Home टॉप स्टोरी नगराध्यक्ष भाजपाचे.. बहुमत विरोधकांचे

नगराध्यक्ष भाजपाचे.. बहुमत विरोधकांचे

1

महाराष्ट्रात मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणा-या या निवडणुकीत भाजपाला चांगलीच झुंज द्यावी लागली असून काँग्रेस दुस-या क्रमांकावर आहे.

मुंबई- राज्यात झालेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात सत्ताधारी भाजपाला २२ ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले असून त्या पाठोपाठ २१ ठिकाणी बहुमत मिळवून काँग्रेस दुस-या क्रमांकावर आहे. १८ ठिकाणी बहुमत मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस तिस-या क्रमांकावर आहे, तर १५ ठिकाणी बहुमत मिळवू शकलेली शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. २६ ठिकाणची अवस्था त्रिशंकू आहे. नगराध्यक्षांच्या निवडणुकीत मात्र भाजपा ५१, शिवसेना २४, काँग्रेस २१ तर राष्ट्रवादी काँग्रेस १९ असे पक्षीय बलाबल आहे.

महाराष्ट्रात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल लागले असून मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणा-या या निवडणुकीत भाजपाला चांगलीच झुंज द्यावी लागली आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने ५१ उमेदवार मिळवून आघाडी मिळविली असली तर त्यातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ५१ पैकी केवळ २२ नगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. उर्वरित २९ ठिकाणी भाजपाचा नगराध्यक्ष असला तरी बहुमत मात्र विरोधी पक्षांकडे आहे. तसेच शिवसेनेचे २४ नगराध्यक्ष निवडून आलेले असले तरी त्यांना बहुमत मात्र केवळ १५ ठिकाणीच मिळालेले आहे. त्यामुळे ९ नगर परिषदेत शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना तेथे त्यांना बहुमत नसल्यामुळे भविष्यात कारभार करणे जिकीरीचे होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने मात्र समतोल साधल्याचे दिसून येते. काँग्रेसचे २१ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि तेवढय़ाच ठिकाणी त्यांचे बहुमत आहे. राष्ट्रवादीचे १९ ठिकाणी नगराध्यक्ष असले तरी बहुमत मात्र १८ ठिकाणी असणार आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा केलेला प्रयोग जवळपास सर्वच पक्षांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून भविष्यात याबाबत फेरविचार करण्याबाब सरकार विचार करू शकते.

या निवडणुकीत काही ठिकाणचे निकाल हे अत्यंत चमत्कारिक लागले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांच्या मतदारसंघात असलेल्या कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळालेले असले तरी तेथे भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारामुळे धर्मनिरपेक्षा मताची विभागाणी झाल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

वाई येथेही भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला आहे, तर बहुमत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले आहे. रत्नागिरी येथील खेड येथे मात्र मनसेला नगराध्यक्ष मिळालेले असला तरी बहुमत शिवसेनेला मिळालेले आहे. तर सांगोला येथे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना बहुमत मिळालेले असले तरी नगराध्यक्ष मात्र महाआघाडीचा निवडून आला आहे. आंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसला बहूमत मिळालेले असले तरी तेथे बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वहिणी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भविष्यात विकास कामात अडथळे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित बातम्या…

काँग्रेसने केसरकरांना अस्मान दाखवले

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक:नेते स्वस्थ

राजापूर नगराध्यक्ष काँग्रेसचा

1 COMMENT

  1. प्रहार हा नारायण राणे यांचा असला तरी जनतेला सत्य सांगावे. उगाच काँग्रेस चा उदो उदो करू नये ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version