Thursday, October 15, 2026

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६ रोजी 'म्हाडा'च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून घ्यावे, असे आवाहन म्हाडा प्रशासनाने केले आहे.

लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकांप्रती संवेदनशील बनले असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रत्येक लोकशाही दिन कार्यक्रमापूर्वी उपाध्यक्षांकडून यापूर्वी झालेल्या लोकशाही दिनातील प्रकरणांवर अधिकार्‍यांकडून होत असलेल्या कार्यवाहीचा देखील आढावा घेण्यात येतो. यामुळेच तसेच लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा ठरत आहे.

लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रार अर्ज विहित नमुन्यात असावा. म्हाडा लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस अगोदर २ प्रतींत पाठविणे आवश्यक आहे. सदर नमुना अर्ज म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर नागरिकांसाठी या अंतर्गत लोकशाही दिन या सदरात उपलब्ध आहे. अर्जदाराची तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसतील असे अर्ज म्हाडा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसात पाठवण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास देखील पाठविण्यात येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >