Monday, September 28, 2026

UP Rain : उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस; 56 जणांचा बळी; 1,000 हून अधिक घरे उद्ध्वस्त

UP Rain : उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस; 56 जणांचा बळी; 1,000 हून अधिक घरे उद्ध्वस्त

उत्तर प्रदेश :  उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. 25 सप्टेंबरच्या सकाळपासून 27 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत राज्यात 48 तासांत सरासरी 97.6 मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत पाऊस आणि वादळाशी संबंधित विविध घटनांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे राज्यातील 1,020 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 107 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. उत्तर प्रदेशातील 75 पैकी 56 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सध्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी तराई भागात अजूनही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. फरुखाबाद, कन्नौज, शाहजहानपूर, हमीरपूर आणि महोबा या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.

दरम्यान, ओडिशातही पूरस्थितीचा धोका वाढला आहे. महानदी नदी प्रणालीतून मुंडाली येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळपर्यंत हा विसर्ग सुमारे 8 लाख क्युसेकपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कटक, खुर्दा, पुरी आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांतील सखल भागांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

महानदीसह बैतरणी, सालांडी आणि सुवर्णरेखा नद्यांची पाणीपातळीही वाढली आहे. त्यामुळे उत्तर ओडिशातील काही भागात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे.

उत्तराखंडमध्येही पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. ऋषिकेशमधील मुनी-की-रेती परिसरातील गंगा नदीतील रिव्हर राफ्टिंग पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. हवामान सुधारल्यानंतर आणि नदीची पाणीपातळी सुरक्षित झाल्यानंतरच राफ्टिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >