Thursday, October 1, 2026

विधानपरिषदेसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीत ३:१:१ चा फॉर्म्युला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक

विधानपरिषदेसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीत ३:१:१ चा फॉर्म्युला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच कायम

मुंबई : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या जागावाटपावर महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये प्राथमिक सहमती झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत पाच जागांसाठी ३:१:१ असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. त्यानुसार भाजप तीन जागांवर, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवणार आहेत. मात्र पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप आणि शिवसेनेचा दावा कायम असल्याने एका जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

महायुतीतील घटक पक्षांकडून अधिक जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र जागावाटपाच्या चर्चेत भाजपला नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर या दोन जागांसह पुणे शिक्षक मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला, तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून दावा करण्यात येत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे भाजपनेही या मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा एकमेव तिढा या जागेवर राहिला असून, येत्या काही दिवसांत त्यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी निवडणूक रणनीतीवरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. उमेदवारांची निवड, मतदारसंघनिहाय संघटनात्मक तयारी आणि घटक पक्षांमधील समन्वय याबाबत पुढील काळात निर्णय घेतला जाणार आहे.

पाच मतदारसंघांतील चित्र

पुणे पदवीधर

२०२० विजेते : अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रमुख इच्छुक : शरद लाड (भाजप), भैया माने (राष्ट्रवादी काँग्रेस)

२०२० मध्ये अरुण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता. यंदा भाजपकडून शरद लाड यांच्या नावाची चर्चा आहे, तर राष्ट्रवादीकडून भैया माने इच्छुक आहेत.

पुणे शिक्षक

२०२० विजेते : जयंत आसगावकर (काँग्रेस)

प्रमुख इच्छुक : मंगेश चिवटे (शिवसेना), सचिन सानप (शिवसेना), कौस्तुभ गावडे (भाजप), नंदकुमार सागर; शिवाजी खांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट)

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये महायुतीची उमेदवारी मिळविण्यावरून रस्सीखेच आहे. मंगेश चिवटे यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा असून भाजपकडून सचिन सानप यांचे नाव पुढे आले आहे.

नागपूर पदवीधर

२०२० विजेते : अभिजीत वंजारी (काँग्रेस)

प्रमुख इच्छुक : सुधाकर कोहळे, अनिल सोले (भाजप); अभिजीत वंजारी (काँग्रेस); अतुल देशमुख (शिक्षक भारती)

२०२० मध्ये अभिजीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला होता. यंदा भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे आणि अनिल सोले यांच्या नावांची चर्चा आहे. वंजारी पुन्हा निवडणुकीच्या तयारीत असून शिक्षक भारतीने अतुल देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर

२०२० विजेते : सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रमुख इच्छुक : सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), एम. के. देशमुख, संजय केणेकर, किरण पाटील (भाजप)

सतीश चव्हाण यांनी २०२० मध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. यंदाही त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून एम. के. देशमुख, संजय केणेकर आणि किरण पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.

अमरावती शिक्षक

२०२० विजेते : किरण सरनाईक (अपक्ष)

प्रमुख इच्छुक : किरण सरनाईक (शिवसेना), श्रीकांत देशपांडे (शिवसेना); भाजपकडून विविध इच्छुक

२०२० मध्ये किरण सरनाईक यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार श्रीकांत देशपांडे हेही आता शिवसेनेत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >