नवशिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण; दुसरी ते चौथीच्या शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक
मुंबई : उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी म्हणजे शिक्षकांसाठी हक्काच्या विश्रांतीचा आणि पर्यटनाचा काळ. मात्र, यंदा शिक्षकांच्या या सुट्टीवर विरजण पडण्याची चिन्हे आहेत. आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाचे धडे गिरवण्यासाठी शिक्षकांना मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात प्रशिक्षणाला सामोरे जावे लागणार असून, पर्यायाने यंदा गुरुजींची 'शाळा' सुट्टीतच भरणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीचा नवा अभ्यासक्रम लागू होत आहे. या अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि शिकवण्याच्या नव्या पद्धती समजून घेण्यासाठी ४ मेपासून राज्यभर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ जून रोजी शाळांची घंटा वाजण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. 'एससीईआरटी'च्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रशिक्षकांची फौज तयार होणार
राज्यस्तरावरील प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची फौज तयार केली जात आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना (डाएट) २० एप्रिलपर्यंत पात्र प्रशिक्षकांची नावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रशिक्षक पुढे जिल्हा आणि तालुका स्तरावर शिक्षकांना मार्गदर्शन करतील. इयत्ता दुसरीसाठी ३ दिवस, तर तिसरी-चौथीसाठी ४ दिवसांचे प्रशिक्षण असेल. १५ जून २०२६ पूर्वी सर्व प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.






