Home महामुंबई ठाणे महाराष्ट्रात सैनिक भरतीचा पेपर फुटला !

महाराष्ट्रात सैनिक भरतीचा पेपर फुटला !

0

सैन्यात दाखल होण्यासाठी घेतल्या जाणा-या लेखी परीक्षेचा पेपर महाराष्ट्रात फुटल्याची धक्कादायक बाब ठाणे गुन्हे शाखेने समोर आणली आहे. 

ठाणे- सैन्यात दाखल होण्यासाठी घेतल्या जाणा-या लेखी परीक्षेचा पेपर महाराष्ट्रात फुटल्याची धक्कादायक बाब ठाणे गुन्हे शाखेने समोर आणली आहे. रविवारी देशभरात ही परीक्षा होऊ घातली असताना ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री राज्याच्या अनेक शहरांमध्ये छापे घालत १८ जणांना बेडया ठोकल्या असून तब्बल ३५०पेक्षा जास्त परीक्षार्थीची धरपकड केली आहे. या प्रकारात सैन्यातील उच्चपदस्थ सामील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून याबाबतचा तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर सैन्य भरती बोर्डाने देशभरात झालेली ही परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी प्रामाणिकपणे तयारी केलेल्या उमेदवारांच्या पोटात गोळा उठला आहे.

देशाच्या सैन्यात सैनिक म्हणून सहभागी होण्यासाठी मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा होते. देशभरात एकाच वेळी होणा-या या परीक्षेत हजारो परीक्षार्थी सहभागी होतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक ठिकाणी खासगी क्लासेसही चालवले जातात. अशाच एका क्लासच्या चालकाला त्याच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना काही एजंट येऊन भेटल्याची माहिती मिळाली. या एजंट्सनी विद्यार्थ्यांना ४ ते ५ लाख रुपयांच्या मोबदल्यात परीक्षेचा पेपर देण्याची तयारी दर्शवली.

ही माहिती सदर क्लासचालकाने ठाणे गुन्हे शाखा युनिट १ला दिली. त्यानुसार गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत राज्याच्या अनेक भागात तातडीने ३ पथके रवाना केली. या पथकांनी शनिवारी मध्यरात्री एकाच वेळी ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, गोवा याठिकाणी छापे टाकत १८ जणांना अटक केली.

तसेच आदल्या दिवशीच लॉज, हॉटेल अशा ठिकाणी पेपर सोडवत असलेल्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही प्रश्नपत्रिकाही जप्त करण्यात आल्या होत्या. याच प्रश्नपत्रिका रविवारी सकाळी ११ वाजता झालेल्या परीक्षेत देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर या प्रकाराची पुष्टी झाली. त्यामुळे पोलिसांनी विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल करत तपास सुरू केला आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये क्लासचालक आणि काही माजी सैनिकांचा समावेश असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या आरोपींकडून पाच गाडया आणि मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.

सैन्यातील उच्चपदस्थांचा सहभाग?

पेपरफुटीचे हे रॅकेट देशव्यापी असण्याची शक्यता सहआयुक्त डुंबरे यांनी व्यक्त केली आहे. या रॅकेटमध्ये सैन्यातील काही उच्चपदस्थ अधिका-यांचा थेट सहभाग असण्याचीही प्राथमिक शक्यता आहे. त्यांच्या सहभागाशिवाय पेपर फुटणे शक्य नसून त्यामुळे पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केला आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेतही भ्रष्टाचार होत असल्याच्या या प्रकारामुळे देशभरात खळबळ माजली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version