Monday, August 31, 2026

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. मृत तरुणीचे नाव जान्हवी पाठक (वय २३) असून ती मूळची बिहारची होती. ती पुण्यातील खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होती. मागील सुमारे दोन महिन्यांपासून ती खराडीतील रिव्हर डेल सोसायटीत राहत होती. (Pune Crime News)

प्रियकर नोएडाहून भेटण्यासाठी पुण्यात आला

जान्हवी आणि तिचा प्रियकर अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय २३) हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघांचे शालेय शिक्षणही एकत्र झाले होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते. अमृतकुमार हा नोएडातील एका आयटी कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जान्हवीला भेटण्यासाठी तो दोन दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. गुरुवारी रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत जाऊन दोघांमध्ये मारामारी झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, वाद नेमक्या कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Pune Crime News)

दुसऱ्या दिवशी तरुणीने टोकाचे पाऊल उचलले

वादानंतर शुक्रवारी सकाळी अमृतकुमार खोलीतून खाली आला. त्यानंतर जान्हवीने आपल्या राहत्या खोलीत आयुष्य संपवल्याचं समोर आलं. ही घटना शुक्रवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर जान्हवीच्या काकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून खराडी पोलिसांनी अमृतकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्यावर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास केला जात आहे. (Pune Crime News)

वादामागचं नेमकं कारण काय?

जान्हवी आणि अमृतकुमार यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि या वादाचा तिच्या टोकाच्या निर्णयाशी नेमका काय संबंध आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून आरोपीची चौकशी तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. या तपासातूनच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे खराडी परिसरात आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >