Home Uncategorized क्रिकेट विश्वचषक २०१५ दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय

दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय

0

वेलिंग्टनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यूएईवर १४६ धावांनी विजय मिळवला.

वेलिंग्टन- अननुभवी संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) गुरुवारी १४६ धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात दुस-या स्थानी झेप घेतली.

कर्णधार एबी डेविलियर्सची (८२ चेंडूंत ९९ धावा आणि २ विकेट) अष्टपैलू खेळी त्यांच्या मोठय़ा आणि एकतर्फी विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या ३४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यूएईचा डाव ४७.३ षटकांत १९५ धावांत आटोपला.

डेविलियर्सने फॉर्म कायम राखताना स्पर्धेतील दुसरे तसेच वनडेतील ४५वे अर्धशतक ठोकले तरी त्याला शतकाने हुलकावणी दिली. मात्र या खेळीदरम्यान ४ षटकार ठोकत एबीने या विश्वचषकातील षटकारांची संख्या २०वर नेली. विश्वचषकातील हे सर्वाधिक वैयक्तिक षटकार आहेत. सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान पटकावताना डेविलियर्सने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला मागे टाकले. २००७ मध्ये त्याने १८ षटकार लगावले होते. फलंदाजीनंतर डेविलियर्सने गोलंदाजीतही हात अजमावले. प्रतिस्पर्धी यूएई संघाने मोठय़ा फरकाने पराभव पत्करला तरी त्यांनी ४७.३ षटके खेळून काढली, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

सलामीवीर हशिम अमला (१२) आणि क्विंटन डी कॉकला (२६) मोठी खेळी करण्यात अपयश आले तरी कर्णधार एबी डेविलियर्स द. आफ्रिकेच्या मदतीला धावला. त्याने झटपट खेळी करताना डेव्हिड मिलरसह (४९) चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची शतकी भागीदारी केली. मिलरचे अर्धशतक हुकले. त्यानंतर डेविलियर्सलाही शतक पूर्ण करण्यात अपयश आले. त्याच्या ८२ चेंडूंतील ९९ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. डेविलियर्सनंतर सातव्या क्रमांकावरील फरहान बेहार्डियनने सामन्याची सूत्रे आपल्याकडे घेत ५ चौकार आणि ३ षटकारांसह केवळ ३१ चेंडूंत ६४ धावांची चमकदार खेळी केली. झटपट खेळीसह व्हर्नन फिलँडरसह (नाबाद १०) सातव्या विकेटसाठी त्याने जोडलेल्या नाबाद ४९ धावांमुळे द. आफ्रिकेला निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३४१ अशी मोठी धावसंख्या उभारता आली. यूएईतर्फे मध्यमगती मोहम्मद नावीद (३ विकेट) सर्वात यशस्वी ठरला.

फलंदाजी सर्वकाही आलबेल असलेल्या दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी तितकी प्रभावी वाटली नाही. केवळ एकाच फलंदाजाने अर्धशतकी मजल मारली तरी यूएईने आपल्या वाटय़ाची जवळपास सर्व षटके खेळून काढण्याचे दाखवलेले धाडस उल्लेखनीय आहे. मात्र त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीत अद्याप सुधारणा अपेक्षित असल्याचेही स्पष्ट झाले. आघाडी फळी कोसळल्यानंतर शायमन अन्वर (३९) आणि भारतीय वंशाचा स्वप्नील पाटीलने (नाबाद ५७) चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केल्यामुळे यूएईचा डाव लांबला. व्हर्नन फिलँडरसह मॉर्नी मॉर्केलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तरी भरवशाच्या डेल स्टेनला केवळ एकच विकेट घेता आली. प्रमुख गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता येत नसल्याचे लक्षात आल्यावर कर्णधार डेविलियर्सने आपल्याकडे चेंडू घेतला. त्याने तीन षटकांत १५ धावा करताना २ विकेट घेतल्या. अष्टपैलू डेविलियर्सला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

चौथ्या विजयासह आठ गुणांसह दुसरे स्थान पटकावले तरी पाकिस्तान वि. आर्यलड आणि वेस्ट इंडिज वि. यूएई लढतींनंतरच दोन ते चार क्रमांकावरील संघ निश्चित होतील. सुरुवातीच्या पाचही लढती जिंकणारा भारत सर्वाधिक १० गुणांसह ‘ब’ गटात अव्वल स्थानी आहे.

दक्षिण आफ्रिका- हाशिम अमला झे. अमजद अली गो. मोहम्मद नावीद १२, क्विंटन डी कॉक झे. सकलीन हैदर गो.अमजद जावेद २६, रिली रॉसो झे आणि गो. मोहम्मद ४३, एबी डेविलियर्स झे. अमजद जावेद गो. कामरान शहजाद ९९, डेव्हिड मिलर गो. मोहम्मद नावीद ४९, जे. पी. दुमिनी पायचीत गो. मोहम्मद नावीद २३, फरहान बेहार्डियन नाबाद ६४, व्हर्नन फिलँडर नाबाद १०, अवांतर – १५(लेगबाईज १, वाईड ५, नोबॉल ५, बाईज ४), एकूण – ५० षटकांत ६ बाद ३४१.

बादक्रम : १-१७ (अमला), २-८५ (कॉक), ३-९६ (रॉसो), ४-२०४ (मिलर), ५-२५७ (डेविलियर्स), ६-२९२ (दुमिनी).

गोलंदाजी : मोहम्मद नावीद १०-०-६३-३, कामरान शहजाद ८-०-५९-१, अमजद जावेद १०-०-८७-१, मोहम्मद ताकीर १०-०-४७-१, फहाद अल्हाश्मी ७.२-०-४५-०, खुर्रम खान ४-०-३१-०, शायमन अन्वर ०.४-०-४-०.

संयुक्त अरब अमिराती (यूएई)- अमजद अली झे. बेहार्डियन गो. दुमिनी २१, अँड्री बेरेंगर झे. रॉसो गो. मॉर्केल ५, र्खुरम खान झे. कॉक गो. मॉर्केल १२, शायमन अन्वर झे. रॉसो गो. इम्रान ताहिर ३९, स्वप्नील पाटील नाबाद ५७, सकलीन हैदर झे. रॉसो गो. डेविलियर्स ७, अमजद जावेद झे. पार्नेल गो. डेविलियर्स ५, मोहम्मद नावीद झे. डेविलियर्स गो. फिलँडर १७, मोहम्मद ताकीर त्रि. गो. स्टेन ३, कामरान शहजाद झे. स्टेन गो. फिलँडर ०, फहाद अल्हाश्मी(दुखापतग्रस्त) अवांतर – २९(बाईज ४, लेगबाईज १६, वाईड ६, नोबॉल ३), एकूण – ४७.३ षटकांत सर्वबाद १९५.

बादक्रम : १-२९(बेरेंगर), २-४५(अमजद अली), ३-४५(खुर्रम), ४-१०८(अन्वर), ५-११८(सकलीन हैदर), ६-१२५(अमजद जावेद), ७-१६३(नावीद), ८-१८९(मोहम्मद ताकीर), ९-१९५(शहजाद).

गोलंदाजी ; डेल स्टेन ९-१-४०-१, व्हर्नन फिलँडर ८.३-१-३४-२, मॉर्नी मॉर्केल १०-२-२३-२, जेपी दुमिनी ३-१-१२-१, बेहार्डियन ४-१-११-०, इम्रान ताहीर १०-०-४०-१, एबी डेविलियर्स ३-०-१५-२.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका – सहा बाद ३४१
यूएई – सर्वबाद १९५

सामनावीर  – ए बी डेविलियर्स(९९)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version