अंधेरी : अंधेरीमध्ये आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर बनावट धाड टाकत तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली असून, या बनावट कारवाईत आयकर विभागातील काही खरे अधिकारीही सहभागी असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आयकर निरीक्षक आणि कर सहायकासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार राजकुमार कन्डासमी (49) यांच्याकडे संतोष खोपटकर (37) हा पूर्वी चालक म्हणून काम करत होता. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर खोपटकरला नोकरीवरून काढण्यात आले होते. तसेच त्याचा सहा महिन्यांचा पगारही थकीत होता. याच कारणातून खोपटकरने कन्डासमी यांच्याबाबत त्याच्याकडे असलेल्या माहितीचा वापर करून साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
मुंबई : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोकरी शोधणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबईतील पायधोनी पोलिसांनी ...
आरोपींनी बनावट ओळखपत्रांचा वापर करून आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवत कन्डासमी यांच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर कन्डासमी आणि त्यांच्या पत्नीला धमकावून त्यांचे अपहरण करण्यात आले. कार्यालयातील 10 कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले आणि त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यासही मज्जाव करण्यात आला.
आयकर विभागाची कारवाई करण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी कन्डासमी यांच्याकडे तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी खोपटकरसह विनय मोरे, प्रेम सबनानी, प्रज्ञा माईन, रेश्मा वारंग आणि सबीना शेख यांना अटक केली होती.
चौकशीदरम्यान आयकर निरीक्षक सुरेश महावीरप्रसाद मिश्रा (57), कर सहायक सुनील मनोहर गोरे (59), जितु ऊर्फ जितेंद्र नामदेव मोरे (52) आणि अशोक विठोबा शिंदे (57) यांचा सहभाग समोर आला. त्यानंतर या चौघांनाही अटक करण्यात आली.
बनावट धाडीत आयकर विभागातील अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय होती, या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि अटक आरोपींचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा अंधेरी पोलीस तपास करत आहेत.






