Baramati By Election : सुनेत्रा ताईंचा फोन आला अन्...बारामती पोटनिवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकी संदर्भात आपली अधिकृत भूमिका जाहीर केली असून, त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर हाके यांनी हा पवित्रा घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, "बारामतीमध्ये सध्या सहानुभूतीची लाट आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र, या निवडणुकीच्या माध्यमातून मला भटक्या विमुक्त जाती-जमातींचे आणि ओबीसींचे काही प्रलंबित प्रश्न आक्रमकपणे मांडायचे होते. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत सदस्य नसून, केवळ एक आंदोलक म्हणून समाजाचा आवाज उठवणे ही माझी प्राथमिकता आहे." हाके यांच्या भूमिकेमुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी हाके यांच्याशी संवाद साधून त्यांना निवडणूक न लढवण्याची विनंती केली. तसेच दत्तात्रय भरणे, उदय सामंत आणि धनंजय मुंडे यांसारख्या दिग्गज नेत्यांनीही हाके यांना फोन करून सकारात्मक चर्चा केली.



माघारीनंतरही लक्ष्मण हाकेंचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर


निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतरही ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रलंबित प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य केले आहे. "माझी लढाई पदासाठी नसून समाजाच्या हक्कासाठी आहे. गेल्या वर्षभरात अनेक प्रश्न मांडूनही ते मार्गी लागलेले नाहीत, ही खेदाची बाब आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. लक्ष्मण हाके यांनी विशेषतः राज्य सरकारने घोषित केलेल्या १८ महामंडळांच्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. "निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ओबीसी आणि भटक्या समाजासाठी १८ महामंडळांची घोषणा केली खरी, पण आजतागायत त्यांना ना अध्यक्ष मिळाले आहेत ना हक्काचे कार्यालय. या केवळ कागदी घोषणाच राहिल्या आहेत," अशी टीका हाकेंनी केली. अजित पवारांच्या (दादांच्या) कार्यपद्धतीवर आणि धोरणांवर आपण आक्रमकपणे भूमिका मांडत असल्याचे सांगतानाच, त्यांनी स्पष्ट केले की संघर्ष करताना कधीही परिणामांची भीती बाळगली नाही. "निवडणूक लढणार नसलो तरी, आमची चळवळ आणि ओबीसींच्या मागण्यांसाठीचा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहील, अनेक मुद्यांवर आक्रमकपणे भूमिका मांडली. या सर्व गोष्टी असताना सुनेत्राताईंचा फोन आला. एवढी सगळी मंडळी कॉल करत असताना आपण विचार केला पाहिजे. म्हणून माघार घेतली” असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. ते बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार नाहीत.



कर नाही त्याला डर कशाला


निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल का? या प्रश्नाला लक्ष्मण हाके यांनी अत्यंत सडेतोडपणे उत्तर दिले आहे. "जेव्हा एखादा माणूस प्रामाणिक हेतूने काम करतो, तेव्हा त्याला कशाचीही भीती नसते. 'कर नाही त्याला डर कशाला' या उक्तीप्रमाणे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे," असे हाके यांनी स्पष्ट केले.



निवडणूक १० दिवसांची, पण लढा...


बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी, आपल्या मूळ भूमिकेवर आपण आजही ठाम असल्याचे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले आहे. "निवडणूक ही केवळ १०-१५ दिवसांची प्रक्रिया आहे, परंतु समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मोठा कालावधी समोर आहे. या निवडणुकीनंतर मी शांत बसणार नाही," असे हाके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नेत्यांसमोर मांडणार प्रश्नांचा पाढा आतापर्यंतचा अनुभव फारसा समाधानकारक नसल्याची कबुली देत हाके म्हणाले की, काही आंदोलनांना यश आले असले तरी अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी