Friday, September 11, 2026

Mumbai Crime News : परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न दाखवले अन्...; 3 जणांच्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Crime News : परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न दाखवले अन्...; 3 जणांच्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोकरी शोधणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबईतील पायधोनी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तीन वेगवेगळ्या राज्यांतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime)

 मस्जिद बंदरमधून चालायचा व्यवसाय पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी मस्जिद बंदर पश्चिम परिसरातील ‘अल शिफा ट्रॅव्हल्स’ या कार्यालयातून नागरिकांशी संपर्क साधत होते आणि त्यांना परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे आणि पैसे घेत होते.

 पासपोर्ट आणि पैसे घेतले आरोपी प्रत्येक नोकरीच्या इच्छुक व्यक्तीकडून मूळ पासपोर्ट, बायोडाटा आणि 15,000 रुपये घेत होते, मात्र पैसे आणि कागदपत्रे घेतल्यानंतर संबंधितांना नोकरी देण्यात आली नाही आणि काही दिवसांनी आरोपींनी आपले कार्यालय बंद करून मोबाईल फोनही बंद केले.

तक्रारीनंतर पोलिसांचा तपास सुरू या प्रकरणातील एका पीडिताने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पायधोनी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला.गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींच्या हालचालींचा माग काढला आणि वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.

 3 आरोपी वेगवेगळ्या राज्यांतून अटकेत तबरेज आलम अन्सारी याला हरियाणातून, मोहम्मद शमीम अन्सारी याला बिहारमधील मधुबनी येथून, तर व्यंकटेश गंगाव्य चकल याला मुंबईतील टेमकर रोड परिसरातील जेजे डॉर्मेटरीमधून पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी 50 भारतीय पासपोर्ट, 6 संगणक आणि लॅपटॉप, 9 मोबाईल हँडसेट, 13 बँक चेकबुक आणि डेबिट कार्ड, तसेच आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्रांसह इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे.

बनावट नियुक्तीपत्रेही सापडली पोलिसांच्या कारवाईदरम्यान आरोपींकडून 2 बनावट नियुक्तीपत्रेही जप्त करण्यात आली असून, या कागदपत्रांचा वापर करून नागरिकांचा विश्वास संपादन केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 50 पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक? आतापर्यंतच्या तपासात किमान 10 नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे; मात्र जप्त करण्यात आलेल्या पासपोर्टची संख्या पाहता या टोळीने 50 पेक्षा जास्त नागरिकांना अशाच प्रकारे गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या टोळीच्या माध्यमातून अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पायधोनी पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले असून, यामुळे या प्रकरणातील फसवणुकीचा नेमका आकडा आणि टोळीचे आणखी व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >