Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश


मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करत भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक पायाभूत सोयी-सुविधांसह दर्जेदार आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. सोमवारी मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील प्रमुख ६ तीर्थक्षेत्रे व ऐतिहासिक स्थळांच्या कायापालटासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यांना आणि निधीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. "सर्व विकासकामे दर्जेदार दर्जाची असावीत आणि ती निश्चित कालमर्यादेतच पूर्ण व्हावीत," असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.


सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ३ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या ६ महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.



पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग क्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी १७२.२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून मे २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सध्याचे २.७ मीटरचे अरुंद रस्ते ७ मीटर रुंद केले जाणार असून विविध वळण रस्ते आणि अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात येईल. मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग, एम्फीथिएटर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन पोलीस स्टेशन आणि विश्रामगृह उभारले जाईल. याशिवाय डिंभे धरण परिसरात सबस्टेशन, अत्याधुनिक केबल कार (रोपवे) सुविधा आणि एमटीडीसी रिसॉर्टचा विकास केला जाईल. आमदार बाबाजी काळे यांच्या सूचनांचाही यात समावेश आहे.



संत तुकाराम महाराज जन्मस्थानाचा कायापालट :


जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान मंदिर, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या ऐतिहासिक संवर्धनासाठी ४१.७१ कोटींचा सर्वंकष आराखडा मंजूर झाला. या अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण, स्वच्छता, २४ तास पिण्याचे पाणी, सुसज्ज पार्किंग, निवास सुविधा आणि माहिती केंद्र उभारण्यात येईल. भंडारा डोंगर परिसरात हरित क्षेत्र संवर्धन आणि वृक्षारोपण करून नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवले जाईल. आमदार सुनील शेळके यांच्या सूचनांनुसार यात कामांचा समावेश करण्यात आला आहे.



कोणकोणत्या कामांचा समावेश?


- सातारा जिल्ह्याची शान असलेल्या ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराच्या जतन आणि संवर्धनासाठी १३४.८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. किल्ल्यावरील राजसदरेचे पुनरुज्जीवन करणे, ऐतिहासिक बुरुजांचे मूळ स्थापत्य राखून संवर्धन करणे, नवे पादचारी मार्ग, लँडस्केपिंग आणि पर्यटकांना आकर्षित करणारा अत्याधुनिक 'लटकता पूल' व प्रेक्षक गॅलरीची निर्मिती पुरातत्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


- साताऱ्यातील संगम माहुली येथील ऐतिहासिक समाधी स्थळांच्या संवर्धनासाठी १३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार आणि लँडस्केप विकास केला जाईल. ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन झुलता पूल, व्ह्यूइंग गॅलरी आणि सुसज्ज पाथवे निर्माण करून या परिसराला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवले जाईल.


- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरुळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकास आराखड्यात सुधारणा करून तो आता २१०.४५ कोटींचा करण्यात आला आहे (यात ५३.८२ कोटींचा वाढीव निधी समाविष्ट आहे). येथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अत्याधुनिक भक्त निवास, सुसज्ज दर्शन बारी (प्रतीक्षागृह), शॉपिंग कॉम्प्लेक्स, फंक्शन हॉल, विस्तीर्ण घाट आणि रहदारी टाळण्यासाठी १.६ किमीचा बाह्य वळण रस्ता (बायपास रोड) करण्याचे काम वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगासाठी मोठा निधी :


बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिराच्या विकासासाठी ३०१.५४ कोटी रुपयांचा भव्य अतिरिक्त आराखडा मंजूर करण्यात आला असून, ही कामे तीन टप्प्यांत होतील. पहिल्या टप्प्यात मुख्य मंदिर परिसरात भव्य प्रवेशद्वारे, डिजिटल रांग व्यवस्था, अत्याधुनिक प्रतीक्षागृहे, अन्नछत्र, योग-ध्यान केंद्र आणि सौंदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ऐतिहासिक हरिहर व मार्कंडेय तीर्थांचे वैज्ञानिक पुनरुज्जीवन, सायकल ट्रॅक, दिव्यांगसुलभ सुविधा, सुसज्ज फूड कोर्ट आणि सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, तर तिसऱ्या टप्प्यात मेरू पर्वतावर भव्य शिवमूर्तीची स्थापना, शिवपुराण व वैदिक संग्रहालय, ॲम्फीथिएटर, तसेच लेझर लाईट अँड साऊंड शोची निर्मिती केली जाईल.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा