Friday, September 11, 2026

Nagpur Marbat Festival : नागपूरचा १४५ वर्षांचा अनोखा ‘मारबत उत्सव’; जाणून घ्या परंपरा, इतिहास अन् खासियत

Nagpur Marbat Festival : नागपूरचा १४५ वर्षांचा अनोखा ‘मारबत उत्सव’; जाणून घ्या परंपरा, इतिहास अन् खासियत

नागपूर : नागपूर म्हटलं की गणेशोत्सव, ताडोबा आणि रसाळ संत्र्यांसोबतच शहराच्या खास सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग असलेल्या ‘मारबत उत्सवा’ची ही आठवण होते. नागपूरमध्ये दरवर्षी उत्साहात साजरा होणारा हा अनोखा लोकउत्सव महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे वेगळे दर्शन घडवतो. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मोठ्या आकाराच्या मारबती आणि बडग्यांच्या प्रतिमा, ज्या पारंपरिक मिरवणुकीत सहभागी केल्या जातात. (Nagpur Marbat Festival)

मारबत उत्सव म्हणजे काय?

महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ‘तन्हा पोळ्या’च्या दिवशी हा उत्सव साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे मारबत उत्सव. दरवर्षी साजरा होणारा हा मारबत उत्सव सुमारे १४५ वर्षे जुना सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव आहे.

मारबत उत्सवाची सुरुवात कधी झाली?

मारबत उत्सवाची सुरुवात १९व्या शतकात, ब्रिटिशांच्या काळात झाल्याचे मानले जाते. त्यावेळी नागपूरच्या लोकांनी ब्रिटिश राजवटीविरोधात आणि भोसले घराण्यातील बाकाबाईंसारख्या ब्रिटिश समर्थकांविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी ही अनोखी परंपरा सुरू केली. (Nagpur Marbat Festival)

मारबत उत्सव साजरा करण्याचं कारण काय?

मारबत उत्सवामागे वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्याचा विजय हा मुख्य विचार आहे. समाजातील नकारात्मकता दूर जावी आणि सुख-शांती नांदावी, अशी यामागची भावना आहे. विशेष म्हणजे, या उत्सवाला केवळ धार्मिक किंवा पारंपरिक स्वरूप नाही. समाजातील समस्या आणि लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठीही या उत्सवाचा वापर केला जातो. भ्रष्टाचार, अन्याय, महागाई, राजकीय परिस्थिती किंवा इतर सामाजिक प्रश्नांवर मारबतींच्या माध्यमातून भाष्य केले जाते.

ही मिरवणूक सगळ्यात भारी...

नागपूरमध्ये या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. विशेषतः इतवारी परिसर हा मारबत उत्सवाच्या मिरवणुकीसाठी प्रसिद्ध आहे. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शहरासह आसपासच्या भागातूनही मोठ्या संख्येने नागरिक येतात. (Nagpur Marbat Festival)

कशी असते 'मारबत मिरवणूक'?

मारबत उत्सवाच्या दिवशी नागपूरच्या रस्त्यांवर पारंपरिक उत्साह पाहायला मिळतो. विविध आकारांच्या मारबती आणि बडग्यांच्या प्रतिमा तयार करून त्यांची भव्य मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्ये आणि नागरिकांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण शहर उत्सवी वातावरणात रंगून जाते.  (Nagpur Marbat Festival)

१. मारबतींची भव्य निर्मिती

उत्सवासाठी काळी मारबत आणि पिवळी मारबत यांच्या मोठ्या प्रतिमा तयार केल्या जातात. माती, गवत, कापड यांसारख्या साहित्याचा वापर करून या प्रतिमा साकारल्या जातात. याशिवाय प्राणी किंवा विविध सामाजिक विषयांवर आधारित छोट्या प्रतीकात्मक प्रतिमाही तयार केल्या जातात. त्यांना ‘बडगे’ असे म्हटले जाते.

२. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

तयार केलेल्या मारबती आणि बडग्यांची नागपूरच्या प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्यांचे सूर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मिरवणुकीला एक वेगळीच रंगत येते.

३. सामाजिक प्रश्नांना मिळते व्यासपीठ

मारबत मिरवणूक ही केवळ परंपरा जपणारी मिरवणूक नसून, सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्न मांडण्याचे प्रभावी माध्यमही आहे. फलक, घोषवाक्ये आणि प्रतीकात्मक प्रतिमांच्या माध्यमातून नागरिक विविध समस्या आणि समकालीन विषयांवर आपली भूमिका मांडतात.

४. वाईटाचा नाश करण्याचा संदेश

मिरवणुकीनंतर मारबतींशी संबंधित पारंपरिक विधी पार पाडले जातात. समाजातील वाईट प्रवृत्ती, अनिष्ट शक्ती आणि नकारात्मकता दूर व्हावी, वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा, असा या परंपरेमागील प्रतीकात्मक संदेश मानला जातो.

मारबत उत्सवा मागचे वैशिष्ट्य काय?

मारबत उत्सवाची सर्वात खास गोष्ट म्हणजे परंपरा आणि सामाजिक भाष्य यांचा सुंदर संगम. हा केवळ उत्सव किंवा मिरवणूक नसून, नागपूरच्या लोकजीवनाशी जोडलेली एक वेगळी सांस्कृतिक ओळख आहे.

या उत्सवातून लोक एकत्र येतात, आपली परंपरा जपतात आणि त्याचबरोबर समाजातील प्रश्नांकडेही लक्ष वेधतात. त्यामुळे नागपूरचा मारबत उत्सव हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीतील एक आगळावेगळा उत्सव मानला जातो. (Nagpur Marbat Festival)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >