Friday, September 11, 2026

Disha Salian Case : आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पांचोलीला अटक करा!

Disha Salian Case : आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पांचोलीला अटक करा!

- दिशा सालियनच्या वडिलांची मागणी; उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘सीबीआय’ने नोंदवला जबाब

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब शुक्रवारी सीबीआयने नोंदवला. या प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांच्यासह अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी सतीश सालियन यांनी सीबीआयकडे केल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. दिशा सालियनची हत्या झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला असून, या प्रकरणाचा आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा संबंध असल्याचाही दावा करण्यात आला आहे. (Disha Salian Case)

दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. त्यानंतरच्या तपासात दिशाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी जाहीर केले. प्रकरण बंद करण्याची प्रक्रिया सुरू असताना दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला. त्यानंतर न्यायालयाच्या अलीकडच्या निर्देशानुसार या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलली. (Disha Salian Case)

सीबीआय कार्यालयात जबाब नोंदवल्यानंतर सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधला. सतीश सालियन यांनी आपल्या तक्रारीत प्रकरणातील दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांच्या नावांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

निलेश ओझा यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशातील संबंधित निरीक्षणांमध्ये दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणे परस्पर संबंधित असल्याचे नमूद आहे. दिशाचे प्रकरण पुढे गेल्यास सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासालाही दिशा मिळू शकते, असा दावा त्यांनी केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये रिया चक्रवर्तीची भूमिकाही तपासण्याची मागणी केल्याचे ओझा यांनी सांगितले. दिशाची हत्या सामूहिक अत्याचारानंतर झाल्याचा दावा करत, त्यामागे असलेल्या आरोपींसह या घटनेचे ‘कव्हर-अप’ करणारे पोलीस अधिकारी आणि खोटे रेकॉर्ड तयार केल्याचा आरोप असलेल्या संबंधितांवरही कारवाई करण्यासाठी आवश्यक ती माहिती, जबाब आणि पुरावे सीबीआयकडे देण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले. मात्र, तपासावर परिणाम होऊ नये म्हणून सर्व माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Disha Salian Case)

सचिन वाझे पुन्हा चर्चेत

दरम्यान, तपासाच्या प्रक्रियेत जबाब नोंदविणे हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे ओझा यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने जबाब नोंदवून त्याच्या आधारे एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी नमूद केले. सीबीआयकडून पुढील प्रक्रिया सुरू असून, एफआयआरबाबतची माहिती सीबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, असा दावाही त्यांनी केला. या वेळी ओझा यांनी तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ‘एक्स्ट्रा-ज्युडिशियल कन्फेशन’चाही उल्लेख केला. हे निवेदन आपल्याकडे उपलब्ध असून, त्यासंदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त साक्षीदार असल्याचा दावा त्यांनी केला. हे आणि अन्य उपलब्ध पुरावे सीबीआयकडे सादर केल्याचेही ओझा यांनी सांगितले. दरम्यान, सीबीआयकडून आता या प्रकरणात पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे सालियन कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांवर तपास यंत्रणेच्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Disha Salian Case)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >