पहिल्या तासातील खेळ महत्त्वपूर्ण ठरेल. श्रीलंकेसाठी विजय तितका सोपा नसला तरी सामन्यासह मालिका पराभव वाचवताना त्यांची ‘कसोटी’ लागेल, हे निश्चित. १९९३ मध्ये मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला श्रीलंकेत (१-०) हरवण्याची करामत साधली होती.

तत्पूर्वी, भारताच्या मदतीला मधल्या फळीसह तळातील फलंदाज धावून आले. ३ बाद २१ वरून पुढे खेळताना पाहुण्यांनी आणखी २५३ धावांची भर घातली. त्याचे श्रेय रवीचंद्रन अश्विन (५८), रोहित शर्मासह (५०), स्टुअर्ट बिन्नीचे (४९) मोलाचे योगदान राहिले. त्यांना नमन ओझा (३५) आणि अमित मिश्राची (३९) चांगली साथ लाभली. अर्धशतके झळकावणा-या रोहित आणि अश्विनने छोटेखानी परंतु, उपयुक्त भागीदा-या रचताना भारताला २७४ धावांची मजल मारून दिली.

चौथ्या दिवशी सकाळी रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीसह जवळपास तासभर किल्ला लढवला. मात्र कोहलीला (२१) उपुल थरंगाकरवी बाद करत नुवान प्रदीपने जोडी फोडली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५७ धावा जोडल्या. रोहित-कोहलीनंतर रोहित-बिन्नी जोडी जमली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने मालिकेतील दुसरे आणि एकूण चौथे अर्धशतक मारताना ४ चौकार आणि एक षटकार लगावला. बिन्नी आणि ओझाही लवकर स्थिरावले. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. मात्र ‘सेट’ झाल्यानंतर मोठी खेळी करण्यात त्यांना अपयश आले. कदाचित झटपट खेळण्याचा आदेश दोघांनाही संघ व्यवस्थापनाने दिला असावा. बिन्नीचे दुसरे अर्धशतक एका धावेने हुकले. त्याने ७ चौकार मारले. ओझाच्या ३५ धावांच्या खेळीत चार चौकारांचा समावेश आहे.

भारताने ७ बाद १७९ धावा अशा काहीशा बिकट स्थितीतून आणखी ९५ धावा जोडल्या. त्यात आठव्या आणि नवव्या क्रमांकावरील अमित मिश्रा (३९) आणि आर. अश्विनचा (५८) मोलाचा वाटा आहे. अश्विनने मिश्रासह आठव्या विकेटसाठी ५५ आणि उमेश यादवसह नवव्या विकेटसाठी ३५ धावा जोडताना भारताला पावणेतीनशे धावांच्या घरात नेले. मिश्राला सलग दुस-या अर्धशतकाने हुलकावणी दिली तरी अश्विनने कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ८७ चेंडूंतील ५८ धावांच्या खेळीत ७ चौकारांचा समावेश आहे. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसाद आणि नुवान प्रदीपने प्रत्येकी चार विकेट घेत सातत्य राखले.

धावफलक

भारत : पहिला डाव – ३१२. श्रीलंका : पहिला डाव – २०१.

भारत : दुसरा डाव – (३ बाद २१ वरून पुढे) विराट कोहली झे. थरंगा गो. प्रदीप २१, रोहित शर्मा झे. प्रदीप गो. प्रसाद ५०, स्टुअर्ट बिन्नी झे. थरंगा गो. प्रसाद ४९, नमन ओझा झे. करुणारत्ने गो. हेरथ ३५, अमित मिश्रा धावचीत गो. सिल्वा ३९, आर. अश्विन झे. परेरा गो. प्रसाद ५८, उमेश यादव झे. हेरथ गो. प्रदीप ४, इशांत शर्मा नाबाद २,

अवांतर – १०, एकूण : ७६ षटकांत सर्वबाद २७४.

बादक्रम : १-० (पुजारा), २-२ (राहुल), ३-७ (रहाणे), ४-६४(कोहली), ५-११८(रोहित), ६-१६०(बिन्नी), ७-१७९(ओझा), ८-२३४(मिश्रा), ९-२६९(यादव), १०-२७४(अश्विन).

गोलंदाजी : धम्मिका प्रसाद १९-३-६९-४, नुवान प्रदीप १७-२-६२-४, रंगना हेरथ २२-०-८९-१, अँजेलो मॅथ्यूज ६-३-११-०, थरिंदू कौशल १२-२-४१-०.

श्रीलंका : दुसरा डाव – उपुल थरंगा झे ओझा गो. इशांत ०, दिमुथ करुणारत्ने झे. ओझा गो. यादव ०, दिनेश चंडिमल झे. कोहली गो. इशांत १८, कौशल सिल्वा खेळत आहे २४, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे २२,

अवांतर – ३ एकूण : १८.१ षटकांत तीन बाद ६७

बादक्रम : १-१(थरंगा), २-२(करुणारत्ने), ३-२१(चंडिमल)

गोलंदाजी : इशांत ७-२-१४-२, उमेश यादव ५-१-३२-१, स्टुअर्ट बिन्नी ४-१-१३-०, अमित मिश्रा २-०-२-०, आर. अश्विन ०.१-०-४-०

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version