- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश; महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे पाहणी करणार
मुंबई : पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपलेल्या भागांतील नुकसानीचे आता शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे ही पाहणी करणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना याबाबत आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. (Devendra Fadnavis)
राज्यात काही भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे उभी पिके करपली असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर प्राप्त अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
- नरेंद्र पाटील; मराठा समाजाला भरभरून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना तोल सांभाळावा मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन विभागांकडून संयुक्तपणे सर्वेक्षण केले जाणार असल्याने नुकसानीची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया समन्वयाने राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा-कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबतही बावनकुळे यांनी माहिती दिली. मराठवाड्यात मराठा-कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू असून, यापूर्वीही त्यासाठी शिबिरे घेण्यात आली होती. प्रमाणपत्र वितरणासाठी शासनाने यापूर्वीच पुढाकार घेतला असून, जात प्रमाणपत्रेही वितरित करण्यात आली आहेत. विहित नियमावलीनुसार अशी शिबिरे घेणे हे शासनाचे धोरणच असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis)






