Shiv Sena : पहलगाममध्ये पर्यटकांसाठी बलिदान देणाऱ्याला शिवसेनेने दिले नवे घर

पहलगाम : “धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा केवळ एक तरुण नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. “एका आईचा मुलगा, एका कुटुंबाचा आधार क्षणात हिरावला गेला… पण मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान देश कधीच विसरणार नाही, ते इतिहासात कोरलं गेलं आहे,” असं ते म्हणाले.


पहलगाम येथे येथे शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत आर्थिक मदत आणि नवीन घर सुपूर्द केले. या भावनिक आणि अभिमानाच्या क्षणाला आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.


याआधी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, त्या काळजाला हादरवणाऱ्या प्रसंगात निरपराध पर्यटकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार सुरू होता. त्या वेळी आदिलने निर्भीडपणे पुढे जात दहशतवाद्यांच्या हातातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी झुंज दिली. स्वतःचा जीव पणाला लावत त्यांनी मानवतेचे रक्षण केले आणि शहीद झाले.


“त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे,” असे सांगत शिंदे पुढे म्हणाले, “मी स्वतः त्या वेळी पहलगामला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केले आणि संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवले.”


“तो फक्त एका कुटुंबाचा मुलगा नव्हता, तर देशाच्या भविष्याला वाचवणारा खरा योद्धा होता,” असेही त्यांनी अधोरेखित केले. “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नाही, तर देशभक्तीची जाज्वल्य ओळख आहे,” असे सांगत त्यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्यावतीने आदिल यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत आणि पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते वचन पूर्ण करत उभारण्यात आलेल्या नव्या घराला “आनंद नाथ भवन” असे नाव देण्यात आले असून, ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.


“हे घर केवळ निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे,” असे त्यांनी सांगितले. “आम्ही जे बोलतो ते करतो आणि जी कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो, हीच शिवसेनेची ओळख आहे,” असे ठामपणे सांगत शिंदे यांनी आदिल यांच्या कुटुंबाला विश्वास दिला. “तुम्ही एक आधार गमावला आहे, पण संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे.”


स्थानिक नागरिकांनी परिसराला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची मागणी केली असता, केंद्र सरकारच्या सहकार्याने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक काश्मीरमध्ये येत असून, भविष्यात ही संख्या अधिक वाढवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.


दरम्यान, आदिल यांच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त करत सांगितले, “एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केले. त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि घरही बांधून दिले. हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून सन्मान आणि आधार आहे.” आदिल यांच्या बहिणीने आणि भावाने यावेळी साश्रूपूर्ण नयनांनी शिंदे यांचे आभार मानले.


या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाठ, मंत्री योगेश कदम, शिवसेना सचिव कॅप्टन अजित अडसूळ, सरहद्द संस्थेचे संचालक संजय नहार, मराठवाडा युवा सेनेचे बाजीराव चव्हाण, युवासेना सचिव कोकण विभाग विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य अभिमन्यू खोपकर, अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रमीज रजा, अप अधीक्षक फारुख अहमद, जम्मू-काश्मीर शिवसेना प्रमुख अश्विनी कुमार गुप्ता, राज्य सचिव मोहम्मद शकील मोगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवसेनेच्या वतीने बांधण्यात आलेले घर आदिल सय्यद यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पहलगाम जिल्ह्यातील हाफतनार या त्यांच्या मूळ गावी उपस्थित होते.


Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र