Home महाराष्ट्र कोकण काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक:नेते स्वस्थ

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक:नेते स्वस्थ

0

विरोधी पक्षांनी आक्रमक व्हायला हवे, तरच निवडणुका जिंकता येतील, असा विश्वास काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग- सत्तारूढ पक्षापेक्षा विरोधी पक्षांनी आक्रमक व्हायला हवे. निवडणुका युद्धपातळीवर लढवल्या पाहिजेत. घरात बसून निवडणुका जिंकता येत नाहीत. काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, लढवय्ये आहेत. ते लढायला तयार आहेत. मात्र, नेते आक्रमक होत नाहीत. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहात नाहीत. वरिष्ठ नेत्यांची कार्यकर्त्यांना साथ मिळत नाही. निवडणुका कार्यकर्त्यांना जिंकायच्या आहेत. ते लढतील व जिंकतील अशा विचारात काँग्रेसचे राज्यस्तरावरील वरिष्ठ नेते स्वस्थ बसले होते. कार्यकर्त्यांप्रमाणे ते आक्रमक होत नाहीत. याचे कारण त्यांना माहित आहे की, घरात बसून राजकारण करणा-यांना अपेक्षित पदे मिळतात. गुणवत्ता पाहून पदे दिली जात नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांप्रमाणे ते आक्रमक होत नाहीत. त्यामुळेच राज्यपातळीवर काँग्रेस उभारी घेण्याऐवजी ‘जैसे थे’ राहिली आहे अगर पिछाडीवर जात आहे. याचा विचार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी करावा, अशी टीका काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी केली.

आमदार नारायण राणे पुढे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे नेते स्वस्थ बसून राहिले. त्यांनी निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. काँग्रेस नेते आक्रमक होत नाहीत. काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना अपेक्षित बदल झाले, पक्षश्रेष्ठींनी त्यासंदर्भात विचार केला तरच येत्या जि. प. आणि पं. स. निवडणुका जिंकता येतील. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर विधानसभा-लोकसभा निवडणुकांचे यश अवलंबून असते.

वैयक्तिक फायद्यासाठी पक्षाचे नुकसान होता नये याचा विचार भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी करणे गरजेचे आहे, असेही नारायण राणे येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत विचारले असता म्हणाले.

मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रश्न घेऊन सरकारच्या विरोधात काँग्रेसने आंदोलनात उतरले पाहिजे, असाही इशारा त्यांनी दिला.

आ. नारायण राणे पुढे म्हणाले, गेल्या विधानसभा- लोकसभा निवडणुकीत जनतेचा जो कल होता. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात परिवर्तन होत आहे. सिंधुदुर्गातील ६४ पैकी काँग्रेसचे ३१ आणि काँग्रेस पुरस्कृत ४ असे ३५ नगरसेवक निवडून येऊन काँग्रेसला अतिशय चांगले यश मिळाले आहे. जनतेने भाजपा-शिवसेनेचे या जिलतून उच्चाटन केले आहे. रत्नागिरी जिलत राजापूर न.प.वर काँग्रेसचा विजय झाला आहे. सिंधुदुर्गात काँग्रेस प्रथम क्रमांकावर तर रत्नागिरीत काँग्रेस द्वितीय क्रमांकावर असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. कोकणात मोठय़ा प्रमाणात परिवर्तन होत आहे, असा विश्वासही आ.नारायण राणे यांनी व्यक्त केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासावर मतदान होत नाही. जो पैसा खर्च करतो त्याला मतदान होते. भाजप-शिवसेना सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला. निवडणुकीत सत्ताधा-यांकडून सत्तेचा दुरूपयोग आडमार्गाने केला जातो. सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे काही ठिकाणी जे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांनी मिळवलेले यश वैचारिक, बौद्धिक व विकासाच्या मुद्यावर मिळवलेले नाही, असेही आ. नारायण राणे म्हणाले.

केंद्र सरकारच्या पाचशे-हजारच्या नोटाबंदीमुळे देशातील सर्वसामान्य जनतेचे फार हाल होत आहेत. बॅँकेतून ठेवलेले स्वत:चे पैसे मिळत नाहीत. बॅँकेतील स्वत:चे पैसे काढण्यासाठी रांगेत राहिलेल्यांचे मृत्यू होत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे फार मोठी झळ पोहोचत आहे. निवडणुकीच्या काळात बॅँकेतील स्वत:चे पैसे मिळाले नाहीत, मात्र, निवडणुकीत मिळाले. या क्षणिक लाभासाठी लोक भाजप-सेना सत्ताधा-यांना मते देतात, याबद्दल आ.नारायण राणे यांनी खंत व्यक्त केली.

जातीयवादी, धर्माध शक्तीच्या बाजूला जनता नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला दैनंदिन खर्चासाठी पैसे मिळत नाहीत. व्यापारी-व्यवसाय ठप्प झाले आहेत. दुस-या बाजूला गरीब मध्यमवर्गीयांची पिळवणूक होत आहे. स्वत:चे पैसे बॅँकेतून काढता येत नाही. सरकारी यंत्रणेकडून ज्याप्रमाणे नोटाबंदीच्या काळात कार्यवाही व्हायला पाहिजे होती तशी ती होत नाही. जोपर्यंत पुरेशा नवीन नोटा छापून व्यवहारात आणल्या जात नाहीत. तोपर्यंत बिघडलेली आर्थिक स्थिती पूर्वपदावर येणार नाही, अशी टीकाही आ.नारायण राणे यांनी केली.

तोपर्यंत मराठय़ांच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही

काँग्रेस नेते आ. नारायण राणे म्हणाले, मराठे दीर्घकाळ एखादा विषय लावून धरतात की सोडतात, हे महत्त्वाचे आहे. सध्याचे भाजप-शिवसेना सत्ताधारी मराठय़ांना आरक्षण देणार नसतील तर त्यांना मते का द्यावीत? त्यांना समर्थन का द्यावे? याचा विचार मराठय़ांनी करायला हवा. निवडणुकांमध्ये सत्ताधा-यांना मराठे विरोध करणार नसतील, जर त्यांना मराठय़ांचे समर्थन मिळत असेल तर त्यांना सत्ताधारी आरक्षण का देतील? विरोध होत नसल्याचे ‘अ‍ॅडव्हान्टेज’ सत्ताधारी घेतात. निव्वळ मोर्चे काढले. त्याचे फोटो वृत्तपत्रात, टीव्हीवर आले. अशाने आरक्षणाचा हा प्रश्न विद्यमान सरकार सोडवेल असे वाटत नाही. मराठे क्षणिक चिडतात. त्यातून प्रश्न सुटत नाहीत. भाजपवाले खाजगीत बोलतात की, मराठय़ांचे मोर्चे दाखवायला आहेत. त्यावरून हे सत्ताधारी मराठय़ांना आरक्षण देतील असे वाटत नाही. काही मिळवण्यासाठी त्याग करावा लागतो. जोपर्यंत त्या त्यागापर्यंत मराठे पोहोचणार नाही तोपर्यंत त्यांच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version