IPL Playoff 2026 : RCB, GT, SRH आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल

मुंबई : आयपीएल २०२६ च्या अंतिम टप्प्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान मुंबई इंडियन्सला ३० धावांनी धूळ चारली. राजस्थानच्या फलंदाजांनी सामूहिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या २०५ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजी गडगडली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या (३/१७) धारदार गोलंदाजीपुढे सूर्यकुमार यादवची (६० धावा) एकाकी झुंज अपयशी ठरली आणि मुंबईला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. यासह राजस्थान रॉयल्सचा संघ हा आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे.






प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली होती. वैभव सूर्यवंशी (४) आणि कर्णधार रियान पराग (१४) स्वस्तात परतले. मात्र, यशस्वी जैस्वालने १७ चेंडूंत २७ धावा करत डावाला गती दिली. त्यानंतर ध्रुव जुरेल (३८ धावा) आणि दासुन शनाका (२९ धावा) यांनी मधल्या फळीत उपयुक्त खेळी केली. ध्रुव जुरेल बाद झाल्यावर आरआर च्या संघाने जोफ्रा आर्चरला फलंदाजीत बढती दिली. अखेरच्या षटकांमध्ये जोफ्रा आर्चरने अवघ्या १५ चेंडूंत ३ षटकार खेचत ३२ धावांची वादळी खेळी केली, तर रवींद्र जडेजाने नाबाद १९ आणि नांद्रे बर्गरने अवघ्या ३ चेंडूंत नाबाद १० धावा कुटल्या. यामुळे राजस्थानने २० षटकांत ८ बाद २०५ धावांचे विशाल आव्हान उभे केले. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.



मुंबईची खराब सुरुवात२ ०६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ नमन धीर (६), रायन रिकलटन (१२) आणि टिळक वर्मा (३) झटपट बाद झाल्यामुळे मुंबईची अवस्था ४ बाद ३८ धावा अशी बिकट झाली होती. चार धक्के बसल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स (३३ धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. सूर्याने अवघ्या ३२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. विल जॅक्स बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने मैदानात येत १५ चेंडूंत ३४ धावांची (३ चौकार, २ षटकार) आक्रमक खेळी करत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, जोफ्रा आर्चरने हार्दिकला बाद करत मुंबईच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. सूर्या ६० धावा करून बर्गरच्या चेंडूवर बाद झाला आणि मुंबईचा डाव २० षटकांत ९ बाद १७५ धावांवर मर्यादित राहिला. राजस्थानकडून आर्चरने ३, तर नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.



सामन्याचा संक्षिप्त धावफलक :
राजस्थान रॉयल्स: २० षटकांत २०५/८ (ध्रुव जुरेल ३८, जोफ्रा आर्चर ३२, यशस्वी जयस्वाल २७; शार्दुल ठाकूर २/४१, दीपक चहर २/४३)
मुंबई इंडियन्स: २० षटकांत १७५/९ (सूर्यकुमार यादव ६०, हार्दिक पंड्या ३४, विल जॅक्स ३३; जोफ्रा आर्चर ३/१७, ब्रिजेश शर्मा २/२६, नांद्रे बर्गर २/४३)
निकाल: राजस्थान रॉयल्स ३० धावांनी विजयी.



सूर्यवंशीचा विक्रम


आयपीएल २०२६ चा संपूर्ण हंगाम आपल्या फलंदाजीने गाजवणारा राजस्थान रॉयल्सचा अवघ्या १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने लीगच्या शेवटच्या साखळी सामन्यात एक मोठा इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वैभवला मोठी धावसंख्या उभारता आली नसली (६ चेंडूंत ४ धावा) तरी, या छोट्या खेळीदरम्यान त्याने कोणत्याही एका टी-२० स्पर्धेत किंवा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला. या ऐतिहासिक कामगिरीपूर्वी हा विक्रम भारताच्या देवदत्त पडिक्कलच्या नावावर होता. पडिक्कलने २०१९-२० च्या 'सय्यद मुश्ताक अली' टी-२० स्पर्धेत कर्नाटककडून खेळताना १२ सामन्यांत ५८० धावा कुटल्या होत्या. मुंबई विरुद्ध खेळायला उतरण्यापूर्वी वैभवला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी अवघ्या २ धावांची गरज होती. सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवर खाते उघडल्यानंतर, त्याने विल जॅक्सच्या गोलंदाजीवर दुसरी धाव घेताच पडिक्कलचा हा ६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. १५ व्या वर्षी जगातील सर्वात कठीण लीगमध्ये केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे वैभव सध्या आयपीएल २०२६ च्या 'ऑरेंज कॅप' म्हणजेच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर विराजमान आहे.



शार्दुलचा ‘नो-बॉल’ अन् फसला डाव


राजस्थानच्या डावातील शेवटच्या षटकात ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांच्यात मैदानावरच सेलिब्रेशनचा एक अनोखा आणि गमतीशीर खेळ रंगला, ज्यामुळे दोन्ही संघांच्या डगआऊटमध्ये एकच हशा पिकला. २० व्या षटकात शार्दुल ठाकूरने टाकलेल्या पहिल्या तीन चेंडूंवर जडेजाने केवळ १ आणि नांद्रे बर्गरने ३ धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर शार्दुलने आपली हुशारी दाखवत जडेजाला फसवले आणि त्याला झेलबाद केले. विकेट मिळताच अतिउत्साहात शार्दुलने थेट जडेजाच्या समोर जाऊन आक्रमकपणे सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा हा आनंद अगदी काही सेकंदांचाच ठरला; कारण पंचांनी तो चेंडू ‘नो-बॉल’ घोषित केला. जीवनदान मिळाल्यानंतर रवींद्र जडेजाने या नामुष्कीचा तात्काळ बदला घेतला. फ्री-हिट मिळालेल्या पुढच्याच चेंडूवर जडेजाने चेंडू सीमापार धाडत शानदार चौकार ठोकला. चौकार मारल्यानंतर जडेजाने देखील शार्दुलच्या अगदी समोर जाऊन, त्याच्याच स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करत त्याला चिडवले. दोन अनुभवी भारतीय खेळाडूंमधील हा मैत्रीपूर्ण ड्रामा पाहून प्रेक्षक आणि समालोचकही पोट धरून हसू लागले.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम