Home प्रतिबिंब वीज ग्राहकांचे हक्क आणि महत्त्वाच्या तरतुदी

वीज ग्राहकांचे हक्क आणि महत्त्वाच्या तरतुदी

5

वीज ग्राहकांना वीजमंडळाकडून जे अनेक प्रकारचे त्रास होतात, पिळवणूक, अडवणूक होते त्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महाराष्ट्रातील वीज वितरण करणा-या सर्व वितरण परवानेधारकांसाठी विद्युत पुरवठा संहिता लागू केली आहे. त्यामध्ये वीजपुरवठा व संबंधित सर्व नियम व अटी समाविष्ट आहेत. हे नियम २० जानेवारी २००५ पासून लागू करण्यात आले.

विजेची नवीन जोडणी : विजेच्या नवीन जोडणीसाठी वीज ग्राहकाला वीज कंपनीकडे अर्ज करावा लागतो. असा अर्ज वीज कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात मोफत उपलब्ध असतो किंवा कंपनीच्या संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करून घेता येतात. अर्जदाराचा अर्ज आपले नाव, पत्ता, वीजपुरवठय़ाचे ठिकाण, आवश्यक विद्युतभार, अर्जाचे कारण इत्यादी गोष्टींनी परिपूर्ण असावा. असा अर्ज मिळाल्यापासून वीज कंपनीने त्या जागेची पाहणी शहरी भागात सात कामांच्या दिवसात करणे बंधनकारक आहे. अन्यथा विलंबाच्या प्रति आठवडय़ास रु. १००/- इतकी भरपाई मागता येते.

सध्या अस्तित्वात असलेल्या जोडणीतून जर वीजपुरवठा द्यावयाचा झाल्यास त्याच्या खर्चाचा अंदाज शहरी भागात १५ दिवसांत देणे आवश्यक आहे. जर नवीन वितरण वाहिनी टाकणे गरजेचे असेल तर खर्चाचा अंदाज ३० दिवसांत देणे जरुरी असते. अन्यथा वरील दोन्ही गोष्टींसाठी प्रति आठवडा रु. १००/- इतका विलंब आकार ग्राहकाला कंपनीकडून मागता येतो. अशी अंदाजित रक्कम ग्राहकाने भरल्यानंतर अस्तित्वातील जोडणी एक महिन्यात व विस्ताराची आवश्यकता असेल तर तीन महिन्यात जोडणी मिळावी अन्यथा प्रति आठवडा रु. १००/- विलंब आकार आहे. विद्युत पुरवठा देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य कंपनीने आणणे बंधनकारक आहे. त्यासाठी कोणतेही जास्त शुल्क घेणे बेकायदा आहे. तसे आढळल्यास ग्राहक ग्राहक निवारण मंचाकडे रीतसर तक्रार करू शकतो.

वीज मीटर : वीज ग्राहक आणि वीज कंपनी यामधील दुवा म्हणजे मीटर. यामुळे मीटर योग्य ठिकाणी असणे, योग्य स्थितीत असणे आणि विजेची अचूक मोजणी होणे हे ग्राहक आणि कंपनीलाही हितकारक असते. ग्राहकाला दिलेला मीटर शक्यतो वीज कंपनीचा असावा. त्यासाठी ग्राहकाला ठरावीक शुल्क आकारले जाते. जर ग्राहकाला स्वत: खरेदी केलेला मीटर पाहिजे असेल तर ग्राहकाने वीज कंपन्यांनी अधिकृत केलेला असाच मीटर विकत घेणे हितकारक आहे. मीटर बॉक्स बसविणे ही मात्र कंपनीचीच जबाबदारी असते. मात्र मीटरची काळजी घेणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे.

मीटरचे वाचन ठरावीक कालांतराने करणे कंपनीवर बंधनकारक असते. शहरी भागात किमान दोन महिन्यांतून एकदा मीटर नोंद झालीच पाहिजे. असे जर घडले नाही तर ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून पहिल्या महिन्यात रु. १००/- व त्यानंतरच्या महिन्यासाठी रु. २००/- इतका विलंब आकार मागता येतो. अशी रक्कम पुढील वीजबिलामार्फत देणे कंपनीला बंधनकारक आहे. जर कोणत्याही कारणामुळे मीटर वाचकाला मीटरची नोंद घेता आली नाही तर वीज कंपनी सरासरी बिल पाठवू शकते आणि जर लागोपाठच्या दोन प्रयत्नांनंतरही मीटर नोंद घेता आली नाही, तर वीज कंपनीला पुरवठा तोडण्याचे अधिकार आहेत. परंतु अशी वीजतोडणी करण्याआधी तशी नोटीस ग्राहकाला कामाचे सात दिवस आधी मिळणे आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी जर मीटर रीडिंग घेणे सुलभ नसेल तर मीटरची जागा कंपनीकडे अर्ज करून बदलून घेता येते.

ग्राहकाला जर विजेचे बिल त्याच्या सरासरी बिलापेक्षा जास्त आले तर ग्राहक आपल्या मीटरची अचूकता पडताळून पाहू शकतो. अशा वेळी ग्राहकाने कंपनीकडे अर्ज करून आवश्यक ती फी भरणे गरजेचे असते. असा अर्ज प्राप्त झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत मीटर तपासणीचा अहवाल ग्राहकाला देणे कंपनीवर बंधनकारक आहे. मीटर तपासणीच्या वेळी ग्राहकाने स्वत: उपस्थित राहणे हेही गरजेचे असते. अशा मीटरमध्ये जर काही बिघाड असल्याचे आढळले तर मीटर तपासणीची रक्कम कंपनीकडून ग्राहकाला परत मिळावी लागते व त्यानुसार वीजबिलही दुरुस्त करून देणे कंपनीला बंधनकारक आहे.

जर कोणत्याही कारणामुळे मीटर बंद पडला असेल तर कंपनी ग्राहकाला त्यासाठी जबाबदार धरू शकत नाही व सरासरीप्रमाणे फक्त तीन महिन्यांचेच बिल कंपनी आकारू शकते. मीटरमध्ये जाणूनबुजून बिघाड करता येऊ नये म्हणून कंपनी मीटरला सील लावते. असे सील जर तुटले असेल किंवा तोडले गेले आहे असे आढळले तर तो वीजचोरीचा गुन्हा समजला जातो. परंतु जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यास वीजचोरी असे म्हणता येत नाही. जर कोणत्याही कारणाने मीटर जळला तर कंपनीकडे तशी तक्रार नोंदविणे आवश्यक असते. अशी तक्रार प्राप्त झाल्यापासून शहरी भागात २४ तासात मीटर बदलणे व वीजपुरवठा पूर्ववत करणे कंपनीवर बंधनकारक असते. जर मीटर हरवला तर एफआयआर करून त्याची प्रत जोडून कंपनीकडे अर्ज सादर केला तर कंपनी मीटर शुल्क आकारून नवीन मीटर बसविते. अन्यथा विलंब आकार प्रति आठवडा रु. १००/- इतका आहे.

विद्युत पुरवठा परत सुरू करणे : फ्युज गेल्यास शहरी भागात चार तासात विद्युत पुरवठा पूर्ववत करणे बंधनकारक आहे. ४१५ व्होल्ट, ११ केव्ही इत्यादी मोठय़ा तारात बिघाड झाल्यास परत पुरवठा सुरू करण्याची मुदत शहरी भागात साह तास एवढी आहे. जमिनीखालील केबलमध्ये बिघाड झाल्यास पुरवठा सुरळीत करण्याची मुदत २४ तास. हे सर्व वेळेत न घडल्यास विलंब भरपाई रु. ५०/- तास इतकी असते. अशा विलंब आकाराची मागणी करताना ग्राहकाने त्याची अचूक नोंद ठेवणे गरजेचे असते. घरगुती ग्राहकाला मिळणारा विद्युत दाब हा २४० व्हॉल्ट इतकाच असावा त्यात ६ टक्केपेक्षा जास्त फरक येऊ नये. असे आढळल्यासही नुकसानभरपाई मागता येते.

नावातील बदल : मूळ ग्राहकाचे निधन अथवा मालकीचा बदल यासाठी नवीन मालक अथवा वारसदार नावातील बदलासाठी अर्ज करू शकतो. पण अशा जागेवरील वीजबिलाची जर थकबाकी असेल तर कायदेशीर वारसाखेरीज नवीन मालकाला पूर्वीच्या मालकाची जास्तीत जास्त सहा महिन्यांची थकबाकी भरावी लागते. त्यापेक्षा जास्त कंपनी मागू शकत नाही. पण वारसदाराला मात्र त्याला सर्व थकबाकी द्यावी लागते. जी थकबाकी बिलावर दाखविली गेली नसेल ती कंपनी जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत वसूल करू शकते.

अशा त-हेने एखाद्या पीडित ग्राहकाला नुकसानभरपाईची मागणी करावयाची असेल तर विद्युत नियामक आयोगाने सांगितलेल्या निवारण पद्धतीनुसारच तक्रार करावी.

5 COMMENTS

  1. मी वीज जोडणीसाठी 6 ते 7 महिन्यापासून मरावीम च्या कार्यालयात चकरा मारतोय त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र व अर्ज दिलेला आहे, परंतु आजतागायत सर्वे करण्यासाठी कोणीही आलेले नाही तसेच डिपॉझिट किती भरायचे याबाबतही कळविले नाही, उपअभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता ते वायरमनला भेटण्यास सांगतात व उडवाउडवी करून (अपेक्षा ठेऊन)पाठून देतात तरी काय केल्याने मला वीज जोडणी करून मिळेल याबाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती

  2. १० दिवसांपासुन वीजपुरवठा खंडीत झाला आहे,
    तरी या बाबत गांभीर्याने दखल घेतली जावी या करता कोणास अर्ज करावा, आणि भरपाई विषयी माहिती हवी आह्े

  3. 17दिवस झाले वीज बंद आहे .काय करावे .अर्ज कुणाकडे कसा करायचा ते सांगा .

  4. वीजेचा पोल वादळात पडला आहे .यात ग्राहकाचा काय दोष ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version