Wednesday, October 7, 2026

PM Modi: जनसेवेची 25 वर्षे...

पंतप्रधान मोदींच्या 25 वर्षांच्या सरकारप्रमुख म्हणून प्रवासानिमित्त विविध नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली श्री विनायक मंदिरात पूजा अर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख म्हणून कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. 7 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांच्या सरकारप्रमुख म्हणून सेवेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळाने 6 ऑक्टोबर रोजी ठराव मंजूर करून पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. ( Narendra Modi 25 Years)

या विशेष प्रसंगी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या प्रवासावर आधारित एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, 'सेवा ज्योती' कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचे आभासी संबोधनही होणार आहे. हरियाणातील गुरुग्राम येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासह भाजपचे अनेक नेते हे संबोधन ऐकणार असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील सरोजिनी नगरमधील श्री विनायक मंदिरात पूजा आणि अर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सरकारप्रमुख म्हणून प्रवासानिमित्त विविध नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही मोदींचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पंतप्रधानांच्या दीर्घ सार्वजनिक सेवेचा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या.

2001 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सलगपणे सरकारप्रमुख म्हणून काम केले आहे. गुजरातनंतर 2014 मध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 मध्येही ते पंतप्रधान झाले. त्यामुळे 25 वर्षांचा हा टप्पा त्यांच्या सार्वजनिक आणि राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >