Friday, October 2, 2026

BMC Water Supply : मुंबईकरांना येणारा उन्हाळा कठीण

BMC Water Supply : मुंबईकरांना येणारा उन्हाळा कठीण

कपात मागे घेतली तर मुंबईला २० मे २०२७ पर्यंतच पाणी पुरवठा

ऑगस्टपर्यंतच्या नियोजनासाठी कपातीसह गळती चोरी रोखण्यास महापालिकेचे प्राधान्य

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत जेवढा असतो त्यावर पाण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे १ ऑक्टोबर रोजी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये ९६.३७ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा दोन ते तीन टक्क्यांनी कमी आहे. मात्र भविष्यातील अल निनोचा प्रभावामुळे ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे शासनाच्या सूचना असल्यामुळे महापालिकेला कपात कायम ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कपात वगळता तलावातील जलसाठा हा २० मे २०२७ पर्यंत पुरेल एवढा असून कपात कायम ठेवल्यास जून २०२७ पर्यंत पुरेल. त्यामुळे येणारा उन्हाळा मुंबईकरांसाठी सोपा नाही. (BMC Water Supply)

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये १ ऑक्टोबर रोजी वर्षभराच्या आवश्यक साठ्याच्या तुलनेत म्हणजे १४ लाख ४७ हजार ६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत १३ लाख ९४ हजार ८०० दशलक्ष लिटर एवढा म्हणजे ९६.३७ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईतील एकूण तलावांतील पाणी साठा आणि आजची तसेच भविष्यातील स्थितीसंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सादरीकरण केले. यामध्ये सन २०२५मध्ये ९८.३८ टक्के आणि सन २०२४मध्ये ९९.२ टक्के एवढा जलसाठा होता. त्यामुळे सर्वांत कमी पाऊस पडलेल्या सन २००९ मध्ये पाण्याचा एकूण साठा हा ७४ टक्के होता तर सन २०१५ मध्ये जलसाठा ७९ टक्के एवढा होता.

सध्या दहा टक्के कपात असली तरी काही भागांमध्ये या कपातीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता त्यांनी न नाकारता ज्या वेळी ४१०० किंवा ४२०० एवढा पाणी पुरवठा केल्यास ते पूर्ण क्षमतेने त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकेल. परंतु सध्या दहा टक्के कपात लागू असल्याने पुढे ती कायम ठेवल्यास आठवड्यातील दोन दिवस पूर्ण क्षमतेने पाण्याचा पुरवठा केला जाईल. जेणेकरून काही प्रमाणत पाणी समस्या कमी केली जाईल. शेवटच्या टोकाला पाणी मिळेल अशाप्रकारे परिमंडळ निहाय पाणी वितरणाचे वेगळ्याप्रकारे नियोजन केले जाईल,असेही बांगर यांनी सांगितले.

मोठ्याप्रमाणात शेवटच्या टोकाला पाणी मिळत नसल्याने बुस्टर पंप लावले जात आहे. त्यामुळे या बुस्टर पंपविरोधात कारवाई केली जात असली तरी प्रभावशील कारवाई होत नाही. त्यामुळे याबाबत धोरणात्मक निर्णय घेवून बुस्टर पंप जप्त करताना त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल अशाप्रकारे विचार केला जात आहे,असे बांगर यांनी सांगितले.

टँकर माफियांना लगाम घालणार, लवकरच धोरण

मुंबईत कपातीबाबत कोणताही अद्यापही निर्णय न घेतल्याने आणि यामुळे नागरिकांमध्ये पाण्यासाठी टँकरवाल्यांकडून लुट होवू नये याशिवाय टँकरवाल्यांची लबाडी पकडली जावी यासाठी लवकरच टँकर पॉलीसी आणली जाणार आहे. सध्या एका चलनवर अनेक टँकर भरले जात आहेत. त्यामुळे ज्याप्रकार वाळू माफियांना लगाम घातला गेला आहे त्याचप्रकारे टँकरवाल्यांसाठी तशाप्रकारचा पध्दतीचा वापर केला जाईल. याशिवाय टँकरवाल्यांना ओटीपीशिवाय पाणी भरता येणार नाही अशा पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबईला २० मे २०२७पर्यंत एवढा जलसाठा असून भविष्यातील पाण्याची गरज ओळखून महापालिका प्रशासनाने विहिरी, कुपनलिका, वर्षा जलंसचयन आदींसाठी योग्य उपाययोजना हाती घ्यावी. अशाप्रकारे पाण्याचे अधिक स्त्रोत निर्माण करणे आवश्यक असून जास्तीत जास्त आपण २७ मे पर्यंत मुंबईला पुढे रेटू शकतो. त्यामुळे याचा वेळेवर आढावा घेतला जावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.

मुंबईची काय परिस्थिती असेल

कपात न लावता आणि राखीव साठ्याशिवाय पुरवठा : २० मे २०२७ पर्यंत

अप्पर वैतरणा आणि भातसामधील राखीव साठ्यासह : २१ जून २०२७ पर्यंत

१ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात आणि राखीव साठ्याशिवाय : १५ जून २०२७पर्यंत

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >