Wednesday, September 2, 2026

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होणार?

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होणार?

आयुक्तांनी नगरविकास खात्याला पाठवले पत्र, न्यायालयानेही याचिका फेटाळली

पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नाही ?

मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) : मुंबई महापालिकेतील पक्षातील उबाठाच्या माजी महापौर तथा प्रभाग क्रमांक १९१च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जात पडताळणी समितीने काही दिवसांपूर्वीच अवैध ठरवले आहे. त्यानंतर त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुुर असतानाच महापालिका आयुक्तांच्यावतीने नगरविकास खात्याला पत्र लिहून विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करून त्यांना सहा वर्षांकरता निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचे कळवले आहे. दरम्यान, विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागितली होती, परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली असून त्यांनी कोकण आयुक्तांकडेही दाद मागितली आहे. त्यामुळे आता येत्या सोमवारी महापालिका सभेत कदाचित पालिका प्रशासनाकडून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत महापौरांकडून घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

माहिम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १९१ मधून मशाल चिन्हावर उबाठाच्या विशाखा राऊत विजयी झाल्या आहेत. सन २०२५- २६ महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागात माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर-गुरव यांच्यासमोर ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर विशाखा राऊत यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या जातप्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी,

निवडणूक लढवताना विशाखा राऊत यांनी, चैताली जितेंद्र राऊळ, अमृता जितेंद्र राऊळ व विराज जगदीश राऊळ यांचे कुणबी जातीचे वैधता प्रमाणपत्रे सोबत जोडली होती. परंतु या जात वैधता प्रमाणपत्र धारकांशी अर्जदाराचे पुराव्यांच्या अभावी रक्तनाते संबंध सिध्द होऊ शकलेले नाहीत, असे कारण चौकशीनंतर जातपडताळणी समितीने दिले. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरले असल्याचे मुंबई महापालिकेला कळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा राऊत यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यात आहे. त्यांनी यापूर्वी १९९७ - ९८ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी त्यावेळी महापौरपद देखील भूषविले होते. त्यानंतर त्या आमदार झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०१७ मध्ये निवडणूक लढवली आणि त्या पुन्हा नगरसेविका झाल्या. तसेच, त्यानंतर त्यांना सभागृहनेतेपदही देण्यात आले.

दरम्यान, पालघर जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. येत्या सोमवारी महापालिका सभा आहे. या सभेत विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा महापौरांकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयुक्तांचे नगरविकास खात्याला पत्र

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभाग अपर मुख्य सचिव -२ यांना, विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याबाबत पत्र पाठवून माहिती दिली आहे. विशाखा राऊत यांना पुढील सहा वर्षे नगरसेवकपदाची निवडणूक लढविता येणार नसल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी महापालिका सभागृहात केली जाण्याची शक्यता आहे. नगरसेवकपद रद्द झाल्यावर विशाखा राऊत यांना, महापालिकेने दिलेले आतापर्यंतचे मानधन, भत्ते परत करावे लागणार आहेत.

मुंबई महापालिका अधिनियम, १८८८, कलम १६ (१सी) (ब) मधील तरतुदीनुसार, कोणतीही व्यक्ती नगरसेवक होण्यास अपात्र ठरल्यास आणि परिणामी, तिची नगरसेवक म्हणून जागा रिक्त झाल्यास (अ) राज्य सरकार, शासकीय राजपत्रात अधिसूचना काढून, अशा व्यक्तीला त्या आदेशाच्या तारखेपासून ६ (सहा) वर्षांच्या कालावधीसाठी नगरसेवक म्हणून निवडून येण्यास किंवा नगरसेवक म्हणून काम करण्यास अपात्र ठरवेल, असा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >