भविष्यातील मुंबईसाठी ४८ हजार कोटींचा 'पाया'!

'एमएमआरडीए'चा अर्थसंकल्प सादर; मेट्रो, भुयारी मार्ग आणि 'मुंबई ३.०'वर भर, ८७ टक्के तरतूद पायाभूत प्रकल्पांसाठी


मुंबई : गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने तुटीचा सामना करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अखेर आर्थिक स्थैर्याकडे झेप घेतली आहे. सन २०१७–१८ नंतर प्रथमच प्राधिकरणाने सोमवारी सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी ४८ हजार ७२.५७ कोटी रुपयांचा 'शिल्लकी' अर्थसंकल्प सादर केला. १७ लाख रुपयांच्या या अधिशेष (सरप्लस) अर्थसंकल्पातून मुंबई आणि महानगर प्रदेशातील (एमएमआर) पायाभूत सुविधांना मोठी गती मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.


विशेष म्हणजे, २०२४-२५ मध्ये तब्बल ७ हजार ४६८ कोटींची तूट सोसणाऱ्या प्राधिकरणाने अवघ्या दोन वर्षांत महसूल वाढ आणि वित्तीय शिस्तीच्या जोरावर हा टप्पा गाठला आहे. या अर्थसंकल्पात ८७.४२ टक्के म्हणजेच ४२ हजार २६.१४ कोटी रुपयांची भरघोस तरतूद थेट विकास प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे.


मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी 'मुंबई ३.०' अंतर्गत नवी शहरे वसवण्यावर प्राधिकरणाने भर दिला आहे. यामध्ये 'ग्रोथ हब' संकल्पनेतून कर्नाळा-साई-चिरनेर या नव्या वसाहतीसाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, संपूर्ण प्रदेशातील मेट्रो जाळ्यासाठी १३ हजार ८३८.८८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली) आणि मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर-कांजुरमार्ग) या मार्गिकांना सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.

भुयारी मार्ग आणि 'मल्टी-रिंग रोड'


वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएने भुयारी मार्गांवर लक्ष केंद्रित केले आहे. ठाणे ते बोरिवली या महत्त्वाकांक्षी चार पदरी भुयारी मार्गासाठी ३,०२९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अटल सेतू ते पुणे एक्स्प्रेस-वे जोडणी, कोस्टल रोड आणि विविध खाडी पुलांसाठी १२,८१६ कोटींची तरतूद करून 'मल्टी-रिंग रोड'चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आहे.


महत्त्वाच्या तरतुदी (कोटी रुपयांत):


- मेट्रो मार्गिका : १३,८३८.८८
- रस्ते व उड्डाणपूल : १२,८१६.५३
- भुयारी मार्ग प्रकल्प : ५,५४३.५१
- मुंबई ३.० (विकास केंद्र) : ४,६००
- डॉ. आंबेडकर स्मारक (इंदू मिल) : ४००
- बाळासाहेब ठाकरे स्मारक : १७१.५०

प्रतिक्रिया


१) "हा अधिशेष अर्थसंकल्प जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास आणि आमची दीर्घकालीन विकासदृष्टी दर्शवतो. यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम शहरी प्रदेश म्हणून उभा राहील."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


२) "८७ टक्के निधी थेट प्रकल्पांसाठी देणे, हे जबाबदार प्रशासनाचे लक्षण आहे. मुंबई ३.० च्या माध्यमातून आम्ही विकासाचे नवे मापदंड उभे करत आहोत."
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व अध्यक्ष, एमएमआरडीए


३) प्राधिकरणाने या अर्थसंकल्पात जमीन विक्रीतून ११ हजार १७७ कोटी आणि कर्जउभारणीतून २३ हजार ७११ कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वाढत्या महसुलामुळे कर्जाचा बोजा संतुलित ठेवण्यात प्राधिकरणाला यश आले असून, यामुळे एमएमआरडीएची जागतिक विश्वासार्हता वाढली आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त


अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये


१. भुयारी मार्गांचे जाळे
* ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह: १,२५० कोटी
* ठाणे ते बोरीवली (४ पदरी मार्ग): ३,०२९ कोटी
* मुंबई इंटिग्रेटेड टनेल : १,१८९ कोटी
* गायमुख ते फाउंटन हॉटेल: ७५ कोटी
* एकूण तरतूद: ५,५४३ कोटी


२. 'मल्टी-रिंग रोड' आणि कोस्टल कनेक्टिव्हिटी


* अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडणी: ६०३ कोटी
* विस्तारित मुंबई नागरी प्रकल्प (MUTP): २,३६२ कोटी
* मुंबई-वाढवण द्रुतगती कॉरिडॉर: २,००० कोटी
* ठाणे कोस्टल रोड (बाळकुम-गायमुख): १,०२५ कोटी
* पूर्व मुक्त मार्ग विस्तार (घाटकोपर ते ठाणे): १,१०६ कोटी
* वरळी-शिवडी उन्नत मार्ग: ९३६ कोटी
* एकूण तरतूद: १२,८१६ कोटी


३. 'मुंबई ३.०' : नव्या ग्रोथ हबचा उदय


* केएससी (कर्नाळा-साई-चिरनेर) नवी वसाहत: ४,००० कोटी
* रायगड पेण विकास केंद्र: ५०० कोटी
* खारबाव बिझनेस पार्क: १०० कोटी
* एकूण तरतूद: ४,६०० कोटी


४. मेट्रोचा विस्तार (एकात्मिक नेटवर्क)


* मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली): ३,६३० कोटी
* मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर-कांजूरमार्ग): २,४०७ कोटी
* मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण): १,३०९ कोटी
* मेट्रो २-ब (डी.एन. नगर ते मंडाळे): १,२२४ कोटी
* मेट्रो ९ आणि ७-अ (दहिसर-मिरा भाईंदर): १,१५१ कोटी
* मेट्रो १२ (कल्याण-तळोजा): १,०५४ कोटी
* एकूण तरतूद (सर्व मार्गिका): १३,८३८ कोटी


५. जल सुरक्षा आणि गृहनिर्माण


* पोशीर धरण व इतर प्रकल्प: ४६६ कोटी
* सूर्या प्रादेशिक जलपुरवठा: २६७ कोटी
* देहरजी मध्यम प्रकल्प: २४७ कोटी
* रमाबाई आंबेडकर नगर (SRA): ५५१ कोटी
* एकूण तरतूद: १,७११ कोटी


६. स्मारके आणि पर्यावरण


* डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य स्मारक (इंदू मिल): ४०० कोटी
* बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक (दादर): १७१ कोटी
* हरित एमएमआर (हवामान बदल सक्षमता): २५० कोटी


७. पैसा येणार कुठून? (महसूल स्रोत)


एमएमआरडीएने ४८ हजार ७२ कोटींचा निधी उभारण्यासाठी निश्चित केलेले स्रोत


* कर्ज उभारणी : २३,७११ कोटी
* जमीन विक्री : ११,१७७ कोटी
* अर्बन ट्रान्सपोर्ट फंड : ६,३६८ कोटी
* राज्य सरकारचे अर्थसाहाय्य : ३,५२० कोटी
* इतर (व्याज, भूभाडे, टीडीआर) : ३,२९६ कोटी

Comments
Add Comment

महाराष्ट्रात कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका; राज्य शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका मिळवणे आता कॅब बुक करण्याइतके सोपे होणार आहे.

Dr. Mohan Bhagwat: ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं सुतोवाच

मुंबई: ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन समजून घेण्याचे ज्ञान देते. काळाचा संदर्भ बदलला, तरी हे

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; सीएसएमटी-विद्याविहार आणि हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत राहणार

मुंबई:

Marathi Literature : पुण्यात उभारणार 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'; केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई : अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या (3 ऑक्टोबर) पूर्वसंध्येला जगभरातील मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत आनंदाची

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार होणार, सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता

मुंबई: फिल्म सिटीचा आता आणखीन विस्तार होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार करण्यासाठी

Mumbai Weather: पुन्हा छत्री काढा! शनिवार- रविवार मुंबईकरांसाठी धोकादायक, पुढचे 48 तासांसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट

मुंबई: मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा कमालीचा फटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवाती पासूनच मुंबई, उपनगरातील