Monday, August 31, 2026

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च!

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट अर्थात गणवेशाची खरेदी केली जाणार आहे. यात कोट, ट्राऊजर, हुड आणि ग्लोव्हज या अत्यावश्यक गणवेश साहित्याचा समावेश आहे. या प्रत्येकी गणवेशासाठी सुमारे ७० हजार रुपये मोजले जाणार आहे. ( Fire Brigade Uniform)

मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान हे नागरिकांच्या जीवित व वित्ताचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आग लागण्याच्या घटनांबरोबरच रेल्वे अपघात, इमारत कोसळणे, झाडे कोसळणे तसेच विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्याच्या मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून कर्तव्य निभावत असतात.अशा परिस्थितीत काम करताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रचंड उष्णता तसेच इतर धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आगीच्या ठिकाणी काम करताना पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट (पी.पी.पी) परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या उपकरणांमुळे उष्णता आणि आगीपासून अग्निशमन कर्मचाऱ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते.

विशेष म्हणजे, या प्रकारच्या स्वसंरक्षण गणवेशासाठी भारतीय मानक उपलब्ध नसल्याने मुंबई अग्निशमन दलाने यापूर्वी २००९-१० आणि २०१७-१८ या कालावधीत युरोपीय देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मानकांनुसार गणवेशाची खरेदी केली होती. आता नव्याने कोट, ट्राऊजर, हुड आणि ग्लोव्हज खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला आहे. अग्निशमन दलातील २१७६ अधिकारी आणि जवान यांच्यासाठी या गणवेशाची खरेदी करण्यात येणार आहे. तब्बल १५ कोटी ९९ लाख ९६ हजार २४९ रुपयांचे स्वसंरक्षण उपकरण संच खरेदी करण्यात येणार आहेत. या संचामध्ये कोट, ट्राऊजर, हुड आणि ग्लोव्हज या अत्यावश्यक गणवेश साहित्याचा समावेश आहे. या खरेदीसाठी अमी एंटरप्राइज या कंपनीची निवड करण्यात आली आहे.( Fire Officer Uniform Cost)

यामध्ये प्रति गणवेश हा ७० हजार ६९९ रुपये खर्च होणार आहे. यात फायरमन कोट ३३ हजार ६३० रुपये, फायरमन ट्रॉउझर करता २७ हजार ३१७ रुपये, फायरमन ग्लोव्हज करता ६९५० रुपये आणि फायरमन हुड करता २ हजार ८०२ रुपये असा दर आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्वसंरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा