Monday, August 31, 2026

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे. लेकींना शिकवायचं स्वप्न असलेल्या एका जिद्दी माउलीने जे करून दाखवलं, त्याने मोठमोठ्या धावपटूंना सुद्धा मागे टाकलं. ही गोष्ट आहे अंबाजोगाईच्या ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांची. स्लीपर हातात धरून अनवाणी पायाने धावत मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावत ३ हजार रुपयांचे बक्षीस पटकावणाऱ्या रमाबाई यांच्या संघर्षाची चर्चा आता सुरु झाली आहे.

स्लीपर हातात धरली अन्...

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक दरम्यान 'अमृत दौड' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच गर्दीत सर्वात मागच्या रांगेत रोजच्या सारख्या साध्या साडीत रमाबाई उभ्या होत्या. लोकांना वाटले त्या केवळ गंमत म्हणून आल्या असाव्यात. मात्र ध्वज फडकला, शिट्टी वाजली आणि त्या धावू लागल्या. सुरुवातीला तरुण-तरुणी वेगाने पुढे निघून गेले. काही अंतर पार केल्यानंतर पायातील स्लीपर निसटू लागल्याने रमाबाईंनी ती हातात घेतली आणि अनवाणी पायाने धावायला सुरुवात केली.पावसामुळे रस्ता गार पडला होता, रस्त्यातले खड्डे टोचत होते मात्र त्यांनी हार मानली नाही. स्लीपर हातात धरून अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक पटकावत ३ हजार रुपयांचे बक्षीस त्यांनी पटकावले.

रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

स्पर्धा जिंकल्यानंतर रमाबाईंना अश्रू अनावर झाले. आपल्या मेहनतीचं फळ मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. दररोज पोरांच्या संसारासाठी धावत असले आज मी स्वत:साठी धावले असं रमाबाई म्हणाल्या. मुळ हिंगोलीच्या असलेल्या रमाबाई आपल्या नवऱ्याच्या निधनानंतर अंबाजोगाईमध्ये आल्या अन् तिथं मुलांना शाळेत घातलं. मुलांना शिकवून आता त्यांना मोठं करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशातच मॅरेथॉन जिंकून त्यांना 3 हजाराचं बक्षीस देखील मिळालं आहे. रोजच्या धावपळीत जगणाऱ्या रमाबाईंची ही मॅरेथॉन सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >