Thursday, October 1, 2026

Devendra Fadnavis Captain Smit : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि खरा 'हिरो'! कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Devendra Fadnavis Captain Smit : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि खरा 'हिरो'! कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई : स्वतःवर प्राणघातक हल्ला झाला असतानाही अत्यंत बिकट आणि जीवघेणी परिस्थितीत विलक्षण प्रसंगावधान आणि अफाट धैर्य दाखवत फ्लाय दुबई (Flydubai) विमानाचे पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी तब्बल 180 विमान प्रवाशांचे प्राण सुरक्षितपणे वाचवले आहेत. या असाधारण साहसाबद्दल आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या त्यांच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅप्टन स्मित यांचा 'खरा हिरो' असा गौरव करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. मुंबईचा हा सुपुत्र तमाम भारतीयांसाठी सार्थ अभिमानाचा विषय ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.(Devendra Fadnavis Captain Smit)

प्रसंगावधान आणि अफाट धैर्याचे उदाहरण

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचा प्रवास सुरू असताना अत्यंत गंभीर प्रसंग ओढवला आणि स्वतः कॅप्टन स्मित माछर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. अशा अत्यंत बिकट व जीवघेण्या परिस्थितीतही त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अत्यंत संयमाने आणि तांत्रिक कौशल्याने परिस्थिती हाताळली. गंभीर दुखापत झालेली असतानाही त्यांनी दाखवलेले धाडस आणि घेतलेले तात्काळ निर्णय अनुकरणीय ठरले. त्यांच्या या अचूक निर्णयामुळे विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचू शकले. या संकटाच्या काळात विमानातील प्रवाशांनीही एका टीमप्रमाणे तत्परता दाखवत पूर्ण सहकार्य केले.

मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक व सदिच्छा

कॅप्टन स्मित माछर यांच्या या शौर्याची आणि साहसाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे:

"मुंबईचा सुपुत्र आणि खरा 'हिरो' कॅप्टन स्मित यांच्याबद्दल मला मनापासून अभिमान वाटतो. स्मित यांनी अत्यंत असाधारण आणि विलक्षण पद्धतीने शेकडो लोकांचे प्राण वाचवले! गंभीर दुखापतीतही त्यांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि धैर्य खरोखरच अनुकरणीय आहे. कठीण प्रसंगात प्रवाशांनीही एका टीमप्रमाणे तत्परतेने काम केलं, त्यांनाही सलाम. स्मित लवकर बरे व्हावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी मी कामना करतो! आपण युवकांसाठी प्रेरणास्थान आहात. महाराष्ट्र आणि देशाला आपला अभिमान वाटतो."

कॅप्टन स्मित माछर यांच्या या धाडसी व कर्तृत्ववान कामगिरीबद्दल सध्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.(Plane Incident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >