Private Bus Accident: उज्जैन महाकालला जाणाऱ्या खाजगी बस अपघातात महाराष्ट्रातील ३ महिला भाविकांचा मृत्यू
May 11, 2025 03:08 PM
सातारा: उज्जैन येथे देवदर्शनास चाललेल्या खासगी प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Private Bus Accident) झाला. या अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी, दि. ११ रोजी फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर पहाटे २.३० च्या दरम्यान झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमा इम्तियाज सय्यद (२४), रजनी संजय दुर्गुळे (४८) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत, तर अन्य आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इचलकरंजी येथील खासगी प्रवासी बस (एमएच ०४ सीपी २४५२) ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी(दि.१०) मध्यरात्री जात होती. बस बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक (एमएच ४२ बीएफ ७७८४) या दोघांमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला.
या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोणंद पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.