Monday, August 31, 2026

"उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत"; परिणय फुकेंचा घणाघात

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदावरून केलेल्या विधानांचा भाजपा आमदार परिणय फुके यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आमदार फुके यांनी आज माध्यमांशी बोलताना "उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी नाही, तर नागपुरात केवळ सहलीसाठी आले आहेत," असा खोचक टोला लगावत फुके यांनी ठाकरे गटाच्या आरोपांची हवाच काढून घेतली.

"अडीच वर्षांत अधिवेशन घेतले नाही, आता नियम शिकवताय?"

उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यावर टीका करताना परिणय फुके म्हणाले, "मी उद्धव साहेबांचे नागपुरात स्वागत करतो, पण ते इथे विधिमंडळाचे कामकाज करण्यासाठी आले नसून सहलीसाठी आले आहेत." फुके यांनी आठवण करून दिली की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या काळात त्यांनी नागपुरात एकही अधिवेशन घेतले नाही. ज्यांनी विदर्भात अधिवेशनच होऊ दिले नाही, ते आता नियमांच्या गोष्टी करत आहेत, हे हास्यास्पद असल्याचे फुकेंनी म्हटले.

विरोधी पक्षनेतेपदासाठी १०% आमदारांचा नियम

विरोधी पक्षनेता कोण असावा, हे सरकारने ठरवू नये या ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना फुके यांनी तांत्रिक मुद्दा मांडला. ते म्हणाले, "विरोधी पक्षनेतेपदासाठी संबंधित पक्षाकडे सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के आमदार असणे आवश्यक असते. म्हणजेच किमान २९ आमदार निवडून आलेले असावे लागतात." सध्या ठाकरे गटाकडे हे संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकले नाही. त्यांची हीच 'खदखद' आता बाहेर येत असल्याचे फुके यांनी स्पष्ट केले.

"उपमुख्यमंत्री किती असावेत हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार"

दोन उपमुख्यमंत्री असणे घटनाबाह्य असल्याच्या आरोपांवरूनही फुकेंनी ठाकरेंना आरसा दाखवला. "किती उपमुख्यमंत्री ठेवायचे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार असतो. उद्धव ठाकरेंना विसर पडला असेल की अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते," असे सांगत फुके यांनी महायुतीचे सरकार आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे काम उत्तम रितीने करत असल्याचे सांगितले.

"बॅगा आणि हेलिकॉप्टरचे आरोप म्हणजे पराभवाची भीती"

विरोधकांकडून "हेलिकॉप्टरमधून पैसे आणले जात आहेत" आणि "बॅगा तपासल्या जाव्या" असे आरोप केले जात आहेत. यावर बोलताना फुके म्हणाले की, हे केवळ आगामी पराभवाच्या भीतीतून शोधलेले नवीन फंडे आहेत. "विधानसभेत पराभव झाल्यानंतर त्यांनी मतदार याद्यांवर बोट ठेवले होते. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणारा पराभव त्यांना दिसू लागल्याने त्यांनी आतापासूनच 'हेलिकॉप्टर आणि बॅगा' अशी नवीन कारणे शोधायला सुरुवात केली आहे. ही त्यांची 'पराजित मानसिकता' आहे," अशा शब्दांत परिणय फुके यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >