Home टॉप स्टोरी नोटाबंदी हाच मोठा घोटाळा-राहुल गांधी

नोटाबंदी हाच मोठा घोटाळा-राहुल गांधी

1

पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंदी घालण्याचा निर्णय म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

नवी दिल्ली- केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंदी घालण्याचा निर्णय म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. या घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नोटाबंदीच्या मुद्दयावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. दहा विरोधी पक्ष नोटाबंदीच्या विरोधात एकत्र झाले असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून या प्रकरणी खुलाशाची मागणी केली. संसदेच्या संकुलातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर विरोधकांनी धरणे आंदोलन केले. यात कॉँग्रेससह सपा, बसपा, तृणमूल कॉँग्रेस, द्रमुक, सीपीआय, माकप आदींचे खासदार सहभागी झाले होते.

गांधी म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी संसदेत येऊन संपूर्ण चर्चा ऐकावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय का घेतला याचा खुलासा देशवासीयांसमोर करावा. त्यांनी आपले उद्योगपती मित्र व भाजपा नेत्यांना याची कल्पना का दिली ? याबाबत देशाला सांगावे. तसेच जगातील सर्वात मोठे चलन बदल करताना त्यांनी अर्थमंत्री, मुख्य आर्थिक सल्लागारांना अंधारात का ठेवले ? असा सवाल त्यांनी केला.
नाचगाणे असलेल्या पॉप कॉन्सर्टमध्ये पंतप्रधान बोलतात. मात्र, ते संसदेत येत नाहीत. संसदेत येण्यास पंतप्रधान का घाबरतात ? त्यांना प्रश्नाला काय उत्तर द्यावे याची चिंता वाटते का? असा सवाल त्यांनी केला.

नोटाबंदीच्या विरोधात २०० खासदार एकत्र आले असून पंतप्रधानांनी हा निर्णय का घेतला याची माहिती द्यावी. कॉँग्रेस पक्षासह प्रत्येकजण भ्रष्टाचार व काळ्या पैशाच्या विरोधात लढत आहे. मात्र, या निर्णयासाठी १०० कोटी जनतेला त्रास देण्याची गरज काय ? हा महत्वाचा मुद्दा आहे. हा प्रश्न सत्तेचे केंद्रीकरणाचा आहे. संपूर्ण देश या पद्धतीने चालवला जाऊ शकत नाही, असा आरोप त्यांनी केला.

तुम्ही चांगल्या चाललेल्या अर्थव्यवस्थेला धक्का लावला आहेत. यूपीएच्या काळात ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था सुरू होती त्या पद्धतीने ती सध्या चालत नाही. बंगाल, केरळ आणि अन्य भागातील मच्छीमार व शेतक-यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शेतकरी व शेतमजूर देशोधडीला लागले आहेत. सूट बुट घातलेला एक तरी व्यक्ती रांगेत उभा आहे का ? भाजपाचा एकतरी आमदार, खासदार रांगेत दिसतो का ? त्यांना पैशांची गरज नाही, अशा शब्दात गांधी यांनी हल्लाबोल केला.

बॅँक आणि एटीएमच्या रांगेत मृत्यू झालेल्या नागरिकांना संसदेने श्रद्धांजली वाहिली पाहिजे. या नागरिकांना श्रद्धांजली वाहायला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.

1 COMMENT

  1. हेन्च्या कारकीर्द मध्ये काही करता आले नाही आणि दुसर्याने काही चांगले केलेले बघवत नाही. मित्र हो, या विरोध लोकांच्याकडे काणाडोळा करा
    आता जे सरकार निर्णय घेत आहे हे जनतेच्या हिता करिताच आहेत. आपण खचून जाऊन चालणार नाही, पुढील चांगले दिवस पाहायचे असतील तर आता थोडा त्रास सहन करावाच लागेल, पण देश हितासाठी आपले सहकार्य असायला हवे, ज्यांच्याकडे काळा पैसा आहे तेच लोक दंगा करीत आहेत बाकीचे सर्वसामान्य लोक आनंदात आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version